‘या’ कारणासाठी फडणवीस आणि राऊतांची भेट

न्यूज ऑफ द डे राजकारण

बीड : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची मुंबईतील सांताक्रुझच्या ग्रँड हयातमध्ये शनिवारी दुपारी तब्बल 2 तास भेट झाली. त्यानंतर राजकीय भुकंप होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. परंतू या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी स्पष्ट केले आहे.

ट्वीटमध्ये केशव उपाध्याय म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली आहे. संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी, अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही, असे उपाध्याय यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या माहितीला आता खुद्द खा.संजय राऊत यांनी देखील दुजोरा दिला असून ही भेट गुप्त नसल्याचेही म्हटले आहे.

Tagged