mushakraj-bhag-3

मुषकराज 2022 भाग 3 वाजले की बारा…

न्यूज ऑफ द डे मनोरंजन राजकारण संपादकीय

मुषकराज 2022 भाग 3

परळीतील सगळा धार्मिक (?) उत्सव बघून बाप्पांच्या तळपायाची आग मस्तकात पोहोचली होती. ते रागाने लालबुंद झाले होते. त्यांनी मुषकाला निघण्याचा इशारा केला. पण मुषकानंच सांगितलं ‘थोड्यासाठी कशाला राग काढता. धा वाजायला अवघे पाच मिन्टं कमी हैती. एकदा का धा वाजले की आटुमेटीक प्रोग्रॅम बंद व्हणारं’ मुषकाचं बोलणं ऐकून बाप्पांनी थोंडं शांततेत घ्यायचं ठरवलं. कुणीतरी लावण्यवती आली. तिनं ‘अगं बायऽ अगं बायऽऽ अग बायऽऽऽऽ जानूविना रंगच नाय…’ ह्या गाण्यावर तुफानी नाच केला. कार्यक्रम संपला असं वाटत असतानाच अंबाजोगाईचा एकेकाळचा प्रथम नागरिक तथा देशाच्या प्रधानमंत्र्यांची भावकी असलेला थापा मोदी फेटा उडवीत उभे र्‍हायले. घोगरा आवाज, भावकीचा बांध कोरल्यागत ओठावर असलेल्या खुरट्या मिशा, त्याच मिशीला पीळ देऊन त्यानं एका गाण्याची शिफारीश केली. त्येंन्च्या शिफारशीने ‘….आली बहरून ही रातराणी अशी नाजुक नाजुक जवानी… माझ्या काळजात तुम्हा ठेवुनीऽऽ….. प्रीतीचा हा गुलंकंद चाखून… ठेवा ना गुलाबी ओठऽऽऽ अहो शेठंअहो शेठंऽ लै दिसानं झालीया भेटऽऽऽ’ ह्या लावणीचं तडाखेबंद सादरीकरण केलं. पुन्हा कुणीतरी अजुन फर्माईश केली. त्यावर ‘अप्सरा आली’ चाही जोरदार परफॉर्मन्स झाला. एव्हाना दहाचे अकरा वाजले… तरीपण कार्यक्रम संपायचं नाव घेईना. आता तर फुल जोश चढला होता. आता शेवट शेवट म्हणून थेट धन्नुभौ उठले. त्यांनी ‘तुझ्यामुळं झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव’ या गाण्याची फर्माईश केली. त्यांच्या या गाण्याने प्रचंड टाळ्या अन् शिट्ट्या मिळवल्या. कार्यक्रम संपला असे वाटत असतानाच पब्लिकमधून फर्माईश आली. पब्लिकला नाराज करणे धन्नुभौला शक्य नव्हते. त्यांनी आता शेवट… बस्स हा… शेवट… ह्यापुढे एकबी गाणं व्हणार नाय… असं म्हणून पार्टीला एका गाणं सादर करण्यास सांगितलं. तशा सोनालीबाई स्टेजवर आल्या. त्यांनी ‘आपका हुकूम सर आँखो पे भौ’ म्हणत ‘मला जाऊं द्या ना घरी, आता वाजले की बारा’ ही लावणी सादर करत बारा वाजल्याची आठवण करून दिली. हा सगळा प्रकार पाहून बाप्पांना प्रचंड राग आला. पण कंट्रोल करीत बाप्पांनी तो आतल्या आत गिळून टाकला. पण आता ह्या सगळ्यांचा हिसाब इथंच करायचा असं म्हणून मुषकाला थांबण्यास सांगितलं.
बाप्पा ः इथल्या पोलीस प्रमुखाला बोलवा…

ठाकुर साहेब ः जी बाप्पा…

बाप्पा ः तुमच्या घड्याळात किती वाजले?

