राज्य निवडणूक आयोगाची घोषणा
बीड : राज्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला आहे. निवडणुकीसाठी बीड जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांचा यामध्ये समावेश आहे. आजपासूनच (दि.८) निवडणुकीच्या आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
अ वर्गातील बीड नगरपरिषदेसह वर्गातील अंबाजोगाई, माजलगाव, परळी,
गेवराई, धारूर या पाच नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका जिल्हाधिकाऱ्यांकडून दि.२० जुलै रोजी करण्यात येत आहेत. त्यानंतर नामनिर्देशनपत्र दि.२२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ते दि.२८ जुलै रोजी दुपारी २ वाजेपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरता येईल. सदरील भरलेली नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याचा कालावधी दि.२२ ते दि.२८ जुलै दरम्यान सकाळी ११ ते ३ या वेळेत (शासकीय सुट्टी वगळून) असणार आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी व वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी दि.२९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दि.४ ऑगस्ट दुपारी ३ वाजेपर्यंत असेल.
अपील करायचे असल्यास, अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी. मात्र दि.८ ऑगस्ट पर्यंत ही प्रक्रिया करता येईल. उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी निवडणूक चिन्ह घेऊन अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रकाशित केली जाईल. मतदानाचा दि.१८ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत असणार आहे. मतमोजणी व निकाल दि.१९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला कळविली आहे.