नावातच धनं‘जय’

न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेदरम्यान ना. जयंत पाटील साहेब यांच्यासोबत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ना. धनंजय मुंडे साहेब जयंत पाटलांच्या नावात सुरुवातीलाच ‘जय’ आहे आणि माझ्यात नावात तो शेवटी आहे त्यामुळे कदाचित मला ‘जय’ मिळवण्यासाठी बराच काळ संघर्ष करावा लागला असे म्हणाले. हल्ली काही जण स्वतःचा वारसा हक्क सांगत स्वकीयांशी जय मिळवण्यासाठी धर्मयुद्ध करताना दिसत आहेत. पण राजकारणात जय मिळवण्यासाठी केवळ वारसा हक्क नाहीतर त्याला दैदिप्यमान कर्तृत्वाची जोड लागते. धनंजय मुंडे साहेबांच्या गेल्या 25 वर्षांच्या कारकिर्दीचा बारकाईने अभ्यास केल्यास त्यांचा उशिरा झालेला जय हा त्यांच्या कर्तृत्व सिद्धतेचा परिपाक आहे हे वेगळं सांगायची गरज भासत नाही.

कर्तृत्व त्याच्याच हातून घडत असतं जे ते पार पाडायची इच्छाशक्ती ठेवतात आणि ते पूर्ण करण्यासाठी कठीण रस्त्यावर चालायचं धाडस करतात! थोडक्यात काय तर राजकीय जीवनात मोठं व्हायचं असेल तर थेट लोकांशी घट्ट नाळ जोडावी लागते. धनंजय मुंडे यांचे नेतृत्व जनतेशी घट्ट नाळ जोडून कसे उभे आहे याचे एक जिवंत उदाहरण सांगतो, धनंजय मुंडे साहेबांनी त्यांच्या वाटचालीत सुमारे 11 वेळा सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करून जवळपास 1200 भगिनींचे कन्यादान केले. कोरोना काळात सामुदायिक विवाह सोहळाच काय, कुठलाच कार्यक्रम घेणे शक्य नव्हते; मग दीड वर्षात आपत्तीने त्रासलेल्या लोकांना त्यांच्या कुटुंबातील लग्नासाठी दिलासा देण्याचा विचार करत सामुदायिक विवाह सोहळ्याचे उत्तरदायित्व धनुभाऊंनी वेगळ्या पद्धतीने पार पाडले. कोविड बाधित होऊन गेलेल्या 175 गरीब व गरजू कुटुंबातील लग्नांना धनुभाऊंनी थेट आर्थिक मदत केली. कोरोनामुळे मरतो की वाचतो अशी आमची परिस्थिती होती, त्यात घरात मुलीचे लग्न अशावेळी न मागता धनुभाऊंनी आमच्या लेकीच्या लग्नाला पैसे दिले, ही मदत आमच्यासाठी लाख मोलाची आहे’ असे म्हणत एका माउलीने डोळ्यात पाणी आणून व्हीडिओ कॉल करून भाऊंना आशीर्वाद दिले. ही नाळ लोकांशी जोडणे हर किसिके बस की बात नही. राजकारणात टीका होतात, पदे येतात आणि जातात, परंतु लोकाभिमुख काम करणार्‍या नेतृत्वाला संघर्ष व संकट अटळ असते. पण संघर्षाच्या वाटेवर चालून आलेल्या संकटाचे संधीत रूपांतर करण्याचे कौशल्य ज्याला असते तोच लोकमान्य नेता ठरत असतो. ‘बंजर धरती मे बहार न खिलाई तो धनंजय मुंडे नाम बदल कर रख दूँगा।’ असे पक्षश्रेष्ठीना ठणकावून सांगणारे धनंजय मुंडे हे प्रभावी वक्ते, उत्तम संघटक म्हणून राज्यभर लोकप्रिय आहेत. अलीकडच्या कोविडच्या काळात आलेल्या संकटाला संधी मानत त्यांनी प्रशासकाची जी भूमिका बजावली त्यातून ते एक कुशल प्रशासक व पालक सिद्ध होत आहेत. कोविडच्या पहिल्या व दुसर्‍या दोन्ही लाटेत बीड जिल्ह्याने नेटाने संघर्ष केला. पण देशाबाहेर जागतिक स्तरावर कौतुक झाले ते बीड जिल्ह्यात अगदी सुरुवातीला अंमलबजावणी केलेल्या कडक लॉकडाऊनचे! मार्च मध्ये राज्यात आलेला कोरोना बीड जिल्ह्याने जून पर्यंत वेशीबाहेर ठेवला