नागरिकांच्या प्रश्नापुढे एसपी निरूत्तर
अंबाजोगाई : सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई करत आहेत. त्यांना जे जमते, ते तुम्हाला का जमतं नाही? असा सवाल अंबाजोगाईच्या एका नागरिकाने थेट पोलीस अधीक्षक आर. राजा यांना केला. यावर ते स्पष्टपणे उत्तर देऊ शकले नाहीत. हा प्रसंगी अंबाजोगाई शहर ठाण्यात बुधवारी घडला.
आर. राजा हे जिल्हा वार्षिक तपासणीसाठी शहर ठाण्यात आले होते. या बैठकीस अंबाजोगाईच्या अप्पर अधिक्षक कविता नेहरकर, उपअधिक्षक सुनिल जायभाये, शहर ठाण्याचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरिक्षक गोपाळ सुर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर गव्हाणे यांच्यासह ठाण्यातील सर्व अधिकारी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी बोलविण्यात आले होते. याप्रसंगी नागरिकांनी विविध समस्या मांडल्या. तसेच, काही प्रश्न थेट पोलीस अधीक्षक राजा यांना केले. अवैध धंद्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना राजा म्हणाले, अवैध धंद्यांची मागणी असल्यामुळे त्याचा पुरवठा होणारच; याला पोलीस प्रशासन काहीच करु शकत नाही, याला नागरिक देखील जबाबदार आहेत, असे उत्तर दिल्याने उपस्थितांच्या भुवया उंचालवल्या. याशिवाय, अधीक्षकांनी स्वतःची जबाबदारी झटकल्याचे स्पष्ट झाले.
पदाधिकार्यांची पोलिसांबद्दल नाराजी
एम.आय.एम.चे अॅड.शेख रमीज, क्रॉ.ब्रबुवान पोटभरे, माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे, मुस्लिम धर्मियांचे काजी यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेसह महिला सुरक्षा, अवैध धंद्यांबाबत सवाल केले. याविषयी पोलीस कार्यवाही करत नसल्याने नाराजी व्यक्त केली.
अत्याचारातील बडे मासे अद्यापही मोकाट
अंबाजोगाई शहरात एका अल्पवयीन मुलीवर 400 जणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. यातील आरोपी असलेल्या पोलिसाला पोलिसांची बदनामी होवू नये म्हणून आजही अटक केलेले नाही. परंतु यातील मुख्य सुत्रधार व बडे मासे मोकाट फिरत आहेत. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आहे का नाही? असा प्रश्न कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांनी केला.