रद्द केलेल्या ३४ रस्त्यांचा अखेर पुढील टप्प्यात समावेश होणार

अंबाजोगाई केज गेवराई न्यूज ऑफ द डे

आ.नमिता मुंदडा, विजयकांत मुंडेंच्या पाठपुराव्याला यश

केज : फडणवीस सरकारच्या काळात केज व गेवराई विधानसभा मतदार संघात मंजूर झालेल्या एकूण ३४ रस्त्यांची कामे सत्ताबदल होताच नवीन सरकारने रद्द केली होती. अखेर रद्द केलेल्या या सर्व ३४ रस्त्यांचा समावेश मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात प्राधान्याने करावा, असे निर्देश महाराष्ट्र शासनाचे वित्तीय नियंत्रक तथा उपसचिव प्रवीण जैन यांनी दिले आहेत.

भाजपची सत्ता असताना बीड जिल्ह्याच्या तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केज मतदार संघातील २४ आणि गेवराई मतदार संघातील १० रस्त्यासह जिल्ह्यातील इतर सर्वच मतदार संघातील रस्त्याच्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी मिळवून दिली होती. मात्र, सत्ताबदल होताच नवीन सरकारच्या काळात केज आणि गेवराई मतदार संघातील सर्व ३४ रस्त्यांची कामे रद्द करण्यात आली होती व इतर मतदार संघातील कामे मात्र जैसे थे ठेवण्यात आली. विशेष म्हणजे केज आणि गेवराई या दोनच मतदार संघात भाजपचे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे राजकीय विद्वेषातून जाणीवपूर्वक या दोन मतदार संघातील विकासकामांना अडथळा आणण्यात येत असल्याचे चित्र निर्माण झले होते. याप्रकरणी आ. नमिता मुंदडा आणि जि.प. सदस्य विजयकांत मुंडे यांनी उच्च न्यायालयात दोन स्वतंत्र जनहित याचिका दाखल केल्या होत्या. आ. मुंदडा आणि विजयकांत मुंडे यांनी न्यायलयात सलग दोन वर्षे लढा दिला. तर, आ. मुंदडा यांनी विधानसभेत आणि शासनपातळीवर सतत पाठपुरावा सुरु ठेवला. प्रत्येक वेळी मुंबई दौऱ्यात आ. मुंदडा या रस्त्यांच्या कामासाठी संबंधित मंत्री, अधिकाऱ्यांच्या आवर्जून भेटी घेत. अखेर आ. मुंदडा आणि विजयकांत मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. केज आणि गेवराई मतदार संघातील रद्द करण्यात आलेल्या सर्व ३४ रस्त्यांचा कामाचा समावेश मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात प्राधान्याने करावा असे निर्देश महाराष्ट्र शासनाचे वित्तीय नियंत्रक तथा उपसचिव प्रवीण जैन यांनी दिले आहेत. यावर्षी दि. ६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला शासनाने मंजुरी दिली आहे. निर्देशानुसार त्यामध्ये या ३४ रस्त्यांचा समावेश करण्यात येणार असून नागरिकांची रस्त्याअभावी होणारी ससेहोलपट थांबणार आहे.

Tagged