होता. त्याचे कारण होते त्व धनंजय मुंडे यांचे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून उत्कृष्ट नियोजन. तो काळ आठवला की विरोधकांनी लॉकडाऊन काळात केलेलं राजकारण आणि टीका आठवल्याशिवाय राहत नाही. पण जिल्ह्याच्या बैठकीत, ‘प्रशासकीय अधिकारी चांगले काम करत असतील तर लोकप्रतिनिधींनी त्यांना जाहीर सहकार्य करावे, त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि चुका होत असतील तर त्या खाजगीत सांगाव्यात, सूचना कराव्यात’ असा सल्ला मुंडेंनी बहाद्दर विरोधकांना दिला. ते सुधारले नाहीत हा भाग वेगळा! पण आजही लॉकडाऊनचे नियोजन आणि दीड लाख ऊसतोड कामगारांचे केलेले यशस्वी स्थलांतर याची चर्चा अंतरराष्ट्रीय स्तरावर होताना दिसते आहे. त्यातून विरोधकांना उपरती आली तर देव पावला! लोकांशी नाळ घट्ट कशी ठेवता येते याचे मूर्तिमंत उदाहरण धनुभाऊंनी कोविड काळात दाखवुन दिले. दुसर्‍या लाटेत जेव्हा रेमडीसीविर आणि ऑक्सिजनसाठी मारामारी व्हायची वेळ आली होती त्याकाळात आमचे धनुभाऊ लोकांना फुकट इंजेक्शन वाटत होते! जिथून उपलब्ध होईल, जितक्या किमतीत होईल तितक्या किंमतीत परळीतील रुग्णांना धनुभाऊंनी मोफत रेमडीसीविर पोहोच केले. परळीतच काय जिल्ह्यात अनेक ठिकाणी दररोज धनुभाऊंवर टीका करणार्‍या विरोधकांनीही खाजगीत पाय धरून इंजेक्शन नेले. कोणतीही अट न घालता, कोणताही आकस न बाळगता विरोधकांनाही जीवन संजीवनी मोफत देणारा नेता बीड जिल्ह्यात तरी दुसरा कोणी नाही!
काही ठिकाणी रुग्णालयात नातेवाईकांची होणारी गर्दी व त्यामुळे संसर्गाचा वाढता धोका पाहुन भाऊंनी सेवाधर्म सुरू केला. या सेवधर्माची चर्चा राज्यात झाली. प्रत्येक रुग्णालयात भाऊंनी आपले कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून नेमले. त्यांची सर्व काळजी घेत त्यांना रुग्णांच्या नातेवाईकांना करावी लागणारी कामे करण्याची जबाबदारी दिली. रुग्णांना नाष्टा, जेवण देखील भाऊंकडून मिळू लागले. लस घ्यायला यायला जायला गाडी पण भाऊंचीच! जागोजागी मदत केंद्र उभारले, आरोग्य कर्मचार्‍यांना जेवण आणण्यासाठी टिफीन बॉक्स पासून ते विमा पॉलिसी पर्यंत भाऊंनी सोय करून दिली! परळीत ज्या कुटुंबांनी कोविडचा सामना केला ते उपचार केलेले डॉक्टर व धनुभाऊ ही दोन नावे कधीच विसरणार नाहीत.

सतत लोकांत राहून दोनवेळा कोविडची लागण..
या काळात धनुभाऊ एकही दिवस घरी बसले नाहीत, दर आठवड्याला शेकडो किलोमीटरचा प्रवास, हजारो लोकांच्या भेटी, हजारो प्रश्नांची सोडवणूक या सर्व बाबी करत असताना त्यांना एक नाही तर दोन वेळा कोविडची लागण झाली. उपचारातून ते बरे झाले खरे परंतु त्यांना आजही शारीरिक त्रास होतो. पण ज्या माणसाने सबंध जिल्ह्याला आपला परिवार मानून त्यांना आपले जीवन समर्पित केले आहे, त्यांना कोणताही शारीरिक त्रास, इजा, आजार लोकांपासून दूर ठरू शकत नाही! मुळात लोकांत जाऊन कामात मग्न राहिल्याशिवाय त्यांनाच करमत नाही, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. दोन्ही वेळा हजारो लाखो लोकांनी भाऊसाठी प्रार्थना केल्या, दोन्ही वेळ त्यांनी कोविडवर मात करत पुन्हा लोकसेवेला सुरुवात केली.

