rekha jare

रेखा जरे हत्याकांड: मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठेला अखेर अटक

क्राईम न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

अहमदनगर : सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार दै. सकाळ चा माजी कार्यकारी संपादक पत्रकार बाळ बोठे याला पोलिसांनी अखेर अटक केली. हैद्राबाद येथून काल त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याला घेऊन पोलिस पथक नगरकडे निघाले आहे. त्याला मदत करणऱ्या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधीक्षक पाटील स्वत: सकाळी दहा वाजता यासंबंधी सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांना देणार असल्याचे सांगण्यात आले.

सुमारे साडेतीन महिन्यांपासून बोठे फरारी होता. वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकूनही पोलिसांना तो सापडत नव्हता. शेवटी हैद्राबाद भागात तो असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस अधीक्षक पाटील आणि तपास अधिकारी अजित पाटील यांनी पाच विशेष पथके स्थापन करून त्या भागात पाठविली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार छापे टाकले. त्यामध्ये तिघे हाती लागले. त्यांच्याकडून अधिक माहिती मिळाली आणि बोठेही पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी बोठे याच्यासह तिघांना तेथून ताब्यात घेतले. मदत करणाऱ्या आणखी तिघांची नावे पोलिसांना मिळाली असून त्यामध्ये एक महिलाही आहे.

बोठे याला घर भाड्याने मिळवून देणे, मोबाईल फोन उपलब्ध करून देणे, पैसे पुरविणे अशा प्रकारची मदत या संशयित आरोपींनी केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे बोठे याच्यासोबत त्यांनाही अटक होत आहे. आरोपीला घेऊन पोलिस नगरकडे निघाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून त्या भागात ही कारवाई सुरू होती. अत्यंत गोपनीयरित्या पोलिसांनी ही कामगिरी केली. याबद्दल अधिकृत आणि सविस्तर माहिती स्वत: पोलिस अधीक्षक पाटील देणार असल्याचे सांगण्यात आले.

नेमकं प्रकरण काय?

गेल्यावर्षी ३० नाहेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यात जातेगाव घाटात जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी जरे यांच्या आईने फिर्याद दिल्यानंतर अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जरे यांच्यावर हल्ला करणा-या दोघांपैकी एकाचा फोटो जरे यांच्या मुलाने काढला होता. याच फोटोवरून पोलिसांनी प्रथम दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहीतीनुसार आणखी तिघांना अटक करण्यात आली. ज्ञानेश्वर उर्फ गुडु शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहूरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रुक), सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार (नगर) या पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांची कसून चौकशी करण्यात आल्यावर दै.सकाळ या वृत्तपत्राचा कार्यकारी संपादक असलेला बोठे हा जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार असल्याची माहिती पुढे आली.

यातील आरोपी सागर भिंगारदिवे याच्यामार्फत त्याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यानंतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारेही जरे यांच्या हत्येचा बोठे हाच सुत्रधार असल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मधल्या काळात त्याने अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयातही तो फेटाळण्यात आला. मधल्या काळात पोलिसांनी त्याला फरार घोषित केले. पारनेर येथील न्यायालयाने त्याला फरार घोषित करून ९ एप्रिलपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर पोलिस बोठे याची मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू करणार होते. त्याधीच त्याला अटक झाली.

गुन्हा घडल्यापासून सुमारे साडेतीन महिने बोठे फरार होता. मोठ्या चतुराईने त्याने पोलासंना गुंगारा दिला. पोलिसांनी ठिकठिकाणी छापे मारले, राज्यात आणि राज्याबाहेरही त्याचा शोध घेतला. मात्र, तो हाती लागत नव्हता. आता याकाळात तो कोठे कोठे गेला, त्याला कोणी आश्रय दिला, कोणी मदत केली, याचा तपास पोलिस करीत आहेत.

Tagged