MUSHAKRAJ

मुषकराज 2022 भाग 5 तगड्या कुस्तीचं ऐलान…

न्यूज ऑफ द डे मनोरंजन राजकारण

(महत्वाचे तीन दिवस परळीवर काथ्याकुट करण्यात गेल्यानंतर ‘आता परळीचं नाव देखील काढायचं नाही, आपुन अंबाजोगाईवरच बोलू’ असा निश्चय बाप्पांनी मुषकाजवळ बोलून दाखवला. ठरल्याप्रमाणे मुषकाने परळीचा सगळा कच्चा चिठ्ठा पॅक करून लाल धुडक्यात गुंडाळून ठेवला. आता दोघेही बाहेर थांबलेल्या अंबानगरीच्या लोकांना भेटण्यासाठी तयार झाले.)

मुषक : देवो के देवऽऽ राजाधिराजऽऽऽ पार्वतीनंदन, श्रीमान श्री श्री श्री गणपती बप्पा, पधार रहे हैऽऽऽऽ

थापासेठ : (एकदम पुढं येऊन, घोगर्‍या आवाजात) देवा आधी आमचा मान… आमच्या नगरीत आले की पैला हार आमचा… ह्या नगरीचा परथम नागरिक म्हणून ते आमचं करत्यव्यै समजतो आमी…

चंदूसेठ : (आपल्या सुनबाईंना हातवारे करीत, चल लवकर हो पुढं) थांबा थांबा थांबा, आमच्या सुनबाईंला येवूद्या… त्या या विधानसभा मतदारसंघाच्या रनिंग विधायक हैतं. नगरपालिकेत प्रशासक येऊन वर्ष झालंय. त्यामुळे आमी परथम नागरिक हैतं ह्या बतावण्या मारणं जरा बंद करा… निदान समुर साक्षात बाप्पायत याचं तरी भान ठिवा…

थापा सेठ : बरं तुमचं हौवू द्या आधी… आमी आपले गरीब अल्पसंख्याक माणसं… लै झालं तर मी बाप्पाला मपल्या घरी नेईन…

चंदूसेठ : मी पण त्येवच इच्चार करतूय मगापासून.. बाप्पा कधी तुह्या घराकडं जातेत ते. त्यांनाबी कळल गुडघाभर पाण्यातून कसं जायचं असतं. धा धा दिस लोक बिनापाण्याचं कसं तग धरीत अस्तेन… पथदिवे नैत ना उद्यान नै… आहो साधी मुतारी नै. लोक रस्त्यावर आडुसा धरत्यात.

बाप्पा : शांत व्हा शांत व्हा… हा माझा दरबारंय… हिथं भांडणं अजिबात जमणार नैत… मी पैले हिथल्या महसूलच्या अन् पोलीसांच्या अधिकार्‍यांना भैटणारैऽऽ आधी त्येंन्ला इकडं पाठवा.

मुषक : (एकएका अधिकार्‍यांची बाप्पांना ओळख देत) ह्या इथल्या अप्पर जिल्हा कलेक्टर मिस्करबाई… ह्यांना झाडे लावा झाडे जगवा ह्याशिवाय दुसरं काय पण दिसत न्हाई असं आंब्याची जंन्ता सांगते. त्यांनी लावलेल्या जंगलात जर काळे, पांढरे बोके माजले तर कोण जिम्मेदारयं… आम्ही कुणाकडं बगायचं बाप्पा… आमच्या जीवन मरणाचा प्रस्नैय. ह्या दुसर्‍या इथल्या पोलीस परमुख ‘पोएम’बाई (कविताचं इंग्रजी व्हर्जन)… ह्या पदावर का बसल्या अस्तील हे त्येंन्च्याच कर्मचार्‍यांना पडलेलं कोडं है. ते सुटल असं बिल्कुल वाटत नै… असं वाटतंय की आंब्यात फकस्त गुटका अन् मटक्याचाच हिसाब किताब मेळ खात नसणारैय… नै तर येव्हढ्या धाडी माराय कुणाला येळंय?.. क्राईममधला घंटा तपास त्येंना जमत नाय… कुणी जमतंय म्हण्लं तर मी त्येंन्च्या टांगाखालून जायला तैय्यारंय… ते तिकडं कोपर्‍यात तोंड बांधून उभे हैत ते प्रांतअधिकारी पाटील हैत… इथं पाव्हण्या रावळ्याच्या गोताळ्यामुळं त्यांना लैच डिमांड है. हैचा जन्म कुठलाय ठावूक नै पण ते मरूस्तवर हे हिथंच ड्यूटी करत्येन असं वाटतंया… कुठलं बी परकरण सांगा, ह्यांनी नाय त्या जमीनीवर फेर वढला तर नावाचा मुषक सांगणार नै… ह्यांनीच तर हिथल्या देवदेवतांना उठून जायचं केलंय… देवाची जमीन पुजार्‍याला अन् पुजार्‍याची जमीन हिथल्या बोक्याला… बोका मस्त टामटूम… वरतून पुन्हा साळसूदपणा… कधी कधी वाटतंय हे खरंच सुशिक्षीतांचं नगर है का? अस्सेल तर हे बोके इतक्या दिवस खुर्चीवर दबा धरून कसं काय बसलेत हे देवा तुम्हालाच ठावं… हे अजून एक महत्वाचे ईन्सान… आशिया खंडातील सगळ्यात मोठ्या ग्रामीण रुग्णालयाचे इन्चार्ज डॉ.सन (भास्करचं इंग्रजी व्हर्जन)… नाव त्यैंन्च भास्कर है पण हे सकाळी सकाळी कधीच उगवणार नै. दुपार झाल्यावच हे दवाखान्यात दिस्णार… पेशंट तपासले तर तपासले नैतर दिले सोडून… आपल्या काय बापाचं जातं… रुग्णालयाचा सुवर्ण महोत्सव म्हणून 160 कोटी रुपयांचा डाव टाकलाय त्यांनी सरकार दरबारी… जर त्यो सक्सेस झाला तर लै नेत्याचंं (कार्यकर्त्यांचं नै) कल्याण झालं म्हणून समजा…

