पाऊणे पाच लाखांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षकासह जमादार चतुर्भूज

क्राईम न्यूज ऑफ द डे मराठवाडा

पैठण : तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्यातील वाळू चोरीच्या गुन्ह्यात जप्त वाळू साठ्याची लिलावाप्रमाणे वाहतूक करण्यासाठी 4 लाख 75 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ठाण्यात शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली.

   सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे (रा.औरंगाबाद), जमादार बाबासाहेब दिलवाले (रा.बिडकीन) असे लाचखोर पोलीस अधिकार्‍यांची नावे आहेत. त्यांनी तक्रारदारास जप्त वाळू साठ्याची लिलावाप्रमाणे वाहतूक करण्यासाठी 4 लाख 75 हजार रुपयांची लाच मागितली होती. परंतू तक्रारदारांनी औरंगाबादच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविल्याने विभागाच्या प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ.जमादार यांच्या सूचनेवरून जालन्याच्या पथकाने शनिवारी सायंकाळी सापळा रचला होता. या पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक एस.एस.ताठे यांच्यासह कर्मचार्‍यांनी पोलीस अधिकार्‍यासह जमादारास लाच स्वीकारताना पोलीस ठाण्यात सापळा लावून पकडले. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे पैठण तालुक्यातील पोलीस वर्तुळात खळबळ उडाली होती.

आठ दिवसांपूर्वीच झाला होता ट्रॅप
औरंगाबाद जिल्ह्यातील एका पोलीस निरीक्षकावर आठ दिवसांपूर्वीच ट्रॅप झाला होता. त्यानंतर शनिवारी पुन्हा एक कारवाई झाल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली असून वाढत्या लाचखोरीमुळे पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे.

एसपींच्या सूचनांना केराची टोपली
गत आठवड्यातील लाचखोरीच्या प्रकरणानंतर औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सर्व पोलीस ठाणे प्रमुखांची बैठक घेऊन लाचखोरी रोखण्याचे जाहीररित्या आवाहन केले होते. त्यांच्या सूचनेला केराची टोपली दाखवत अधिकार्‍यांनी लाच घेण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे.

Tagged