mushakraj bhag 4

सर्कस मुषकराज 2022 भाग 4

न्यूज ऑफ द डे मनोरंजन राजकारण संपादकीय

परळीतील ‘झाडाझडती’ नंतर बाप्पांनी अंबाजोगाईकडे प्रस्थान ठेवले. राजुरीच्या कारखान्यापासून सुरू झालेला प्रवास आता परळीमार्गे अंबाजोगाई असा सुरू होता. तीन दिवस उशीरापर्यंत जागरण झाल्याने मुषकाला डुलक्या येत होत्या. त्यामुळे अंबाजोगाईत रेस्ट घ्यायची अन् उशीरानं दरबार भरवायचा अशी बाप्पांनी मुषकाला सुचना केली. तीन दिवसाच्या कामकाजानं मुषक दमून लागलीच झोपी गेला. इकडे बाप्पा झोपी जाणार तेव्हढ्यात आवाज आला… ‘मुझे नजर अंदाज करना है तो शिद्दत से करना, कही नजर मिल गई तो अंदाज बदल जायगा…’ ‘अरे हम मे नाम है इसलीये तो लोग हमे बदनाम करते है’ हा डायलॉग ऐकून पुन्हा बाप्पाच्या डोक्यात परळी घुसली. बाप्पांनी धोतराचा सोंगा हातात धरून हॉलमध्येच येरझार्‍या सुरू केल्या. त्यांच्या येरझार्‍यानं झोपलेला मुषक जागा झाला. त्याने शेपटीला एक पिळ देऊन आळस झटकला. तासाभराच्या विश्रांतीने ताजातवान होत टूणकून बाप्पांच्या पुढ्यात धाव घेतली.

मुषक : (गुलाबी हिंदीच्या अंदाजात) क्या हुआ बाप्पा? अजुनबी तुम्हारे डोस्केसे परळीका खयाल नही जारा क्या? छोड दो बाते अब आगे की सोचो…

बाप्पा : अरे क्या आगे की सोचे? साक्षात आमचे पिताजी परळीत वास्तव्यास हैत. त्यांच्या नगरीची ही अवस्था बघून आमच्या मनात क्रोधाच्या ज्वाळा उठल्यात. सगळे धंदे एकानंच करायचे तर मग बाकीच्यांनी अंगाला राख फासून घ्यायची का? काय तर म्हणे 1400 बहीणींचे लग्न केले… हे असे? तुमच्या मंडपापाई व्यापार्‍यांचं शटर बंद करून? त्यांच्या मुंडक्यावर पाय देण्यात कसली आली पुण्याई? अरे कितीतरी जण राजकारणापायी अन् ह्यांच्या हितसंबंधापाई त्या जेलात सडतायत… त्यांना बायका-पोरं न्हाईत का? काय ते कोविड काळात रेमडेसीवीर वाटले? ह्यांनी घरचे पैसे देऊन आणले व्हते का? अरे हे जिल्ह्याचे पालक व्हते ना… अख्ख्या जिल्ह्यासाठी आलेले एकट्या परळीत वाटत अस्तेत का? म्हणे शेतकर्‍यांचा कोविड काळात भाजीपाला खरेदी केला… आम्हाला या कामाचं कौतुकचंय… पण ह्या पुण्याईवर तुम्ही असले धंदे करणार का? ते जमायचं न्हाई मुषका… त्यांच्या हिथल्या पक्षप्रमुखांना आत्ताची आत्ता आमचा क्रोध, संताप कळव…

मुषक : (हातोला, अंबाजोगाई येथे फोन लावला जातो) हॅलोऽ हॅलोऽऽ हॅलोऽऽऽ मुषक बोलतोय….

राज्जुआबा : (धन्नुभौच्या पक्षाचे जिल्हाप्रमुख) ब्वाला ब्वाला मुषकरावऽऽ पौचले का आंब्यात?

मुषक : ते बाप्पांला लै सनीताप झालाय बगा… परळीतल्या लावण्यांची… नाराजी है… आरं लावण्याच करायच्या व्हत्यातर जरा मागं म्होरं म्होर्त निघाला अस्ता तर आभाळ पडलं अस्तं का डोस्क्यावं? शेवटाला कीर्तन अन् म्होर्ताला लावणी… कुठं शिकले रं एव्हडं? एव्हढाच नादयं तर एकांदा पेशल लावणी उत्सौव घ्यायचा ना… त्या तिकडं तमाशा कलावंत उपाशी मरायले लेका… अन् त्येंन्च्या नावानी तुम्ही हिकडं गुलाल उधळायले…

राज्जूआबा : बाप्पांलाच काय… आमालाबी सनीताप झालाय… पण धन्नुभौला कोण सांगल? आमी तर सांगू सांगू दमलो बगा… आता पैल्यावानी वागुन नाय जमायचं आपल्याला… ‘करूणा’ काळात बिघडलेली इमेज दुरूस्त कराय पायजेल का नाय? तवापासून लोकायचा बगायचा अ‍ॅन्ंगल चेंज झालाय… लोक नावं ठिवायलीत… तवा मग ह्यो नवा तमाशा उगीच कशाला? मान्ययं लोककलायं… पण लोककलेचा फास आपल्या गळ्यात गुतल्यावर कुणाचं काय घ्या… लोकायचं काय ते ‘रडून ऐकतेत अन् हसून सांगतेत’. आता ह्या तमाशापायी काय काय सनींताप झालाय ‘घरादारात’ काय सांगावं तुमाला? पोस्टरमंदी ज्या नव्हत्या त्या पण हिथं येऊन नाचून गेल्या. आता सांगा कुणास्नी सैन व्हईल हे मग… तरी तुम्ही बरीक केलत… सोनारानी कान टोच्ले म्हंजी जरा टोच्ल्यावाणीतरी वाटंल.

