CHAKU-HALLA

घाटनांदूरमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला

अंबाजोगाई क्राईम

गावात तणावाचे वातावरण

घाटनांदूर : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे चार दिवसापूर्वी झालेल्या वादानंतर तणाव कायम असतानाच आणखी एका तरुणावर चौघांनी कत्तीच्या साह्याने प्राणघातक हल्ला केला तसेच त्याच्याजवळील सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम काढून घेतल्याची घटना रविवारी (दि.२०) घडली.

श्रीकांत उर्फ बबलू बालासाहेब जाधव (रा. घाटनांदूर, ता. अंबाजोगाई) या तरुणाच्या फिर्यादीनुसार, रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास तो शेतातील काम आटोपून घराकडे परत येत असताना त्याला गोंविद दत्तू मिसाळ, सचिन अरविंद गोदाम, गणेश वसंत चांगीरे आणि हरीनारायण रघुनाथ दरगड हे चौघे त्याच्याजवळ आले आणि दारू पिण्यासाठी पैसे मागितले. श्रीकांतने त्यांना पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी श्रीकांतच्या बोटातील सात ग्राम सोन्याची अंगठी आणि रोख ७ हजार रुपये काढून घेतले. श्रीकांतने त्यांना अंगठी आणि पैसे वापस मागितले असता त्यांनी कशाची अंगठी, आता तुला जीवे मारतो असे म्हणत कत्तीने त्याच्यावर वार केले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याच्या धमक्या देत ते चौघेही तिथून निघून गेले. या हल्ल्यात श्रीकांत गंभीर जखमी झाला. यावेळी आरडाओरडा ऐकून धावून आलेल्या ग्रामस्थांनी जखमी श्रीकांतला अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. सदर फिर्यादीवरून चारही आरोपींवर कलम ३०७, ३२३, ३२६, ३२७, ५०६, ३४ अन्वये अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, सतत घडत असलेल्या गंभीर घटनांमुळे घाटनांदूरमध्ये तणावाचे वातवरण आहे.

Tagged