collector jagtap

जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी; हॉटेल्स, मंगल कार्यालये बंद

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

जिल्हाधिकार्‍यांचे आदेश : अत्यावश्यक सेवा वगळल्या

बीड : कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी शाळा, मंदिरांसह अन्य सार्वजनिक ठिकाणी निर्बंध घालूनही कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आता कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. आता जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यासह अन्य काही आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश शुक्रवारी (दि.12) दिले आहेत. जिल्हाधिकार्‍यांचे हे आदेश 13 मार्चपासूनच अंमलात येतील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी आणखी निर्बंध घालण्यात येणार आहेत. आता जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या हॉटेल्स, रेस्टॉरंट, खानावळ, उपहारगृहे बंद राहणार आहेत. त्याठिकाणहून केवळ पार्सल सुविधा सुरु राहील. तसेच, मंगल कार्यालये, फंक्शन हॉल 18 मार्चपासून पुढे अनिश्चित कालावधीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येत आहेत. सर्व आस्थापनांच्या मालकांसह कर्मचार्‍यांना दर 15 दिवसांनी कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. याशिवाय, जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापने (किराणा दुकाने, मेडिकल, दुधविक्रेते हे वगळून) हे सांयकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहतील. अर्थात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकार्‍यांनी आदेशात म्हटले आहे.

आता जिल्हा लॉकडाऊनच्या दिशेने
जिल्ह्यात यापूर्वी शाळा व मंदिरे बंद करण्यात आली होती. तरी देखील कोरोना रूग्णसंख्या कमी होत नसून आता अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकारच्या आस्थापना बंद ठेवण्यात येत आहेत. याशिवाय, रात्रीची संचारबंदीही लागू केली आहे. ही जिल्ह्याची वाटचाल कडक लॉकडाऊनच्या दिशेने दिसून येत आहे.

लॉकडाऊनचा चुकीचा निर्णय घेऊ नये
दरम्यान जिल्हा प्रशासनाला रात्रीच्या संचारबंदीसाठी व्यापारी पूर्णपणे सहकार्य करतील. परंतु त्यांनी दिवसभराचा लॉकडाऊन लावण्याचा विचार करू नये, यामुळे व्यापार्‍यांचे खूप मोठे नुकसान होत आहे.

Tagged