sachin waze

माझे पेशन्स संपले; जगाला गुडबाय म्हणायची वेळ आली

क्राईम न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

सचिन वाझेच्या व्हॉटसअ‍ॅप स्टेटसने खळबळ

दि. 13 : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवर्‍यात असलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांनी ठेवलेल्या व्हॉटसअ‍ॅप स्टेटसने आता प्रचंड खळबळ उडाली आहे. ‘जगाला गुड बाय म्हणायची वेळ आलीय, आता माझ्याकडे पेशन्स नाहीत’, असं त्यांनी स्टेटसमधून म्हटले आहे.

पोलिस अधिकारी सचिन वाझेंनी ठेवलेल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये म्हटलं आहे की, 2004 मध्ये त्यांना सीआयडीनं अशाच चुकीच्या पद्धतीनं अटक केलं होतं. माझ्या सहकारी कर्मचार्‍यांनी मला फसवलं होतं. मात्र त्यावेळी माझ्याकडं 17 वर्षांच्या अपेक्षा आणि नोकरी बाकी होती आणि पेशन्स देखील होते. मात्र आता माझ्याकडे ना 17 वर्षांचं आयुष्य आहे ना सहनशक्ती आहे ना नोकरी आहे. त्यामुळं जगाला गुड बाय म्हणायची वेळ आली आहे, असं सचिन वाझेंनी म्हटलं आहे. 17 वर्षांपूर्वीही मला फसवण्याचा प्रयत्न केला होता, तो आता दुसर्‍यांदा होतं आहे. ही स्टोरी चुकीची आहे. या सर्व गोष्टी राजकीय दबावापोटी आणि मीडिया ट्रायलमुळं होत आहेत. 4 आणि 5 मार्च रोजी मी साऊथ मुंबईमध्ये होतो आणि मनसुख हिरण ठाण्यात होता आणि त्याची बॉडी मुंब्य्रात मिळाली, असंही वाझेंनी म्हटलं आहे. दरम्यान एका वरिष्ठ अधिकार्‍यानं सांगितलं की, सचिन वाझे यांचं स्टेटस वाचल्यानंतर मुंबई पोलिसांच्या मोठ्या अधिकार्‍यांनी त्यांच्याशी संपर्क केला आहे. त्यांना स्टेटस डिलिट करण्यास सांगितलं आहे. त्यांनी काही चुकीचं पाऊल उचलू नये यासाठी त्यांच्याशी वरिष्ठांनी संपर्क केला आहे.

सचिन वाझेंकडून सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
एपीआय सचिन वाझेंकडून सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. 19 मार्च रोजी त्यांच्या या अर्जावर सुनावणी होणार आहे. काल वाझे यांनी ठाण्यातील सेशन कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी स्कॉर्पिओ गाडी सापडली होती, त्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा संशयास्पद मृत्यू झाला. विरोधी पक्षांनी हिरेन यांच्या मृत्यूचा संशय थेट सचिन वाझे यांच्यावर घेतला आहे आणि त्यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यावर आता राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे.

कोण आहेत सचिन वाझे?
– सचिन वाझे 1990 मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून मुंबई पोलिसात ज्वाईन झाले होते. त्यांनी आतापर्यंत 63 एन्काऊंटर केले आहेत. नुकतंच रिपब्लीकनचे संपादक अर्णब गोस्वामी यांना त्यांनी घरातून अटक केली होती. गोस्वामींच्या अटकेसाठी तयार केलेल्या टीमचं नेतृत्व सचिन वाझे यांनी केलं होतं.

  • सचिन वाझे 13 वर्षांनंतर 6 जून, 2020 रोजी पुन्हा पोलिस फोर्समध्ये परतले होते. त्यांनी 2007 मध्ये मुंबई पोलिसातून राजीनामा दिला होता.
  • वाझे यांनी छोटा राजन आणि दाऊद इब्राहिमच्या अनेक गुंडांचा एन्काऊंटर केला आहे. एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा त्यांचे बॉस होते.
  • सचिन वाझेंसह 14 पोलिस कर्मचार्‍यांना 2004 मध्ये सस्पेंड करण्यात आलं होतं. या सर्वांवर 2002 घाटकोपर ब्लास्टचा आरोपी ख्वाजा यूनिसचा कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणात आरोप होता.
  • सस्पेंशन काळ संपल्यानंतर नाराज होत त्यांनी 2007 मध्ये पोलिस फोर्सचा राजीनामा दिला.
  • 30 नोव्हेंबर 2007 रोजी त्यांनी मुंबई पोलिसांची नोकरी सोडल्यानंतर 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता.
  • 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात सचिन वाझे पुन्हा पोलिस सेवेत दाखल झाले.
Tagged