‘या’ अधिकार्‍याच्या बदलीसाठी ‘बोंबा मारो’

केज न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी नुकत्याच 8 नायब तहसीलदारांसह 75 कर्मचार्‍यांच्या जिल्हांतर्गत बदल्या केल्या आहेत. याबाबतचे आदेश (दि.10) रोजी जारी केलेले आहेत. परंतू, यात वारंवार तक्रारी, निवेदने व अर्जफाटे करुन बदलीची मागणी केल्यानंतरही वर्षानुवर्षे ठाण मांडून असलेल्या नायब तहसीलदारांची बदली करण्यात न आल्याने शेकाप, रिपाइं व शिवसंग्रामच्यावतीने दि.24 रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयासमोर ‘बोंबा मारो’ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे म्हटले की, येथील नायब तहसील सचिन देशपांडे हे केजचे रहिवासी आहेत. ते येथील कार्यालयात गेल्या अनेक वर्षापासून विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यांचा स्थानिक राजकरणात देखील हस्तक्षेप होत असून कामकाजात पक्षपातीपणा वाढला असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यांच्यासह वादग्रस्त अधिकारी व कर्मचार्‍यांची बदली करण्यात यावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनाची दखल घेण्यात न आल्यामुळे शेकाप, रिपाइं व शिवसंग्रामच्यावतीने दि.24 रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयासमोर ‘बोंबा मारो’ आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर शेकाप मध्यवर्ती समिती सदस्य तथा शेतकरी नेते भाई मोहन गुंड, शिवसंग्रामचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गलांडे व रिपांइचे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. दरम्यान, याबाबत तहसीलदार दुलाजी मेंढके, नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांचे भ्रमणध्वनी बंद असल्याने त्यांच्या प्रतिक्रिया समजू शकल्या नाहीत.

Tagged