दक्षता जनजागृती सप्ताहात तक्रारदारांचा केला सत्कार
बीड दि.6 : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, दक्षता जनजागृती सप्ताह 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या दरम्यान जिल्ह्यात राबवण्यात आला. या उपक्रमाचा समारोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड येथील कार्यालयात रविवारी (दि.6) संपन्न झाला. यावेळी बीड उपाधीक्षक शंकर शिंदे, भागवत वराट, साखरे, पोलीस निरीक्षक अमोल धस, रविंद्र परदेशी आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना शंकर शिंदे म्हणाले की, या सप्ताह दरम्यान मोठ्या प्रमाणात जनजागृती केलेली आहे. सामान्य माणसांना लोकसेवकाकडून नाहक त्रास दिला जातो. परंतु अनेकजण तक्रार करत नाही. तक्रारदार वाढल्याशिवाय आम्हाला काम करता येत नाही. त्यामुळे लाचेची मागणी केल्यास थेट संपर्क करण्याची गरज आहे. आमचे काम वाढले म्हणजे भ्रष्टाचार कमी होणार नाही. शिक्षाचे प्रमाण वाढण्याची गरज आहे. त्याशिवाय लाचखोरांना लाच घेतल्याच्या गुन्ह्याची जाणीव होणार नाही. आपली पूर्ण कारवाई गोपनीय असते, त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नसल्याचे उपाधीक्षक शंकर शिंदे यांनी सांगितले. हा कार्यक्रम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अपर अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी एसीबी विभागाच्या सुरू असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच भ्रष्टाचार मुक्त जिल्हा करण्यासाठी सर्व नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यासाठी लाच देणे हा गुन्हा असून कुठेही आपण लाच मागितल्यास थेट एसीबी विभागाकडे तक्रार करावी, आपले नाव गोपनीय राहील व संबंधित लोकसेवकावर कारवाई केली जाईल. असेही सांगितले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोह. सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, भारत गारदे, हनुमंत गोरे, अविनाश गवळी, राजेश नेहरकर, अमोल खरसाडे, राठोड, निकाळजे, कोरडे, खेत्रे, म्हेत्रे आदींची उपस्थिती होती.