मुंबई – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक दुपारी तीनच्या सुमारास बोलावली आहे. या बैठकीत लॉकडाऊन लागणार की कडक निर्बंध लादले जाणार याबाबत चर्चा होऊन निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी दोन दिवसांपुवी फेसबूक लाईव्हवरून संवाद साधला होता. त्यात ते म्हणाले, लोकांनी कोरोनाचे नियम पाळले नाहीत तर पुन्हा एकदा लॉकडाऊन केला जाऊ शकतो. लॉकडाऊन करण्यास उद्योजक आणि व्यवसायिकांचा विरोध आहे. परंतु असे असले तरी ज्याप्रमाणे रुग्णवाढ सुरु आहे ती पाहता येणार्या काळात उपलब्ध रुग्णसुविधा कमी पडू लागतील. आपण बेड आणू, हॉस्पिटल उभारू पण उपचार करणारी यंत्रणा कुठून आणायची? असा प्रतिप्रश्न उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला केला होता. दोन दिवसांपासून वाढत्या रुग्णसंख्याबाबत मुख्यमंत्री समाजातील विविध घटकांशी चर्चा करत आहेत. कालच त्यांनी माध्यमांच्या संपादकांशी विचारवंतांशी संवाद साधला होता. त्यानंतर आज ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावत सर्वांना काळजीत टाकले आहे.
पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, दिल्ली, अहमदनगर आणि नांदेड या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील स्थितीही चिंताजनक आहे. अनेक ठिकाणी उपचारासाठी बेड मिळत नाहीत, एका एका बेडवर तीन तीन जण उपचार घेत असल्याचे चित्र आहे. यापुढील काळात परिस्थिती आणखी चिंताजनक होऊ शकते.
‘जिंदगी, जान उसके बाद काम’
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ‘जिंदगी, जान उसके बाद काम,’ याप्रमाणे पुढे जावे लागेल. त्यासाठी आता काही पावले उचलावीच लागतील. परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी सर्व ते प्रयत्न करावे लागतील. लोकांमध्ये करोनाविषयी जागरूकता निर्माण करावी लागेल. भीती गेली हे चांगले झाले. पण त्यामुळे बेफिकिरी वाढली आहे. या विषाणूचा संसर्ग धोकादायक हे सांगण्याची वेळ आली आहे, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनबद्दलचे संकेत दिले होते. तसेच सरकारच्या निर्णयाला सहकार्य करण्याची विनंती सर्व क्षेत्रातील प्रतिनिधींना केली होती.