मतदानासाठी गावी येणार्‍या तरुणाचा अपघातात मृत्यू!

बीड


मांजरसुंबा-नेकनूर मार्गावरील घटना
नेकनूर दि.17 : उद्या ग्रामपंचायतचे मतदान आहे. त्यासाठी परजिल्हात असलेले मतदार गावी परतत आहेत. औरंगाबाद येथून मतदानासाठी दुचाकीवर बीड जिल्ह्यात येत असलेल्या तरुणाला भरधाव कारची धडक बसली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.17) सायंकाळच्या सुमारास मांजरसुंबा-नेकनूर महामार्गावर घडली.

श्रीकृष्ण अनिल गायकवाड (वय 35 रा.आनंदगाव सारणी ता.केज) असे मयताचे नाव आहे. श्रीकृष्ण हे कामानिमित्त औरंगाबादेत होते. ग्रामपंचायत निवडणुक असल्याने मतदानासाठी ते एक दिवस आगोदरची गावी निघाले. औरंगाबाद येथून दुचाकीवर (एमएच 20 सीएक्स-1102) गावी जात होते. केज-मांजरसुंबा रोडवरील गवारी पाटीजवळ समोरुन आलेल्या इनोव्हा (एमएच-20 एल-7009) गाडीने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या गायकवाड यांना नागरिकांनी तातडीने नेकनूर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अनेक परजिल्हा, परराज्यात कामानिमित्त गेलेले बांधव मतदानासाठी गावी येत आहेत. सर्वांनी येताना काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.

Tagged