BEED CIVIL HOSPITAL

रुग्णाचा मृत्यू; नातेवाईकांकडून जिल्हा रुग्णालयामध्ये तोडफोड

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

जिल्हधिकार्‍यांची रुग्णालयात भेट

 बीड दि.7 :  जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील कॉट फेकून देत डॉक्टरांनाही धक्काबुक्की केली. तसेच काही मशिनचीही तोडफोड केली. याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत तेथील सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सुचना दिल्या.
      किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या न्युमोनिया झालेल्या संतराम थोरात यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह होत्या. बिगर कोरोना वार्डात त्यांच्यावर उपचार सुरु होते. थोरात हे लघवीला गेल्यानंतर परत येताना खाली पडले. यावेळी कर्तव्यावर असलेले भूलतज्ञ डॉ.काशीकर यांनी रुग्णाला तातडीने व्हेंटीलिटरवर घेतले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. या घटनेनंतर लव थोरात, कुश थोरात आणि अन्य एकाने वार्डात गोंधळ घालत सक्शन मशिनची तोडफोड केली तसेच कॉटही फेकून दिले. कर्तव्यावरील डॉक्टरांना धक्काबुक्कीही करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देखील घटनेची माहिती दिली. यानंतर स्वत: जिल्हाधिकारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. यावेळी कोरोना वार्डासाठी नियुक्त पोलीस कर्मचारी गायब होते. त्यानंतर पोलीसांच्या फौजफाटा रुग्णालयात दाखल झाला. गोंधळा घालणार्‍यांना पोलीसांनी अटक केली. जिल्हा रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था तातडीने अधिक आवळण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. त्या वार्डाच्या बाहेर बॅरीकेट टाका आणि त्या परिसरात डॉक्टर आणि सुरक्षा कर्मचार्यांशिवाय कोणीही गेले नाही पाहिजे याची दक्षता घेण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले. या घटनेने रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Tagged