SOLAPUR NAVARDEO MORCHA

मुलगीच मिळेना… मुंडवळी बांधून भावी नवरदेवांचा कलेक्टर ऑफिसवर मोर्चा

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

सोलापूर दि.21 : वय उलटून गेले तरी लग्नासाठी मुलगीच मिळत नसल्याने सोलापूर येथील तरूणांनी चक्क कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला. मोर्चेकरी चक्क फेटे बांधून मंडवळी बांधून, घोड्यावर स्वार झालेले होते. त्यांच्या हातात मुलगी देता का मुलगी म्हणून पाट्या होत्या. ज्योती क्रांती परिषदेच्या मध्यामातून काढलेल्या या मोर्चात शेकडो तरुण सहभागी झाले होते.
आज सकाळी शेकडोंच्या संख्येने घोड्यावर बसलेले, डोक्याला फेटा आणि कपाळावर मुंडावळे बांधलेले नवरदेव सोलापूरच्या रस्त्यावर चालू लागले. अचानक एवढ्या मोठ्या संख्येने नवरदेव रस्त्यावर दिसल्यानं यामागचं नेमकं काय कारणं हे सुरुवातील शहरवासियांना उलगडतं नव्हतं. मात्र काही वेळातचं हा नवरदेवांचा मोर्चा असल्याचं लक्षात आलं. मोर्चातील नवर्‍या मुलांच्या हातात कोणी मुलगी देतं का? असा प्रश्न असलेले फलकही होते.

दरम्यान, प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे, सरकारकडून कायद्यांची व्यवस्थित अंमलबजावणी होत नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवली असा आरोप ज्योती क्रांती परिषदेचे संस्थापक रमेश बारसकर यांनी यावेळी केला. बेकायदा होणार्‍या गर्भापातामुळे मुलांवर लग्नासाठी मुलगी मागण्याची वेळ आली आहे, असंही ते म्हणाले.
सरकारने वेळोवेळी कायदे केले, पण त्या त्या कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही. गर्भलिंग निदान कायद्याची चाचणी कायद्याची यशस्वी अंमलबजावणी केली असती तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. आज मुलींची संख्या वाढली असती. महाराष्ट्राचा विचार केला तर आज 1 हजार मुलांच्या मागे 889 मुली आहेत. देशाचा विचार केला तर 1 हजार मुलांमागे 940 मुली आहेत. केरळ साक्षर राज्य असल्यामुळे तिथं मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे.
हे महाराष्ट्र राज्य तर शाहु-फुले-आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य आहे. तरीही इथं मुलगा आणि मुलगीमध्ये भेदभाव केल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज 2022 आहे. 2032 मध्ये, 2042 मध्ये 2052 मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. मुलींना रस्त्यावरुन फिरायचं अवघड होईल. त्यामुळे यावर सरकारने आताच उपाययोजना करायला हव्यात.
आज अनेक एजंटचा सुळसुळाट झालेला आहे. दोन लाख दे, तुझं लग्न लावून देतो. लग्न होतं पण चार-पाच दिवसातच मुलगी घरातील चार-पाच लाख रुपये घेऊन पळून जाते. मुलगा तक्रार करायला जातो पण तक्रार कोण घेत नाही. मग याबद्दल सरकार हा प्रश्न गांभीर्याने का घेत नाही? हा प्रश्न आमच्यापुढे आहे. त्यामुळे आम्ही आज लग्नासाठी मुलगी मागायला सरकारच्या दारात आलो आहोत.

Tagged