अंबाजोगाई, पैठण येथील केंद्रप्रमुख संशयाच्या घेर्यात
अंबाजोगाई : उच्च माध्यमिक परीक्षेतील उत्तरपत्रिकेत अनियमितता, गैरप्रकार, पाने फाडलेली आणि हस्ताक्षरात बदल झाल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी विद्यार्थ्यांची शनिवार दि. 13 एप्रिलपर्यंत सुनावणी घेण्यात आली. आता या अक्षरबदल प्रकरणात केंद्रप्रमुख संशयाच्या घेर्यात असून, त्यांना विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने नोटीस पाठविण्यात आली असून, अंबाजोगाई, Ambajogai पैठण येथील केंद्रप्रमुखांना आजपासून (दि.15) सुनावणीसाठी बोलवण्यात आले आहे. अशी माहिती बोर्डातील अधिकार्यांनी दिली.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आल्या. या परीक्षेतील इयत्ता बारावीच्या HSC Board साडेपाचशे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत गैरप्रकार आढळून आला आहे. तर जवळपास अडीचशे ते तीनशे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत हस्ताक्षरात बदल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आमचे हे हस्ताक्षर नाही, कुणी लिहिले माहिती नाही, यात आम्ही दोषी नसल्याचे विद्यार्थ्यांनी सुनावणीदरम्यान लेखी हमीपत्रात म्हटले आहे. आता पर्यवेक्षकांचे म्हणणे ऐकून घेऊन केंद्रप्रमुखांना मंडळात आजपासून (दि.15) बोलविण्यात आले आहे. उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेतील शिक्षक, केंद्रप्रमुख आणि कस्टोडियनची, मॉडरेटरची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. दहावी-बारावी परीक्षेतील गैरप्रकारांची सुनावणी सुरु असून, 13 मे रोजी विद्यार्थ्यांची सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उत्तरपत्रिकेत उत्तराशिवाय कोणताही मजकूर लिहिल्यास त्यास नियमानुसार आक्षेपार्ह लेखन म्हटले जाते. जसे की खुना करणे, कागद फाडणे, भावनिक लिखान आक्षेपार्ह मानले जाते. आतापर्यंत पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांची यात सुनावणी झाली आहे. हस्ताक्षरातील बदल हा फिजिक्सच्या पेपरमध्येच आढळून आला असल्याने त्या विषयाचे विद्यार्थ्यांनंतर आता शिक्षकांची देखील चौकशी होवू शकते. तर आता विभागीय मंडळाने नोटीस पाठवून केंद्रप्रमुखांकडून खुलासा मागितला आहे. तसेच त्यांना सुनावणीसाठी देखील बोलवले आहे.
अशी आहे केंद्रप्रमुखांना पाठवलेली नोटीस
उच्च माध्यमिक अर्थात बारावीच्या फिजिक्स विषयाच्या पेपरमध्ये अनियमितता, अर्धवट सोडलेल्या प्रश्नांची उत्तरे दुसर्याच हस्ताक्षरात लिहिली असून, मंडळाच्या सूचनांचे पर्यवेक्षक किंवा अन्य घटकांनी गैरफायदा घेतला असल्याचे दिसून आले आहे. बैठक क्रमांकाचे दालन पर्यवेक्षक व केंद्रसंचालक म्हणून कामात निष्काळजीपणा केल्याचे आढळून आले आहे. याबाबत मत मांडण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. अन्यथा एकतर्फी कार्यवाही करण्यात येईल, असे मंडळाने दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे.