fire

मारहाण करत हवेत गोळीबार; तिघांना अटक

बीड

चंदनसावरगाव येथील घटना

केज : ट्रकला जीप आडवी लावून चालकास धमकावत कारखान्याची तुझ्याकडे असलेली बाकी दे असे म्हणत तिघांनी संगनमत करत लाथाबुक्याने मारहाण केली व हवेत गोळीबार केला. तालुक्यातील चंदनसावरगाव येथील बसस्थानकासमोर ३ जानेवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली.

अंकुश रामराव राठोड (वय २८, रा.लातूर) असे फिर्यादीचे नाव आहे. ते ट्रक चालक म्हणून काम करतात. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ते ट्रक घेऊन चंदनसावरगाव बसस्थानकापासून जात होते. यावेळी जीपमधून क्र (एम. एच. 22 ए. एम. 1083) आलेल्या बाबा तुळशीराम पोले, बाळु टोम्पे (दोघे रा. अकोली ता. गंगाखेड) व हनुमंत लटपटे (रा. कोदरी ता. गंगाखेड) या तिघांनी राठोड यांच्या ट्रकला जीप आडवी लावून त्यांन रस्त्यात ट्रक थांबविण्यास भाग पाडले. त्यानंतर चालक राठोड यांना ‘तुझ्याकडे गंगाखेड शुगर कारखान्याचे पैसे आहेत. तू कारखान्याला ट्रक व मजुर पाठवले नाहीस. आम्ही कारखान्याकडून पैसे वसुलीचे काम करतो तू आता पैसे दे असे सुनावले. त्यावर राठोड यांनी आपण केलेल्या कामाचा हिशोब करू व नंतर माझ्याकडे फिरलेले पैसे तुम्हाला देतो असे सांगितले. परंतु यावर संतापलेल्या तिघांनी अंकुश राठोड यांना शिवीगाळ करून चापटाबुक्याने मारहाण सुरु केली. दरम्यान, राठोड यांचे नातेवाईक भांडण सोडवण्यास आले असता आरोपी बाबा पोले म्हणाला, माझ्याकडे पिस्तुल आहे, मी एकालाही जिवंत सोडणार नाही असे म्हणून त्याने त्याच्या पिस्तुलमधून हवेत गोळीबार करुन दहशत निर्माण केली. याप्रकरणी अंकुश शामराव राठोड यांच्या फिर्यादीवरुन तिघांविरुध्द युसूफवडगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक संदीप दहिफळे हे पुढील तपास करत आहेत.