vinayak mete

विनायकराव मेटे अपघात प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र


बीड दि.16 : शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलीस ठाण्यात चालक एकनाथ कदम याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राज्य सीआयडीने कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच कार चालक एकनाथ कदम याला ताब्यात घेतले जाणार आहे.

विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु तिथे विनायक मेटे यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली होती. तेव्हा प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मेटे यांच्या मृत्युची सखोल चौकशी करण्यात येईल असं जाहीर केलं होतं. तसंच काही दिवसांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करुन आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीआयडी या प्रकरणाची चौकशी करत होती. विनायक मेटे यांची कार ज्या-ज्या मार्गावरुन गेली होती तिथल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फूटेज सीआयडी तपासत होती. याशिवाय आयआरबीचे इंजिनिअर्स आणि टेक्निकल अभियंते यांचे एक पथक तयार करुन त्यांचं मत जाणून घेण्यात आलं होतं की, यामध्ये कोणाची चूक तुम्हाला दिसते?. सीआयडीने पाहिलेल्या फूटेजमध्ये हा चालक ताशी 120 ते 140 किमी वेगाने गाडी चालवत असल्याचं दिसत होते. ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच्या थोडा वेळ आधी चालक एकनाथ कदमने उजवा टर्न घेऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्याला ओव्हरटेक करता येणार नाही हे माहित असूनही त्याने ओव्हरटेक केला आणि त्याचा परिणाम डाव्या बाजूला झाला आणि अपघात घडला. सीआयडीच्या तपासात या बाबी समोर आल्यानंतर त्यांनी रसायनी पोलिसात चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

चालकाच्या वेगवेगळ्या जबाबामुळे संशय
दरम्यान विनायक मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी मेटेंच्या वाहन चालकावर संशय घेत त्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. विनायक मेटे यांचा चालक वेगवेगळा जबाब देतोय, असा आरोप मेटे यांच्या भाच्याने केला आहे. मेटेंच्या चालकाने लोकेशन विचारलं त्याने उत्तर दिलं नाही, असा देखील आरोप केला होता. सीआयडीच्या चौकशीत विनायक मेटे यांचा कार चालक एकनाथ कदम याच्यावर ठपके ठेवण्यात आला. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. आता लवकरच त्याता ताब्यात घेतलं जाणार आहे.

Tagged