r raja

अपहृत मुलीच्या शोधासाठी चाळीस हजाराची मागणी; एपीआय निलंबित

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.3 : दिंद्रुड पोलीस हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी 25 एप्रिल रोजी दिली होती. तब्बल एक महिना सहा दिवसानंतर त्या मुलीचा शोध घेण्यात दिंद्रुड पोलिसांना यश मिळाले होते. याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यासाठी 40 हजार रुपये मागितल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलीस अधीक्षकांकडे केली होती. यावरुन पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी दिंद्रुड ठाण्याचे ठाणेदार यांना निलंबित केले आहे. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
माजलगाव तालुक्यातील बेलुरा येथील 17 वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. 25 एप्रिल रोजी तिच्या पालकांनी दिंद्रुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर शनिवारी मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी 40 हजार मागितल्याची तक्रार वडिलांनी पोलीस अधीक्षकांकडे केली. पोलिसांनी हे आरोप नाकारत मुलीचा शोध सुरु असल्याचे सांगितले होते. यानंतर रविवारी पोलिसांनी फोन ट्रेसिंगच्या माध्यमातून मुलीचा माग काढला. मुलगी नांदेड तालुक्यात असल्याची माहिती मिळाताच मुखेड तालुक्यात मुलीचा शोध लागला. आरोपी अभय सोनकांबळे (22) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र मुलीचा शोध घेण्यासाठी ठाणे प्रमुख सपोनि.अनिल गव्हाणकर याने 40 हजाराची मागणी केली होती. यासंदर्भात मुलीच्या नातेवाइकांनी पोलीस अधीक्षकांची भेट देऊन तक्रार केली होती. तसेच संवादाची ऑडिओ क्लिप देखील दिली होती. या प्रकरणात अखेर 3 दिवसांनी सपोनि.अनिल गव्हाणकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Tagged