आता एमपीएससीची परीक्षा ‘या’ तारखेला

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

एमपीएससीकडून वेळापत्रक जारी
बीड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 14 मार्च रोजी होणार्‍या परीक्षा रद्द करून पुढे ढकलल्यानंतर राज्यभरात राज्य शासनाविरोधात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भावी अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसात परीक्षा घेण्याची घोषणा केली होती. आज (दि.12) एमपीएससीकडून सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 14 मार्च रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 च्या आयोजनासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून 10 मार्च रोजीच्या पत्राद्वारे केलेल्या सुचनेवरून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे आयोगाकडून सांगण्यात आले. परंतू या निर्णयाला तीव्र विरोध झाल्याने परीक्षा आठ दिवसात घेण्याचे वचन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. अखेर आज (दि.12) एमपीएससीकडून सुधारित वेळापत्रक जारी करून आता 21 मार्चला राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार असल्याचे अधिकृत पत्रकाद्वारे कळविले आहे. त्यामुळे हा परीक्षार्थींसाठी मोठा दिलासा असणार आहे.

Tagged