पैठण, दि. 13 : कोरोना साथ पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने दोन दिवस जीवनावश्यक वस्तूंच्या व एसटी बस वगळता लॉकडाउन जाहीर केला आहे. शनिवारी सकाळपासून व्यापार्यांनी आपला व्यवहार बंद ठेवला आहे. या बंदचा फायदा घेऊन दारू विक्री करणार्यांना चांगले दिवस आल्याचे दिसत आहे. बंदचा निर्बंध लावणारे महसूल विभागाचे कर्मचारी मात्र झोपेतच असल्याचे दिसते. तर नेहमीप्रमाणे नगरपरिषद स्वच्छता विभागाचे कर्मचारी बंद काळात नित्यनेमाने शहर स्वच्छता करीत आहे.
औरंगाबाद शहरात कोरोना रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शहरासह ग्रामीण भागात देखील एप्रिलपर्यंत प्रत्येक शनिवारी व रविवारी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पैठण येथील तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी शुक्रवारी तहसील कार्यालयाच्या सभागृहात तालुक्यातील महत्वाचे शासकीय कार्यालयाचे प्रमुख व महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक यांची संयुक्त बैठक घेऊन लॉकडाऊन संदर्भात गाव पातळीवर स्वतः हजर राहण्याच्या सुचना केल्या होत्या. व्यवहार बंद ठेवून कोरोना नियम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी आदेश दिले असतानाही पैठण शहरासह ग्रामीण भागातील तलाठी मंडळ, अधिकारी, ग्रामसेवक व जबाबदार कर्मचारी अधिकारी गावपातळीवर उपस्थित नसल्यामुळे पुन्हा एकदा गाव वार्यावर सोडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्हा प्रशासनाचा आदेश पाळून या तालुक्यातील व्यापार्यांनी आपला व्यवहार बंद ठेवलेला आहे.
भिंगरीला आले चांगले दिवस…
दरम्यान सलग दोन दिवस विविध दारूच्या दुकानाचा व्यवहार बंद असल्याने या संधीचा फायदा घेऊन नेहमीप्रमाणे चढ्या दराने दारू विक्री सुरू आहे. त्यात भिंगरी दारूला चांगले दिवस आले असून एका कॉटर ची किंमत शंभर रुपयांवर गेली आहे.