lachkhor police

हप्तेखोरी : अधिकारी, कर्मचार्‍यांच्या जिवाला घोर!

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

धर्मापुरी प्रकरणात चौकशीअंती आणखी दोषींवर कारवाई होणार
बीड : धर्मापुरी येथे पत्याच्या क्लबवर धाड टाकल्यानंतर पोलीस कर्मचारी आणि जुगार चालकाच्या हप्तेखोरीची क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पोलीस कर्मचारी बालासाहेब श्रीपती फड यास तडकाफडकी निलंबीत केले. पोलीस अधीक्षक पोद्दार एवढ्यावर थांबले नसून या प्रकरणाची पुढे चौकशी सुरु असून चौकशीअंती दोषी आढळणार्‍यांवर कारवाई करणार आहेत. त्यामुळे या प्रकरणाशी संबध असणार्‍या अंबाजोगाई विभागातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या जिवाला मात्र घोर लागला आहे.

     अंबाजोगाई तालुक्यातील दिवसांपूर्वी धर्मापुरी परिसरात विशेष पथकाने पत्त्याच्या क्लबवर धाड टाकली होती. या प्रकरणी जुगार्‍यांविरोधात कारवाई केल्यानंतर एकच खळबळ उडाली. हप्ते देतोत, तरीही धाड कशी पडली? असा जाब जुगार चालकाने हप्ता वसुली करणारा पोलीस कर्मचारी बालासाहेब फड यास विचारला होता. या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर पाच दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी कर्मचार्‍यांची चौकशी लावली होती. यात कर्मचारी दोषी आढळून आल्यानंतर शनिवारी (दि.20) त्याच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता पुढेही या प्रकरणाची चौकशी सुरु असून मोठे मोठे अधिकारीही संशयाच्या भोवर्‍यात अडकले आहेत.

वरिष्ठ अधिकार्‍यांनी आपल्या
कर्मचार्‍यांचे कॉल ट्रेस करावे
वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत असणारे कर्मचारी साहेबांच्या जवळचा असल्याचे अवैध धंदे चालकांना दाखवून देतात. नंतर त्यांच्या नावाने कधी स्वतःसाठी तर कधी अधिकार्‍यांसाठी हप्त्याची मागणी करतात. त्यामुळे अधिकार्‍यांनी जास्त पुढे पुढे करणार्‍या कर्मचार्‍यांचे वेळीच कॉल ट्रेस करुन खात्री करणे गरजेचे आहे.

धर्मापुरी येथील प्रकरणाची सध्या प्राथमिक चौकशी सुरु आहे. या चौकशीमध्ये काही संशयास्पद आढळून आल्यास पुढील कारवाई केली जाईल.
-हर्ष पोद्दार -पोलीस अधीक्षक

Tagged