rajesh tope

नुसत्या ‘सन्माना’ने कोेविड योद्धांचे पोट भरेल का?

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : कोरोनाच्या संकटकाळात नियमित कामाव्यतिरिक्त अतिकालिक परिश्रमही आरोग्य यंत्रणेतील कोविड योद्ध्यांना करावे लागत आहेत. या योद्ध्यांच्या सन्मानाच्या बाता मारणारे राज्यकर्ते मात्र त्यांच्याकडून एखादा दुसरा महिने नव्हे तर तब्बल वर्षभर विनावेतन काम करून घेत आहेत. हा प्रकार राज्यातील सर्वात मोठ्या 1 हजार बेडच्या लोखंडीसावरगाव (ता.अंबाजोगाई) येथील कोविड सेंटरवर कार्यरत कर्मचार्‍यांसोबत घडला आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांमधून संताप व्यक्त केला जात असून आंदोलनचा इशारा देण्यात आला आहे.

   कोविड योद्ध्यांकडून अतिकालिक परिश्रम करून घ्यायचे. त्यांना अपुर्‍या मनुष्यबळ आणि तोकड्या यंत्रणेवर काम मात करून काम करायला भाग पाडायचे. आणि पोकळ गप्पा मारायच्या हे जिल्हा प्रशासनातील आणि राज्यकर्त्यांचे वास्तव आता चव्हाट्यावर येऊ लागले आहे. लोखंडी सावरगाव येथील कार्यरत 11 डॉक्टर आणि 11 नर्सची 2019 मध्ये सप्टेंबर महिन्यात नियुक्ती करण्यात आली. त्याठिकाणी रुग्णालय सुरु नसल्याने जिल्ह्यांतर्गत अन्य शासकीय रुग्णालयात त्यांना प्रतिनियुक्ती देण्यात आली होती. या काळातील वेतन मिळावे म्हणून वारंवार निवेदने देण्यात आलेली आहेत. परंतू अधिकारी, लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने दिली आहेत. वर्षभराचा पगार अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे आता दि.1 ऑक्टोंबर रोजी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसे झाल्यास आरोग्य यंत्रणा विस्कळीत होईल त्यामुळे तातडीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लक्ष देऊन गांभीर्यपूर्वक हा प्रश्न मार्गी लावावा. तातडीने वेतन देऊन कोविड योद्ध्यांचा खरा सन्मान करावा असेही शेवटी पत्रात आमदार नमिता मुंदडा यांनी म्हटले आहे. दरम्यान, नुसत्या ‘सन्माना’ने कोेविड योद्धांचे पोट भरेल का? असा प्रश्न देखील संतप्त कर्मचार्‍यांनी उपस्थित केला आहे.

पालकमंत्र्यांचे आश्वासनही हवेत विरले
लोखंडीसावरगाव येथील कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी 15 दिवसात कर्मचार्‍यांचा वेतनाचा प्रश्न मार्गी लागेल असे सांगितले होते. मात्र ते आश्वासनही हवेत विरले आहे.

Tagged