ठाकुर साहेब ः दहा वाजून दहा मिनिटं झाली बाप्पा

बाप्पा ः माझ्या घड्याळात 12 वाजले तुमच्या घड्याळात अजून 10.10 च कसे?

मुषक ः बाप्पा त्यैंन्ची काहीच चुकभूल न्हाई. त्ये नुकतेच जिल्यात पधारलेत. त्यैंचं राष्ट्रवादीचं घड्याळंय का हे तपासल्याबिगर त्याबद्दल काही सांगता यायचं नाय. पण परळीत ह्याच घड्याळाच्या काट्यावर काम चालतं. इथं ठाणेपरमुख कोणंय हेच लोकांना माहित नस्तंय. थोडंफार पेप्रात येतं म्हणून ठाकूर साहेब एसपीयत म्हणून कळतं. बाकी सगळा कारभार टेकडीवरच्या ‘लाल किल्ल्या’तून हल्तो. तिथं तुमच्या पुज्य पिताजींचा परमभक्तंय… आण्णा म्हणतेत लोक त्येंना. दुपारचे 12 वाजले अन् आण्णा म्हण्ले रात्रीचे 12 वाजले तर हिथल्या खाकीवाल्यांना दिवसाच रात झाली समजून गोधडी घेऊन झोपावं लागतंय… खाकीचं सोडा… खुद धन्नुभौला पण हेच कराव लागतंय. हिथले आमदार आण्णाच… धन्नुभौ पालकमंत्री व्हते तव्हा आण्णाच चालकमंत्री असत. मागचे एसपी बीडमध्ये रुजू झाल्याबरूबर त्यांना दिड कुंटलचा भलामोठा हार घालून हातात एक जाडजूड कडं घातलं व्हतं आण्णांनी. आता ते कडं कुठल्या धातुचं व्हतं याचा फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट यायचाय अजून… तवापासून हिथला कायदा कानून सब कुछ आण्णा हैतं. आण्णा हैतं म्हणूनच हिथल्या राखेतून पण सोनं निघतंय… आण्णा म्हणतील तवाच ही राख खाली बस्तीय नायतर परळीकरांच्या नाका, तोंडातच तीची जागाय… तोंडात अडकलेली राख मधी ढकलायची तर कुठल्याबी कंपनीचं कोल्ड्रींक्स मागा नैतर किनली वॉटर मागा, इतकंच नै तर अमूलचं दूध, दही बटर मागा सब कुछ आण्णांच्या अंडर हैतं. मोठाले डोंगुर फोडून त्यातल्या दगडाचा बारीक चुरा करायचा कारखानाबी आण्णाच्या अंडर है… लै थकवा आल्यावानी वाटलाच तर शक्तीवर्धक पेटत्या काड्या, व्होठ आणि दाताच्यामधी दाबून धरायचं उत्साहवर्धक चूर्ण हे पण आण्णांच्याच अंडर हैत. हिथल्या खाकीला कै ताणच नै. त्ये 100 दिस ठाण्याकडं फिरकले नै तरी त्येंन्च्या बिगर कुठलंच काम अडत नै. हिसाब-किताब येळच्या येळेवर असल्यानं वरच्याला बी काय पत्ता लागत नै की ठाण्यात नेमकं कौन हाय अन् कौन नाय… निवडणुकीत धन्नुभौ म्हणले व्हते परळीच्या लोकांचं उत्पन्न मी दुप्पट करीन… दुपटीचा तर पत्ता नै… पण दोन चारजणाचं उत्पन्न 100 पट वाढलंय हे काळजाला हाथ लावून सांग्तो. हे खोटं निघालंच तर नाय त्या ‘भुयारी गटारी’त जीव दिला तर माझं बी नाव मुषक नाय… अर्थात ह्या सगळ्या नाचगाण्याचा खर्च योजनेतून वसूल झाल्याव…

बाप्पा ः हेव्हढं सगळं जळत अस्ताना, आपण काहीच केलं नै असं हिथल्या इरोधकांना वाटत नाय का?

