prakash-solanke-sadola-mela

आ. प्रकाश सोळंकेंनी कोरोना काळात मेळावा घेतला

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे माजलगाव

सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडवल्याने भाजपा तालुकाध्यक्षांची गुन्हा दाखल करण्याची मागणी

माजलगाव, दि.10 : माजलगाव तालुक्यातील सादोळा येथे पीक कर्ज वाटपाच्या कार्यक्रमात आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडून कोरोना महामारीच्या अनुषंगाने राज्यात लागू असलेल्या जमावबंदी सह सोशल डीस्टिंगचे उल्लंघन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पीक कर्ज वाटप करण्याच्या राजकीय धुंदीत कोरोना महामारीला निमंत्रण देणार्‍या अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधी विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपा तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांनी केली आहे.

तालुक्यातील सादोळा येथे शेतकर्‍यांना पीक कर्जाच्या वाटपा निमित्त मेळावा घेण्यात आला. यावेळी राष्ट्रीयीकृत बँकेचे शाखाधिकारी संदीप कुमार व फिल्ड ऑफिसर बालाजी यांना बोलवण्यात आले. महामारीचे भयंकर संकट घोंगावत असताना आ.प्रकाश सोळंके यांनी यावेळी राजकीय स्टंट केल्याने कर्ज वाटपाच्या निमित्त मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली. या वाढलेल्या गर्दीमुळे राज्यात लागू असलेल्या जमावबंदी आदेशाचे तीन-तेरा वाजले. तर सोशल डिस्टिंगचा ही फज्या उडाला. यामुळे तालुक्यात कोरोना महामारीचा धोका वाढला आहे. एका जबाबदार लोकप्रतिनिधींकडून राजकीय हव्यासापोटी आपल्या नागरिकांनी प्रती बेजबाबदारपणा दिसून येत आहे. अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपा तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांनी केली असून गुन्हे दाखल न केल्यास भारतीय जनता पार्टीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर गर्दी जमवून मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.


सर्वसामान्यांना नियमांच्या कचाट्यात अडकवून आतापर्यंत माजलगाव शहरात अनेकांवर कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कालच शहरातील पाच व्यापार्‍यांवर गर्दी जमवली म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर नियमाची पायमल्ली करणार्‍या एका डॉक्टरसह 15 लोकांवरही मागे गुन्हा दाखल करण्यात झालेले आहेत. होता. सर्वसामान्यांसाठी नियमांचे मोजमाप करणार्‍या प्रशासनासमोर या घटनेतून सत्ताधारी आमदारावर गुन्हे दाखल करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. प्रशासन काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण करताना एका बल्गेरियाच्या पंतप्रधानाकडून दंड वसूल करण्यात आल्याचा दाखला दिला होता. कायद्यासमोर कोणीच मोठं नसल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासन सर्वसामान्यांना जो कायदा लावते तोच कायदा आता लोकप्रतिनिधीला लावते का ते पहावे लागणार आहे.

सुरेश धस यांच्यावर दोनदा गुन्हा नोंद
गर्दी जमवली, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन महिन्यापुर्वी आ.सुरेश धस यांच्यावर देखील प्रशासनाने दोन वेळा गुन्हे दाखल केले आहेत. तर अंबाजोगाईत पापा मोदी यांच्यावर देखील नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता.

परळीत आज कोरोनाचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. एसबीआय बँकेच्या कर्मचार्‍यांनी गावात जाऊन पीक वाटप करण्यासाठी मेळावे घेतले होते. आज परळी एसबीआय शाखेचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाने घेरले आहे. दररोज त्यांच्या संपर्कातील आकडा वाढत जात आहे. परळीची ही घटना ताजी असताना माजलगाव तालुक्यातील सादोळा येथे असाच मेळावा घेण्याचा प्रकार केला. उद्या काही अप्रिय घडले तर त्याला जबाबदार कोण? आ.सोळंके यांना इतकीच जनतेची काळजी आहे तर त्यांनी स्वतःच्या कारखान्याकडील ऊसबीलाचे पेमेंट द्यावे, म्हणजे शेतकर्‍यांना कर्जाची गरज पडणार नाही, असेही भाजपा तालुकाध्यक्ष अरूण राऊत यांनी म्हटले आहे.