mobile chor, mobile chori

चोरट्यांनी बॅगेवर डल्ला मारून २ लाख लांबविले

अंबाजोगाई न्यूज ऑफ द डे

परळीतील वैद्यनाथ बॅंकेतील घटना

परळी : शहरात चोरट्यांचा जणू मुक्त संचारच सुरू आहे. आता चक्क बँकेतच एकाची २ लाख १० हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना सोमवारी (दि.३) जानेवारी २०२२ रोजी दुपारी ४.३३ वाजता घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात 3 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान बँक प्रशासनाची संरक्षण यंत्रणा कुचकामी ठरली की काय? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील वैद्यनाथ बँकेत सोमवारी दुपारी प्रभाकर बाळाजी शिंदे सेवानिवृत्त कर्मचारी बँकेत आले होते. आपले व्यवहार पूर्ण करून ते थांबलेले असताना अज्ञात तीन जणांनी संगनमत करून शिंदे यांच्या अंगावर खाजवायची पावडर टाकली. शिंदे यांचे अंग खाजवत असल्याने त्यांनी हातातील बॅग खुर्चीवर ठेवली. याचा तीन चोरट्यांनी गैरफायदा घेऊन त्यांच्या बॅगमधील २ लाख १० हजार रुपये व पिशवीतील बँक पासबुक, चेकबुक आदी लांबविले. याप्रकरणी प्रभाकर बालाजी शिंदे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुरनं ६/२०२२ कलम ३७९, ३४ भादवीनुसार अज्ञात ३ चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.भार्गव सपकाळ हे करीत आहेत.

Tagged