paithan crime

अजंता फार्ममधील कामगार नेत्याच्या आत्महत्येचा अखेर उलगडा

क्राईम न्यूज ऑफ द डे मराठवाडा महाराष्ट्र

अजंता फार्ममध्ये केली होती आत्महत्या

चंद्रकांत अंबिलवादे,

पैठण दि.10 : अजंता फार्म कंपनीचे कामगार नेते वैजेनाथ काळे यांनी गळफास लावून केलेल्या आत्महत्येचा अखेर उलगडा झाला आहे. ही आत्महत्या एका ‘नाजूक’ प्रकरणातून झाल्याचे तपासात उघड झाल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी आरोपीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

      कामगार नेत्याने आत्महत्या का केली हा प्रश्न गेले 10 दिवस पैठण परिसरात चर्चीला जात होता. एमआयडीसी ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी अत्यंत गोपनीय तपास करीत एका आरोपीस अटक केली आहे. एमआयडीसी परिसरातील अजंता फार्म कंपनीमध्ये कामगार नेते वैजनाथ काळे यांनी दि 2 जुलै रोजी कंपनीच्या दुसर्‍या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. काळे यांची हत्या की आत्महत्या याविषयी परिसरात जोरदार चर्चा सुरु होती. एक कामगार नेता अंजता कंपनीमध्ये दिवसाढवळ्या आत्महत्या करण्यापर्यंत पाऊल उचलतो अशा घटनेमुळे या कंपनीच्या व्यवस्थापनाच्या राम भरोसे कामकाजामुळे कंपनीतील कामगारांमध्ये चीड व्यक्त करण्यात येत होती. घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आल्यानंतर सदरील कंपनीतील व्यवस्थापनाशी निगडित असलेल्या आठ व्यक्तीचे जवाब सपोनि अर्चना पाटील यांनी नोंदविले होते. ज्या ठिकाणी हे आत्महत्या घटना घडली त्या ठिकाणचे वस्तुनिष्ठ पुरावे व मयत काळे यांचा फुटलेला हँडसेट सापडल्यामुळे प्रकरणात संशय निर्माण झालेला होता. प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार असे वृत्त देखील दैनिक कार्यारंभने प्रकाशीत केले होते. अखेर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी तातडीने मयत कामगार नेता यांचा बाजार सावंगी (जिल्हा जालना) या मूळ गावी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचा जवाब नोंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र मयताची पत्नी व नातेवाईक जवाब देण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर 10 जुलै रोजी मयत वैजनाथ काळे यांची पत्नी व इतर नातेवाइकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली.

काय म्हटले आहे तक्रारीत?
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत वैजनाथ काळे हे एमआयडीसी परिसरातील शैलजानगरमध्ये राहत होते. तसेच अंजता कंपनीमध्ये कामगार मनीष आप्पासाहेब निर्मळ (वय 40) हा देखील लगतच्या म्हाडा कॉलनी येथे राहात होता. निर्मळ याची पत्नी मयत काळे यांच्या मोबाईलवर नेहमी संपर्क करत होती व एसएमएस पाठवत होती. आरोपी मनीष यांनी या प्रकरणाचा आधार घेऊन मयत काळे यांना हे प्रकरण मी उघड करीन अशी धमकी देऊन प्रत्येक वेळेस पैशाची मागणी केली होती. घटनेच्या दिवशी सकाळी (मोबाईल रेकॉर्डवरून) मयत काळे यांना ‘पाच लाख रुपये ताबडतोब व्यवस्था कर’, अशी धमकी देण्यात आली. प्रत्येक वेळेस ब्लॅकमेलिंग करण्यात येत असल्यामुळे वैजेनाथ काळे यांनी आत्महत्या केली. त्यामुळे आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या मनीष निर्मळ (म्हाडा कॉलनी एमआयडीसी पैठण) याच्याविरुद्ध कलम 306 भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस करीत आहे.

अजंता कंपनी ची सुरक्षा वार्‍यावर

एमआयडीसी येथील अजंता कंपनीमध्ये सकाळच्या वेळेस एक कामगारframa company नेता आत्महत्या करतो आणि ही घटना दुपारच्या नंतर उघडकीस आली होती. त्यामुळे या कंपनीची सुरक्षा रामभरोसे असल्याचे स्पष्ट होत असून या आत्महत्या प्रकरणानंतर या कंपनीच्या व्यवस्थापनाने याठिकाणी कामावर असलेले कामगारांना फतवा काढून झालेल्या घटनेची माहिती गोपनीय ठेवण्याचे ताकीत दिली होती. त्यामुळे कंपनीतील कामगार सदरील घटनेविषयी कानावर हात ठेवीत होते. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी शेवटपर्यंत टाळाटाळ केली आहे.

Tagged