मुषक : आमचंबी एैकता का सगळं तुमचंच सांगता? आमची नाराजी जरा वर कळवा….

राज्जूआबा : बाप्पाला म्हणावं तुमचं जे दुखणं तेच आमचबी है. हिथं आमचं कौन बी ऐकत नै. सगळे नुस्ते ‘जिल्हाध्यक्ष’ म्हणत्यात. बिन पगारी अन् फुल अधिकार्‍याला… जवा सुगी अस्ती तवा खळ्यावर सगळे तुटून पडतेत अन् काश्या येचायला म्हणलं की आमी… तुमच्या बाजुला कुणी नाय ना… तुमाला मनुन सांगतो… उध्दो सायेबांच जे झालं त्येच हिथं हुँनी म्हंजी झालं.

मुषक : आता त्येचा हिथं काय संम्बंध…

राज्जुआबा : कसा संम्बंध नाय… ह्ये राजकारण म्हंजी एक सर्कसय… कोणत्या झोक्याला कोण कुठून लटकन काय बी सांगता येत न्हाय… उध्दो साहेबांनी नगर ईकास सहीत सगळा कारभार एकनाथरावाच्या हवाली करून दिला. अन् एकेदिवशी एकनाथच तंबू घेऊन पळून गेला. तसं धन्नुभौकडंबी एक एकनाथ जल्दी तयार हुईल. आमच्यातल्या एकनाथला शीएम नाय पण ह्या वैद्यानाथनगराचा परथम नागरिक व्हयचंय… अन् तिथं आगुदरच दुसर्‍या तिघांनी दस्त्या टाकून ठिवल्यात. तवा ह्या एकनाथाची दाळ शिजणे जरा मुष्किल लगता है.

मुषक : फिर तो बहुत बडी सर्कस इधर बघायला मिलेगी. धन्नुभौ ला हे कुणी सांगत नाय का?

राज्जुआबा : त्येंना सांगाय त्ये जाग्यावं तर पाह्यजेल ना. आम्ही काय सांगाय त्येंच्या कानापस्तुर गेलं की ह्यो बाबा देवेंनभौच्या घरी गुच्छ घ्यून जात्यात. आमी पुना मैनाभर ह्योच इच्चार करतो की हे तिथं कशालीच गेले अस्तील? त्यो ईच्चार थांबत नाय तोच पुना ते दुसर्‍यांदा तसलाच टपार्‍या बुके घ्यून जात्यात… आता हे असं मणल्यावर आमचंबी डोस्कं भंजाळून जातंय ना… हे काय व्हयलंय मनून… मुषका तुलाच काय खबर लागली तर सांग भौ…

मुषक : आता दोन्दा दोन्दा जात्यात मणल्यावर कायतरी शिजत असणारच की…

राज्जुआबा : एक्झ्याट मीबी तेच तर म्हण्तोय…मी तर आइकायलोय आमचं भौच मोदीच्या पक्षात जाणारैत… खरंय का?

मुषक : कसंय ना उल्साक का व्हईना जाळ लागल्याबिगर धूर निगत नस्तुय… असं झालं तर ह्याला ‘करूणा’ इफेक्ट म्हणत्यात. नाय गेले तिकडं तर मग फाईल खुललीच म्हणून समजा…

राज्जुआबा : ते पण खरंय… अन् तसं झालं तर आमच्या हिथला एकनाथ शरदभौला भेटून येत अस्तुय… सेम ठाकर्‍यावानी कंडीशन व्हईल भौची… बुथाव बसाय माणूस दिसायचा नाय… काल तर कसले टपार्‍या बॅनर शहरात लावले होते. नंतर त्या एकनाथाच्या फुटूवर बाप्पांचे फुटू चिकटून कसंबसं शक्तीप्रदर्शन थोपिवलंय… लै गदारूळ झालाय त्यावरूनबी…

बाप्पा : मुषका झाला नायी का निरोप देऊन? चल आपल्याला आंबानगरीचा फेरफटका मारयचाय…

मुषक : अहो बाप्पा त्येन्ला सांगाय फोन लावला अन् त्येंनीच त्येंन्च कथन सुरू केलं. मला तर वाटतैय… काय तरी गडबड व्हणार हाय परळीत… ताई-भौ एकाच पक्षात दिस्तेन काय दिसानी…

बाप्पा : अरं मग तसं झालं तर घड्याळ कुणाच्या मनगटावर बांधायचं?

मुषक : मोठी बहेना केंद्रात अन् भौ हिथं राज्यात… दुसरी बहेनाला यंदा घरी थांबाव लागंल असं दिस्तंय. अन् र्‍हायला प्रश्न घड्याळीचा तर धन्नुभौकडे पण एक एकनाथ तयार व्हायला येळ लागणार नै. ही एकदम आतल्या गोटातील खबर है… सुत्रांची खबर नै… परळी नगर परिषद 2011 चा सिझन टू येणार है लौकरच… ओटीटीचं ‘रानबाजार’ अ‍ॅप डौनलोड करून ठीवा लगेच…

बाप्पा : अरे त्यो तर कट्टर हैना, भौ ची सावलीच म्हणत्यात न त्याला? एक दिल दो जान…

मुषक : आता राजकारणात ऊन पौस संपलंय सगळं ‘शिराळ’ पडलंय. कसली सावली अन् कसलं काय? कट्टर कौन नही था बाप्पा… आज भी एकनाथ के सब लोग बोलते है हम बालासाहब ठाकरे और आनंद दिघे के सैनिक है. इधर भी वही तो है… सब बोलेंगे हम गोपीनाथ मुंडे साहब के भक्तगण है…
– बालाजी मारगुडे
मो.9404350898
———-

Tagged