मुंडेंच्या निवासी शाळा, वसतिगृहात भ्रष्टाचाराचा ‘विक्रम’

केज न्यूज ऑफ द डे बीड

राशन घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती-पिंटू ठोंबरे

बीड : भ्रष्टाचाराचा ‘विक्रम’ केलेल्या आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम मुंडे हे अध्यक्ष असलेल्या रेणुका माता कृषी विकास प्रतिष्ठान अंतर्गत येणार्‍या सात निवासी शाळा व मागासवर्गीय वसतिगृहांमध्ये राशन घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात पंचायत समितीचे माजी सदस्य पिंटू ठोंबरे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे दि.९ मार्च रोजी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी दोन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. या समितीने चौकशी पूर्ण करून १५ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाअंतर्गत येणार्‍या निवासी शाळा, वसतिगृहांना विविध योजनेतून राशन पुरविले जाते. याच योजनांचा लाभ केज तालुक्यातील देवगाव येथील रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान अंतर्गत येणार्‍या काही निवासी शाळा व वसतिगृहांनी उचलला आहे. देवगाव येथील ज्ञानोबा मुंडे मागासवर्गीय वसतिगृह, शिंदी येथील रेणुकामाता मागासवर्गीय वसतिगृह, विडा येथील राजा हनुमान वसतिगृह ही तिन्ही वसतिगृहे केवळ कागदोपत्री सुरू असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या वसतिगृहात बोगस विद्यार्थी संख्येच्या आधारे व बोगस जाती दर्शवून शासनाच्या विविध योजनेअंतर्गत वर्षानुवर्षे कोट्यवधी रुपयांचा निधी हडप करण्यात आला आहे. तसेच, रेणुकामाता प्रतिष्ठानअंतर्गत शासनाची मान्यता नसलेल्या वाघेबाभुळगाव येथील विश्वनाथ दराडे निवासी शाळा, विडा येथील रामकृष्ण महाराज निवासी शाळा, केळगाव-बेलगाव येथील गजेराम मुंडे निवासी शाळा, पिंपळगव्हाण येथील रामकृष्ण महाराज निवासी विद्यालय या चारही निवासी शाळांमध्ये बोगस विद्यार्थी संख्या दाखवून राशनसह इतरही माल उचलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून अस्तित्वातच नसलेल्या संबंधित तीन मागासवर्गीय वसतिगृहांसाठी दर महिन्याला शेकडो क्विंटल राशन, इतर साहित्य तसेच देयकापोटी कोट्यवधी रूपये संबंधित संस्थाचालकास प्राप्त झालेले आहे. बोगसगिरी करत शंभर टक्के विद्यार्थी पात्र दाखवून देयके अदा केल्याचे उपलब्ध दस्तऐवजावरून दिसून येत आहे. केज तहसीलच्या पुरवठा विभागातून ज्या संस्थांना शासनाची मान्यता नाही, अशा संस्थेतील बोगस विद्यार्थी कागदोपत्री दर्शवून शेकडो क्विंटल धान्याचा काळाबाजार करण्यात आलेला आहे. हा गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी दोन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करून चौकशीचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बोगसगिरी करणार्‍या संस्थाचालकांसह पदाधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

समितीत आहेत उपजिल्हाधिकार्‍यांसह
तहसीदार; चौकशी कधी सुरु करणार?
रोहयोच्या उपजिल्हाधिकारी डॉ.प्रियंका पाटील या समितीच्या अध्यक्षा तर जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार डॉ.मंजुषा लटपटे या सदस्य सचिव आहेत. या दोन सदस्यीय समितीने १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी दि.६ मे रोजी दिले आहेत. परंतु, आदेश देऊन ९ दिवस झाल्यानंतरही अद्याप चौकशीला सुरुवात झालेली दिसत नाही. यामुळे चौकशी समिती १५ दिवसात अहवाल सादर करेल, याबाबत शंका आहे.

केज तालुक्यातील देवगाव येथील रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान नेहमीच वादाच्या भोवर्‍यात आहे. या संस्थेने भ्रष्टाचाराचा ‘विक्रम’ केला आहे. विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचे पाप संस्थाचालकांनी केले आहे. समितीचे कसून चौकशी करावी. दोषींवर कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही.
-पिंटु ठोंबरे, तक्रारकर्ता तथा माजी सदस्य, पं.स.गण, विडा.

 

Tagged