लवकरच होणार बीडमध्ये भव्य सभा
बीड : बीआरएस (भारत राष्ट्र समिती) पक्षाचे धोरण आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या विकासाच्या दुरदृष्टीने महाराष्ट्राच्या नेत्यांना भुरळ टाकली आहे. त्यात आता बीड जिल्ह्यातील नेत्यांनाही बीआरएस पक्षाचे धोरण आणि कार्यपध्दती खुणावतेय. जिल्ह्यातून बीआरएस पक्षात इनकमिंगला सुरुवात झाली असून बीडचे माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे, ऊसतोड कामगारांचे नेते प्रा.शिवराज बांगर यांनी बीआएस पक्षात बुधवारी (दि.5) हैद्राबाद येथील प्रगती भवन येथे जाहीर प्रवेश केला. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा बीआरएस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर राव यांनी दोघांचे स्वागत करून पक्ष कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बीआरएस पक्षाचे राज्याचे समन्वयक प्रविण जेठेवाड, माजी आमदार हर्षवर्धन जाधव, निरीक्षक तथा आमदार जीवन रेड्डी, दिग्विजय गोरे, अशोक पांढरे, रामप्रसाद कोल्हे, विलास नवले, दलित नेते अविनाश प्रघानेन, आदित्यवर्धन जाधव आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात जाहीर सभा घेतल्या. अनेक माजी आमदारांनी त्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केलेला आहे. केसीआर यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे पक्षाची नोंदणी केली आहे. चार चाकी कारचे चिन्ह मिळावे अशी मागणीही आयोगाकडे केली आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या सहा विभागातील समन्वयकांच्या नावाची घोषणाही केसीआर यांनी केलेली आहे. नांदेडनंतर बीड जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करण्याचे संकेत मिळत होते. अशातच दिलीप गोरे, प्रा.शिवराज बांगर यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रासह मराठवाड्यातील प्रश्न, समस्या जाणून घेतल्या. तसेच, त्यांच्या पक्ष आणि सरकारच्या योजना, धोरणांबाबत माहिती दिली. येत्या काळात महाराष्ट्रात ताकदीने काम उभारणार असल्याचे त्यांनी म्हटले.
बीडला तेलंगणातून पाणी देऊ -चंद्रशेखर राव
बीड जिल्ह्यातील लाखो शेतकर्यांना बीआरएस पक्षात सामील करा. मी बीड जिल्ह्यात तेलंगणातून पाणी आणून देतो, जवळपास 400 टीएमसी पाणी बीड जिल्ह्यात पोहोचवण्यासाठी संपूर्ण ताकद लावतो असा शब्द मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील सर्वात मागासलेला जिल्हा म्हणून बीड जिल्हा ओळखला जातो. जिल्ह्यात रेल्वे, विमानतळ नाही यावर देखील त्यांनी भाष्य केले.
लवकरच बीडमध्ये होणार सभा -प्रा.शिवराज बांगर
मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे महाराष्ट्राचा प्रचंड अभ्यास असलेले नेते आहेत. त्यांनी नांदेडमध्ये दोन सभा घेतल्या. लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे दोन लाख लोकांची सभा होणार असून त्यानंतर बीड येथे एक लाख लोकांची सभा घेण्याचे नियोजन आहे. येत्या काळात पूर्ण ताकदीने बीआरएस पक्षासाठी काम असल्याचे प्रा.शिवराज बांगर यांनी म्हटले आहे.