प्रत्येकाला आपलंसं वाटणारं नेतृत्व : धनंजय मुंडे

न्यूज ऑफ द डे बीड

सान्निध्यात काम करणं हे माझं भाग्य…

सुरुवातीला खंडू हे जरा बघ रे… म्हणून सौम्य वाटणारा आवाज एखाद्या सामान्य माणसाच्या कामासाठी क्षणातच खंडू लाव रे तो फोन… असे म्हणत धीरगंभीर होतो, काही क्षणात समोरच्या व्यक्तीचे काम मार्गी लागले याचे समाधान चेहर्‍यावरून स्पष्ट दिसणारा तो व्यक्ती मार्गस्थ होतो आणि गंभीर झालेला आवाज माणूस बदलला की परत सौम्य होतो! त्यामुळे भेटायला येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला ते आपलेसे वाटू लागतात. होय, मी दररोज अनुभवत असलेले ना. धनंजय मुंडे साहेब यांनी माणसं जपण्याची व त्यांना आपलंसं करण्याची ही कला गेल्या कित्येक वर्षांपासून जपली आहे.

मी फार लेखक वगैरे नाही पण माझ्या साहेबांवर लिहायचंच ठरवलं तर एक मोठा ग्रंथ तयार होईल इतका काळ मी साहेबांच्या सान्निध्यात घालवला आहे. एका लोकमान्य लोकनेतृत्वाच्या सान्निध्यात इतका वेळ घालवता आला हे मी माझं भाग्यच समजतो. सुरुवात साधारण सन 1997-98 साली अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्यात मला ग्रीनबेल्टचे नेते मा दिलीपराव भिसे यांनी माझे दैवत स्व.पंडितआण्णा व स्व. सुखदेवदादा यांना सांगुन मला रोजनदारीवर नोकरीवर लावले या नंतर मला दैवत स्व.पंडितआण्णा नी 2000-2001 साली मला दैवत स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार्‍या पन्नगेश्वर सहकारी साखर कारखान्यात नोकरी लावली होती. धनंजय मुंडे यांचा माझ्यावर अतिप्रचंड विश्वास आणि तो विश्वास हीच माझी शिदोरी आहे व ती अखेरच्या श्वासापर्यंत जपून ठेवणं ही माझी जबाबदारी व कर्तव्य देखील आहे.

सन 2005/06 साली केज बाजार समिती निवडणुकीची जवाबदारी…
2007 साली मोठ्या विश्वासाने मला साहेबांनी जिल्हा परिषद निवडणुकीत ए बी फॉर्म वाटपाची महत्वाची जबाबदारी दिली. तसं पाहिलं तर मी एका सर्वसामान्य शेतमजुरी करणार्‍या कुटुंबातील सामान्य मुलगा, विशेष म्हणजे साहेबांच्या मतदारसंघाच्या बाहेरील केज तालुक्यात बनसारोळा हे माझं गाव, ओण तरीही साहेबांनी मला जवळ केलं. माझ्यावर विश्वास टाकत मला संधी दिली. एवढंच नाही तर लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब 2009 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार असताना संपूर्ण केज तालुक्यातील प्रचार यंत्रनेसंदर्भातील जबाबदारी साहेबांनी माझ्यावर सोपवली. मी नेटाने काम करत राहिलो आणि साहेबांच्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षाचा मी साक्षीदार झालो. स्व. अण्णा व साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मी कारखान्यातील नोकरी सोडायचे ठरवले. त्यावेळी अनेकांनी मला वेडे ठरवले. पण मी निर्णयावर ठाम राहिलो आणि माझा निर्णय योग्यच होता हे नियतीने सिद्ध केलं. नवीन पक्षात जाताच साहेबांच्या कार्यशैलीचा आलेख चढता झाला. पण त्या काळात नाना प्रकारची संकटे वेगवेगळ्या प्रकारचा संघर्ष साहेबांना करावा लागला. पण जीवनात संघर्ष करणे व आलेल्या बिकट परिस्थितीचे संधीत रूपांतर करणे हे आमच्या साहेबांचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. सन 2009 दरम्यानच्या काळात मी व माझ्या कुटुंबाने साहेबांच्या स्वभावातील कुटुंब वत्सलपणा अनुभवला. माझ्या मुलाच्या साध्या जावळाच्या कार्यक्रमाला साहेब घरी आले, एवढं मोठं नेतृत्व पण त्यांच्यातील ही माया मला वेड लाऊन गेली. काही महिन्यांपूर्वी मी व माझे संपूर्ण कुटुंब कोविड पॉझिटिव्ह झालोत, त्या काळातही साहेबांनी मी व माझ्या परिवारातील सर्व सदस्यांची आमचे कुटुंब प्रमुख म्हणून काळजी घेतली. साहेबांनी सर्वांची विचारपूस केली नाही असा एकही दिवस गेला नाही. शरीरातील भयावह विषाणूशी लढताना साहेबांचा आधार माझ्यासाठी मोठा दिलासा ठरला! कोविडच्या कठीण दीड वर्षाच्या काळात साहेबांचा हा कुटुंब वत्सलपणा मीच नाही तर संपूर्ण परळी मतदारसंघाने अनुभवला. अलीकडच्या काळात ऑक्सिजन तुटवडा जाणवत असे, त्यावेळी अनेक रात्री आम्ही जागून काढल्या. ऑक्सिजनचे एक एक सिलेंडर, एक एक टँकर ठरलेल्या ठिकाणी पोचेपर्यंत अक्षरशः जीपीएस प्रमाणे आम्ही त्याचे ट्रॅकिंग केले. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ या ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात साहेबांनी या दीड वर्षात कोट्यावधी रुपयांचे आधुनिक साहित्य व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. अगदी दोन दिवसात 100 ऑक्सिजनचे बेड रुग्णालयात उभारण्यात आले. या प्रत्येक गोष्टींचे साहेब स्वतः मॉनिटरिंग करत असत. एखादी जरी चूक झाली तर रुग्णालय प्रशासन व मला धारेवर धरत, दुसर्‍या लाटेत जेव्हा रुग्णासंख्या व मृत्युदर आलेख वाढला, साहेबांनी ’खंडू तू स्वाराती मधून हालायचं नाही, इथेच बसून कामकाज करायचं’ असा आदेश दिला. ’प्रत्येक व्यक्तीच्या जीवाची जबाबदारी आपली आहे,’ असे ठणकावून सांगणारा, नेता मी दुसरा पाहिला नाही आयुष्यात! रुग्णालय प्रशासन असेल किंवा जिल्ह्याचे प्रशासन साहेबांनी माझ्यासारख्या गरीबाच्या लेकराला मोठ्या विश्वासाने विधायक जबाबदारी नेमून दिली. त्यांचा स्वीय सहाय्यक म्हणून काम करत असताना साहेबांचा विश्वास जपत लोकांशी निगडित कामे करत असताना अनेक बरे वाईट अनुभव येतात. पण साहेबांच्या व्यक्तिमत्त्वातील मोठेपणा या सर्व अनुभवापुढे फिका पडतो. जन्मदिनानिमित्त माझ्या साहेबांना शुभेच्छा देताना त्यांनी आजवर केलेला संघर्ष डोळ्यासमोर चित्र स्वरूपात उभा राहतो आणि डोळे आजही पाणावतात! माझ्या साहेबांना उदंड आयुष्य लाभो व आयुष्यभर मला साहेबांचे सान्निध्य लाभो हीच ग्रामदैवत बनेश्वराला प्रार्थना…
-खंडू विठ्ठलराव गोरे, स्वीय सहाय्यक, मंत्री धनंजय मुंडे.

Tagged