ऊसतोड कामगारांचा वाली आणि वाणी..
स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाने समाजातील विविध स्तरातील अनेकांचे नुकसान झाले. पण सर्वात मोठे नुकसान झाले ते राज्यातील लाखो ऊसतोड कामगारांचे! स्व. साहेब त्यांचे वाली होती, त्यांच्या पिचलेल्या आवाजाला सरकार दरबारी बुलंद करणारी वाणी होते. त्यांच्या अकाली निधनानंतर लाखोंच्या संख्येतील भोळा भाबडा ऊसतोड कामगार म्हणजे आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी एक मोठी संख्या आहे असे म्हणून अनेकांनी त्यांच्या नेतृत्व बनण्याच्या नावाने आपली दुकाने थाटली. पण आपली शक्ती दाखवण्यासाठी संख्या म्हणून वापर करण्याखेरीज कुणालाही काही ठोस करता आलं नाही. मागील भाजप सरकारने ऊसतोड मजुरांसाठी एक शासन निर्णय घाईघाईत केला होता, त्यातील एक डोक्यात संताप आणणारी योजना वाचून कुणालाही राग आला असता. ती अशी होती, की ऊसतोड मजूर ऊसतोडणी करन्यासाठी स्थलांतरित असताना त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी अर्थसहाय्य! बरं झालं ते सरकार गेलं! नवीन सरकार मध्ये मंत्री होताच धाकल्या मुंडे साहेबांनी ऊसतोड कामगारांच्या नावाने असलेल्या महामंडळाचा कारभार आपल्या खात्याकडे घेतला. बारकाईने प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून या महामंडळास महाराष्ट्रात साखर उद्योग अस्तित्वात असेपर्यन्त निधी कमी पडणार नाही अशी व्यवस्था त्यांनी केली. ग्रामीण भागातील बहुजन समाजाला शिक्षणाचा मार्ग दाखवणार्‍या संत भगवानबाबांच्या नावाने धनुभाऊंनी शासकीय वसतिगृह योजना सुरू केली. या बीड जिल्ह्यात सर्वाधिक 12 वसतिगृह त्यांनी मंजूर केले. आजवर पहिल्यांदाच या महामंडळाला भागभांडवली खर्चासाठी निधीची तरतूद सुद्धा झाली! ऊसतोड कामगारांना त्यांच्या कष्टाचे योग्य मोल मिळावे, त्यांचे व कुटुंबाचे आरोग्य इथपासून ते त्यांची मुलं शिकून मोठी व्हावीत, उसतोड्याची आर्थिक उन्नती होऊन हातातला कोयता कायमचा सुटावा इथपर्यंत स्वप्न पाहून ती पूर्ण करण्यासाठी एक एक पाऊल टाकणारे धनंजय मुंडे आता या ऊसतोड मजुरांचे वाली आणि वाणी सिद्ध होत आहेत, आजमितीला ही बाब कोणीच नाकारू शकत नाही.

एमआयडीसी येणार आणि जिल्ह्याची स्थिती बदलणार…
परळी तालुक्यातील शेकडो एकर शासकीय जागेत पंचतारांकित एमआयडीसी उभारावी हे तीन दशकांपासूनचे सर्वांचेच स्वप्न; आज ते पूर्ण करण्याचा विडा उचलून भाऊंनी प्रक्रिया सुरू केली. मंजुरी मिळून नोटिफिकेशन निघाले. पहिल्या टप्प्यात 35 हेक्टर जागा औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित झाली. इथे उद्योगांना व गुंतवणुकीला चालना मिळावी यासाठी धनंजय मुंडे आता प्रयत्नात आहेत. भविष्यात या एमआयडीसीचे स्वरूप पंचतारांकित असणार आहे. यातून परळीच नव्हे तर सबंध बीड जिल्ह्यातील तरुणाईला मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.