बाप्पा : बास बास मुषका सगळा कारभार आला ध्यानात… आता हिथल्या लोकपरतिनिधीला बोलीव…

मुषक : (जमिताताईंची ओळख करून देतो) ह्याच त्या हिथल्या विधायक हैतं. अधिवेशन काळात तांबड्या कार्पेटवरून चालताना फुटू काढायचा अन् त्यो आपल्या कार्यकर्त्यांना शेअर करायची त्यांना भारी हौस… आता त्येंन्ची नजर हिथल्या नगर परिषदेवर हैय… हिथं त्येन्चे सासरेबुवा हर निवडणुकीत थापासेठ सोबत लुटूपुटूची लढाई खेळ्तेत. त्यामुळं त्यांच्याच कार्यकर्त्यांन्चा विश्वास उडून गेलाय. यंदा जाड्या बरूबर रड्या असली कुस्ती जमणार नै म्हणून कार्यकर्ते उघड उघड बोलायलेत. एकतर चंदूसेठ नायतर अक्षैभौ असल तर सांगा… आता आमच्या खांद्यावर बंदूक नगं म्हणून कार्यकर्ते भयंकर तापलेत…

बाप्पा : ठिकै ठिकै… पुढच्याला बोलवं…

मुषक : (बांध कोरल्यागत मिश्या असलेल्या थापाशेठ कडे हात दाखवून) ह्यांची वळख परळीत झालीच है. पण त्ये इन्ट्रॉडक्शन लै म्हंजी लै अधुरं है. ह्याचं कामच असंय की गोरगरीबांच्या नाय तर देवस्थानच्या मोक्याच्या जमीनी बळकायच्या अन् त्यावर प्लाटींग पाडून गडगंज पैसा कमवायचा… जमीनीतून पैसा अन् पैशातून सत्ता… ‘वापरा अन् फेकून’ द्या अशी निती कार्यकर्त्यांच्या बाबतीत… ह्यांना चांगला कर्तृत्ववान माणूस जवळ बी जमत नै. ज्येनं मदत केली त्याला बी कोलाय ह्यो गडी कधी मागं पुढं बगत नै. प्रतिष्ठीत, अन् वतनदार लोकांची ह्यांना अ‍ॅलर्जी है. पण येळच पडली तर त्यौ कुणाच्याबी पायावं लोटांगण घालाय मागं पुढं बगत नै. इंग्रजीतून ज्याला कम्प्रमाईज म्हणतेत त्यात ह्याचा हात कुणीच नै धरू शकत. ‘पे अ‍ॅन्ड पार्क’ पध्दतीने ह्यो आपली राजकीय गाडी पार्क करतो. कुणावरच तीळा येव्हढा पण विश्वास टाकणार नै. किती नेते बदलले ह्याची तर गणतच नै. पहिला उगम पदमसिंह पाटलापासून, नंतर विलासराव, ते झाले की अशोकराव, मधल्या काळात आपल्या परळीच्या तै, त्येंन्ची सत्ता गेली की पुन्हा अशोकराव अन् आता ह्यो बाबा धन्नुभौच्या संगतीला है. बारा गावचा मुंजा असल्यासारखं सगळीकडं फिरून आलंय. आता ह्यो असा काय आंब्याच्या जन्तेंच्या मानगुटीवर बसलाय की इच्चारायचीच सोय नाय… धन्नुभौच्या कारखान्याला पैसा दिल्यापासून ह्योवच आंब्याचा मालक झाल्यावानी वागतोय…

बाप्पा : बस्स झालं मुषका… दरवर्साला ह्यांची येगयेगळी वळख बघून ह्यो गडी किती अष्टपैलुंय हे बघून आम्हीच आता हरखून गेलोय. मागच्या येळेला नाट्यागृहातील खुर्च्या बघून आम्हाला ह्या आंब्याच्या जंन्तेची काळजी लागली व्हती. त्येंन्ची ती फाईल डबल खोलाय सांगा.

मुषक : बाप्पा इथंच तर घोडं पेंड खातंय ना… ह्यांनी आता चंदूसेठकडे जाऊन लोटांगण घातलं की संपलं… आंब्याच्या जंन्तेवर पुन्हा अन्याय… मग कसली फाईल अन् कसलं काय?

चंदूसेठ : नै नै नै… यंदा असलं कायबी व्हणार नै. इतक्या दिस आम्ही दोगांनी जे केलं ते केलं… आता नाय… मला काय म्हैत की ह्यो मपल्यापेक्षाही जमीनी ज्यादा घ्येईल. जवा कळलं तवाच त्येंन्ची अन् आपली अंन्तर्गत मिलीभगत संपली. आता ह्या मुषकाची शपथ घ्यून सांगतो, यंदा कुस्ती व्हणार म्हंजी व्हणार… ती पण तगडी… पुढल्याबारी बाप्पा येणार तवा रिझल्ट म्हंजी रिझल्ट… मागच्या बारीच थोड्यात हुकला.

– बालाजी मारगुडे
मो. 9404350898

क्रमशः
———-

Tagged