परळी मतदारसंघात राष्ट्रवादीला कौल; 25 हून अधिक ग्रामपंचायती आ.मुंडेंच्या ताब्यात

न्यूज ऑफ द डे परळी बीड

नाथ्राच्या सरपंचपदी अभय मुंडे

परळी : विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणावर यश मिळताना दिसून येत आहे. असे असले तरी भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जन्मभूमी असणाऱ्या परळीतील नाथ्रा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ.धनंजय मुंडे आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे चुलतभाऊ अभय मुंडे विजयी झाले आहेत.

या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र येत 8 सदस्यांची बिनविरोध निवड केली. यात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत 5 सदस्य तर भाजप पुरस्कृत 3 सदस्य निवडून आले आहेत. मुंडे बहिण-भावाने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले असले तरी वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार गौतम आदमाने यांनी माघार न घेता निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र या निवडणुकीत अभय मुंडे हे विजयी झाले आहेत. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे याच्यात नेहमीच वाद बघायला मिळत असतो. एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढविणारे आणि टीका करणारे भाऊ-बहिण यांचे एकाच बॅनरवर फोटो लागल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली होती. सरपंच पदासाठी मुंडेंचे चुलत भाऊ अभय मुंडे रिंगणात होते. त्यांच्यासमोर वंचित बहुजन आव्हान होते. मात्र, हे आव्हान त्यांनी लिलया पेलले.

धनंजय मुंडेंचे 10 वर्षे वर्चस्व
मागील दोन टर्मपासून नाथ्रा ग्रामपंचायत राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नाथ्रा ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. त्यावेळी बीड जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांच्या मातोश्री या सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यापूर्वी अजय मुंडे हे देखील सरपंच म्हणून निवडून आले आहेत. आता त्यांचे बंधू अभय मुंडे हे सरपंचपदी निवडून आल्याने सत्ता पुन्हा त्यांच्याच घरात राहिल्याचे दिसून येत आहे.

धनंजय मुंडे समर्थकांकडून जल्लोष
धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात त्यासाठी मोठी विजय उत्सव करण्याची तयारी करण्यात आली असून कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी स्टेज करण्यात आले आहे. तसेच, डॉल्बी आणि ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्ते आपला आनंद उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करत आहेत. मतदारसंघातील बहुतांश ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे समर्थक उमेदवार विजयी झाले आहेत किंवा आघाडीवर असल्याचे प्राथमिक फेरीत दिसून येत आहे.

आ. धनंजय मुंडे गटाचा दावा
परळी तालुक्यातील आतापर्यंत जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक 28 ग्रामपंचायतीवर विजय मिळवला. तर अंबाजोगाई तालुक्यातील व परळी मतदारसंघातील 13 पैकी 8 ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्याचा दावा धनंजय मुंडे गटाने केला आहे.

Tagged