दूरदृष्टी असलेलं नेतृत्व…
एकीकडे कोविड सोबत आणखी लढा सुरूच आहे, त्यात तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन कोट्यावधी रुपये खर्चून जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याचा उपक्रम धनंजय मुंडे साहेबांनी सुरू केला आहे. थर्मलमध्ये गरम पाण्याला थंड करणे व त्यात शेवाळ किंवा घाण साठू नये यासाठी ऑक्सिजन प्लांट असतो, तो ऑक्सिजन प्लांट इमर्जन्सी आहे म्हणून रुग्णालयात बसवला जाऊ शकतो का, असा विचार करून तो सत्यात उतरवला आणि परळीच्या थर्मल मधील ऑक्सिजन प्लांट अंबाजोगाईच्या एसआरटी वैद्यकीय महाविद्यालयात शिफ्ट करून केवळ 12 दिवसात उभा राहिला. तेव्हा ऊर्जा विभागाच्या व प्रशासनाच्या देखील हे लक्षात आलं त्यांनी हा प्रयोग पायलट प्रोजेक्ट मानत इतरत्रही सुरू केला. उर्जामंत्री व ऊर्जा राज्यमंत्री यांनी देखील ना. धनंजय मुंडे यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना एका शासकीय बैठकीत प्रशासनातील काही कामचुकार अधिकार्‍यांना धारेवर धरताना साहेब म्हणाले, ‘हे बघा, प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्वाचा आहे, तो वाचविणे तुमची आणि माझी देखील जबाबदारी आहे. हा प्रसंग सगळ्यांसाठी त्यांच्यातील कौशल्याची परीक्षा घेणारा आहे. तेव्हा आपल्यातील कौशल्य पणाला लावून तुम्ही तुमचे काम करा, मी माझे करतो’ त्यानंतर जिल्ह्यात एकही दिवस ऑक्सिजनचा तुटवडा भासला नाही. या काळात आमच्याकडे घरात बसून, उंटावरून सरकारला सल्ले देणारे, टीका करणारे अनेक नेते होते व आजही आहेत. पण धनंजय मुंडे साहेबांनी मात्र सबंध जिल्हा आपले कुटुंब म्हणत अत्यंत संवेदनशील निर्णय घेतले.
शेवटी कसय ना, उंटावर बसून शेळ्या राखणे हा वेगळा भाग परंतू ज्या माणसाची नाळ जनतेशी घट्ट जोडलेली आहे, तो माणूस आपल्या लोकांना संकटात वार्‍यावर सोडून याच्या-त्याच्या वर टीका करत बसूच शकत नाही. तो माणूस, ‘आम्ही प्रयत्न करत आहोत तुम्हीही शक्य असेल ती मदत करा’ असे आवाहन विरोधकांनाही करतो! आणि विरोधक एकेरीवर टीका करण्यात व्यस्त राहतात. शेवटी जनतेचे प्रेम आणि नेत्याचे कर्तृत्व स्वयंसिद्ध होते आणि विरोधक मात्र चर्चा आणि ठिकाणचे गुर्‍हाळ चालवत बसतात. गीतेतील ‘न मे कर्म फल स्पृह:’ या ओळीप्रमाणे कोणत्याही फळाची अपेक्षा न करता जो केवळ कार्य-कर्तृत्वाच्या जीवावर मार्गक्रमण करत असतो, यश त्याच्या पदरी आपोआप येतच असते! म्हणूनच वर म्हटलं की नावात ‘जय’ शेवटी असला तरी विधानसभेतील विजय असेल किंवा अन्य उपलब्धी, त्या कर्तृत्व सिद्ध करून मिळालेल्या आहेत. अशा स्वयंसिद्ध, यशस्वी, कर्तृत्ववान नेतृत्वाला जन्मदिनानिमित्त माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा! साहेब, आपले नाव घेण्यापूर्वी विशेषणे कमी पडावीत, आपणास, यश, कीर्ती व उत्तम आरोग्य लाभो हीच ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबांच्या चरणी प्रार्थना…
प्रासंगिक : सुधीर सांगळे

Tagged