रिक्त पदे भरा, पगारी करा; मग ‘स्वाराती’ला 200 कोटी द्या!
शुभम खाडे। बीड/अंबाजोगाई
दि.23 : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास 50 वर्षे पूर्ण होणार आहेत. या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून रूग्णालयांतर्गत भौतिक सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी निधी मिळणार आहे. विविध सुविधांसाठी तब्बल 200 कोटींचे प्रस्ताव सादर करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून कोरोना काळातील अनुभव पाहता ‘सुवर्ण महोत्सवा’निमित्त ही उधळपट्टीची ‘सुवर्णसंधी’ ठरण्याचीच दाट शक्यता आहे. राज्य शासनाने रूग्णालयास आणखी निधी द्यावा; परंतु आधी रिक्त पदे भरावीत, कर्मचार्यांच्या पगारी कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.
रूग्णालयास 50 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे उत्साहात सुवर्ण महोत्सव साजरा करण्यापूर्वी रूग्णालयाच्या साधनसामुग्रीसह भौतिक सुविधांमध्ये वाढ करण्याचा मानस वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचा असल्याचे समजते. त्यांच्या निर्देशानुसार विभागाचे संचालक डॉ.दीपक म्हैसकर, आयुक्त डॉ.विरेंद्र सिंह, सचिव सौरभ विजय यांच्या सुचनेनुसार रूग्णालय प्रशासनाकडून अंदाजपत्रकानुसार 200 कोटींचे निधी प्रस्तावित करण्याच्या हालचाली सुरु आहेत. याअनुषंगाने आमदार संजय दौंड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.22) बैठक पार पडली. यावेळी प्रमुख उपस्थितीत माजी आमदार पृथ्वीराज साठे, अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, अधीक्षक डॉ.राकेश जाधव यांच्यासह महाविद्यालयीन परिषदेचे सर्व विभागप्रमुख, प्रशासकीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नूतन बांधकाम, खाटा, वैद्यकीय उपकरणे, साहित्य सामुग्रीसह भौतिक सुविधा वाढीच्या दृष्टीने तब्बल 200 कोटींचे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. हे प्रस्ताव स्वतःहून मंत्री अमित देशमुख यांनी मागविल्याने निधी मिळण्याची शक्यता आहे. ही आनंदाची बाब आहे. मिळालेल्या निधीचा विनीयोग नीट केल्यास रूग्णालयाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु कोरोनाकाळातील अनुभव पाहता लोकप्रतिनिधींसह ठेकेदारांसाठी ही ‘सुवर्णमहोत्सवा’निमित्त स्वारातीत उधळपट्टीची ‘सुवर्णसंधी’ ठरण्याचीच दाट शक्यता आहे.
प्राधान्याने रिक्त पदे भरा; तोकड्या
मनुष्यबळावर मात करून काम सुरु
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय सुरु झाले तेव्हा विद्यार्थी प्रवेश क्षमता 50 होती, ती वाढून आज 150 झाली. पद्यूत्तर अभ्यासक्रमही सुरु झाले. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत 518 रूग्ण खाटांची संख्या 920 वर नेण्यात येत आहे. यात वाढती रूग्णसंख्याही लक्षात घेऊन भौतिक सुविधा वाढविण्यात येणार आहेत. परंतु, प्राधान्याने रिक्त पदे भरण्याची गरज आहे. सध्या तोकड्या मनुष्यबळावर मात करून वैद्यकीय तज्ञ काम करीत आहेत.
वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसह वरिष्ठांच्या आदेशानुसार स्वाराती रूग्णालय प्रशासन अंदाजे 200 कोटींच्या निधीसाठी प्रस्ताव सादर करणार आहे. तसेच, रिक्त पदे भरण्याची प्रक्रीया शासन स्तरावर सुरु असल्याचे बोलले जाते. त्याबाबत अधिक माहिती नाही. तसेच, कंत्राटी कर्मचार्यांच्या वेतनासाठी पाठपुरावा सुरु आहे.
डॉ.भास्कर खैरे, अधिष्ठाता, स्वाराती, अंबाजोगाई