BEEED JILHA PARISHAD

जि.प.गट, गणांची अंतिम रचना जाहीर

बीड

जिल्हाधिकाऱ्यांकडून शिक्कामोर्तब

शुभम खाडे/बीड : जिल्ह्यात जिल्हा परिषद गटांची संख्या 9 ने तर पंचायत समिती गणांची संख्या 18 ने वाढून जिल्ह्यात 69 गट व 138 गण तयार झाले आहेत. ही अंतिम प्रारूप प्रभाग रचना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सोमवारी प्रसिद्ध केली. यापूर्वी हीच रचना जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केल्यानंतर 151 आक्षेप आले होते. त्यापैकी केवळ 5 आक्षेप विभागीय आयुक्तांकडून ग्राह्य धरण्यात आले. त्यामुळे रचनेत फारसे बदल झाल्याचे दिसून येत नाही.

जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केलेल्या जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणाची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाभरातून 151 हरकती जिल्हा प्रशासनाकडे नोंदवल्या गेल्या. परंतु विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणीवेळी अनेक आक्षेपधारकांनी दांडी मारल्याचे दिसून आले. त्यामुळे आयुक्तांनी पडताळणी करून निर्णय दिले. त्यांनी 151 पैकी केवळ 5 हरकती मान्य केल्या. दरम्यान, आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला वेग येणार असून पदाधिकारी, कार्यकर्ते अंग झाडून कामाला लागणार आहेत.

या गटातील गावांमध्ये बदल
गेवराई तालुक्यातील रेवकी गटातील गैबीनगर तांडा हे धोंडराई गटात समाविष्ट करण्यात आले आहे. माजलगावातील टाकरवण गटांतर्गत वाघोरा गणात असलेले सुर्डी नजीक हे टाकरवण गणात समाविष्ट करण्यात आले तर टाकरवणमधील बाराभाई तांडा वाघोरा गणात समाविष्ट करण्यात आला आहे. केज तालुक्यातील चिंचोली माळी गटातील बोबडेवाडी हे गाव युसूफ वडगाव गटात समाविष्ट करण्यात आले आहे. आष्टी तालुक्यातील लोणी स. गटातील सोलापूरवाडी रुई नालकोल गटामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. तर रुई नालकोलमधील खरडगव्हाण लोणी स.मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. याबरोबरच कडा गटातील पिंप्री घुमरीचा रुई नालकोल गटामध्ये समावेश करण्यात आला आहे. टाकळी आमीया कडा गटात आष्टी तालुक्यातील टाकळी अमीया हे पंचायत समिती गणाचे गावच कडा गटात समाविष्ट झाल्याने आता त्याऐवजी रुई नालकोल हा पंचायत समिती गण करण्यात आला आहे.

Tagged