मुषक ः काय सांगू बाप्पा… निवडणूक झाली तवा त्येंन्च्या कट्टर इरोधक परळीच्या जंन्तेवर नाराज.. मधल्या काळात त्या पक्षावर नाराज… आता त्येंन्च्यावर परळीची जंन्ता नाराज है… हे नाराजीचा खेळ काई संपायना म्हणून आता त्या अ‍ॅन्करिंग करत्यात. दुसर्‍या ज्या दिल्लीत अस्त्यात त्या नेमक्या कुणावं नाराजैत ह्यांचा अजून शोध नै लागला. लोक आरतीला बोलावत्यात तवा त्येंन्ला वाटतं हे पट्टी मागतेल, म्हणून त्या कुठल्या आरतीला बी दिसत नैत. अख्ख्या श्रावणात त्या परळीत कुणाला दिसल्या नैत. आता त्येंन्चा वर्षभरातील कार्यक्रम फिक्संय.. दसर्‍याला ऊस्तोड मजुरांना त्या ईचारतील ‘मी येतेय तुम्ही येताय ना’, हा मेळावा उरकल्यावर त्या थेट 12 डिसेंबरला अवतरणार अन् नंतर 3 जूनला. आता तुमही इस जंन्तापर काहीतरी ‘करूणा’ करो. हिथल्या लोगोंको पर्याय दो.

थापा मोदी ः मै बोलू क्या थोडा बीच मे… आमच्या भौचं सगळं वांगलं ऐकीलं आता आमच्या भौचं चांगली बी ऐका… लॉकडौनमदी 70 हजार कुटुंबाला मोफत अन्न धान्य दिलं. विक्री अभावी सडून जाणारा शेतकर्‍याचा भाजीपाला खरेदी केला.. मोफत रेमडेसीवीर वाटून अनेकांना जीवदान दिले… 1400 बहीणींचे संसार उभे केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती, भीम महोत्सव, संभाजी महाराज महानाट्य, हे सगळं सगळं हिथक्या लौकर कसे इसरलात? अरे जनाची नाही निदान मनाची तरी पाळा…

बाप्पा ः हे कोण वकीली करायलेत?

मुषक ः हे वकील नैत पण वकीलापेक्षाही लै हुश्शार हैत. तलाठी, मंडळाधिकार्‍यांच्या सगळ्या ‘खाडाखोडी’ ह्यांना उत्तम जमत्यात. नदीकाठी जमीनी घेणं हा ह्याचं छंद… लहानपणी हे कुठल्या जत्रात हरपले तर ह्यांना शोधायचं काम लै औघड नसायचं असं आंब्याचे लोक सांगत्यात… कारण जिकडं खोबरं उधळतेत तिथंच ह्यो सापडणार… आज बी त्येंन्च असंच आहे. त्येंन्चा पक्ष इचारू नका. खोबरं कुणाच्या हातात हे हेरूनच ते पक्षात जात्यात. वाघाची मावशी फारच आळशी असं आपुन म्हंतो ना त्यांच्याच वंशावळीतला हा ‘नर’ म्हणून आंब्याची जंन्ता ह्यांना वळखते. सध्या धन्नुभौच्या आश्रयाला हायेत ते. म्हणून तर इतके दिवस धन्नुभौनीच त्येंन्च्या भ्रष्टाचाराच्या फाईल दाबून धरल्यात. आता वरचं गणित ईस्कटलंय… उजूक थोडी वाट बघून ते पुन्हा ‘खोबरं’ कुणीकडंय हे बघणार अन् पल्टी मारणार…

(बाप्पा एक एकाचा समाचार घेत असताना आता पहाट व्हायला लागली होती. त्यामुळे इथला सगळा कच्चा चिठोरा सोबत घेण्याचा आदेश बाप्पांनी मुषकाला दिला. अन् बाप्पा आता पुढच्या प्रवासाला लागले.)

बालाजी मारगुडे
9404350898

क्रमशः
———-

Tagged