majalgaon dam

माजलगाव धरणात बेपत्ता झालेल्या ‘त्या’ जवानाकडे पाच तासाचा बॅकअप

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र माजलगाव

प्रतिनिधी । माजलगाव
दि.19 : बचावकार्या दरम्यान माजलगाव धरणातील पाण्यात बेपत्ता झालेल्या जवानाच्या बचावासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. स्वतः जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे देखील धरणात उतरून पाहणी करीत जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दरम्यान बेपत्ता जवानाकडे आणखी ऑक्सिजनचा बॅकअप प्लान असून तो किमान पाच तास त्यावर राहू शकेल, अशी माहिती एनडीआरएफच्या जवानांनी दिली. त्यामुळे हा जवान सुखरूप परत यावा म्हणून माजलगावकर त्यासाठी प्रार्थना करीत आहेत.
सकाळी पावणे अकरा वाजता हा जवान डॉ. फपाळ यांचा मृतदेह शोधण्यासाठी पाण्यात उतरलेला होता. मात्र काही वेळात तो मच्छिमारांनी मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात अडकला. पाण्याच्या वर असलेल्या जवानांना ही धोक्याची सुचना मिळल्यानंतर त्यांनी त्या जवानाच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. त्याच दरम्यान आणखी एक जवान मच्छिमारांनी लावलेल्या जाळ्यात अडकला. त्याला सुखरूप बाहेर काढण्यात जवानांना यश आले. मात्र दुसर्‍या जवानाला बाहेर काढताना त्याचा ऑक्सिजन सिलींडर निघाला. त्यामुळे इतर सर्वचजण चिंतेत आहे. परंतु एनडीआरएफ जवानांनी दिलेल्या माहितीनुसार या जवानाकडे बॅकअप प्लान आहे. त्यामुळे पुढील पाच तास तो या बॅकअप प्लानच्या मदतीने बाहेर येऊ शकतो. त्यामुळे तो सुखरूप बाहेर यावा म्हणून सर्वच जण देवाकडे प्रार्थना करीत आहेत.

औरंगाबादच्या पथकाला पाचारण
दरम्यान जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी माजलगाव धरणावर आल्यानंतर वरीष्ठ प्रशासनाकडे मदत मागीतली आहे. आता अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सज्ज असलेली टिम माजलगावकडे येत आहे. या टिमकडे अत्याधुनिक कॅमेरे असून त्याचा निश्चितच मदतकार्यासाठी फायदा होईल. दरम्यान अन्य काही ठिकाणाहून देखील जिल्हाधिकार्‍यांनी मदत मागीतली असून हेलीकॉप्टरद्वारे काही जवान माजलगावात पोहोचण्याची शक्यता आहे.

धरणात वेड्या बाभळी आणि मच्छिमारांचे जाळे
माजलगाव धरणात ज्या ठिकाणी डॉ. फपाळ बुडाले तेथील पाण्याखाली प्रचंड मोठ्या प्रमाणात काटेरी वेड्या बाभुळींची मोठी मोठी झुडूपं आहेत. त्यात मच्छिमारांनी इतस्तत फेकलेले जाळे देखील या बाभळींना अडकलेली आहेत. याच सगळ्या जंजाळात हे जवान फसल्याचे बोलले जात आहे.

जिल्हाधिकारी स्वतः पोहोचले धरणात
दरम्यान जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे स्वतः बोटीद्वारे धरणात पोहोचले आहेत. त्यांच्या भेटीने जवानांचे मनोधैर्य वाढलेले आहे. दरम्यान या मदत कार्यात पाऊस येत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. स्थानिक भोई देखील यावेळी मदत कार्य करीत आहेत.


Tagged