कत्तलखान्यावर छापा; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ आरोपींवर गुन्हा

आष्टी न्यूज ऑफ द डे

आयपीएस पंकज कुमावत यांच्या पथकाची दौलावडगावमध्ये कारवाई

आष्टी : तालुक्यात दौलावडगाव येथील कत्तखान्यावर छापा टाकून गोवंशीय मांस, जनावरांसह एक टेम्पो असा १३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी आंभोरा पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने गुरुवारी रात्री १२.३० वाजता केली.

दौलावडगाव शिवारात डोंगराच्या पायथ्याला पत्र्याचे शेडमध्ये खलील अरुण कुरेशी, दलील हारून कुरेशी यांनी कत्तलखाना सुरू केल्याची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस अधीक्षक यांनी सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार कुमावत यांनी केजचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष मिसळे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांचे पथक कारवाईसाठी रवाना केले. त्याठिकाणी पोलिसांनी छापा मारला असता पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलखाना सुरू असल्याचे दिसून आले. त्याठिकाणाहून तीन इसम पळून गेले. शेडसह समोर उभा असलेल्या आयशर टेम्पोची (क्र.एम एच-२३/ डब्ल्यू-३९८३) तपासणी केली असता ४० जनावरांची कत्तल करून तयार केलेले मांस ज्याचे वनज पाच टन व अंदाजे किंमत ६ लाख २० हजार रुपये, टेम्पोची किंमत ४ लाख रुपये, कार (क्र.एम.एच.२०/८०८० ) तिची किंमत ३ लाख रुपये असा एकूण १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आला. पंचासमक्ष घटनास्थळी मिळून आलेल्या व्यक्तींनी चौकशीअंती हारून इनामदार यांचा कत्तलखाना असल्याचे सांगितले. याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात ११ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई केजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोहेकॉ. बालाजी दराडे, सुहास जाधव, राजू वंजारे, सचिन अंहकारे, संजय टूले, पोलीस ठाणे अंभोरा येथील पोउपनि. रवी देशमाने, आदिनाथ भडके आदींनी केली.

Tagged