अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, राज्यभरात झळकतायत बॅनर!

देश विदेश न्यूज ऑफ द डे मराठवाडा महाराष्ट्र

बीड दि.26 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा बदलणार का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. अशातच एका मुलाखतीत बोलताना अजित पवारांनी व्यक्त केलेल्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांसोबतच अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मात्र राज्यभरात अजित पवारांचे पोस्टर्स लावून दादांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. या झळकणार्‍या बॅनरमुळे मोठी राजकिय घडामोड घडणार असल्याची चर्चा होत आहे.

मुंबईत राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकार्‍यांनी अजित पवार यांचे पोस्टर्स लावून राज्यात सुरु असलेल्या राजकिय घडामोडींना हवा देण्याचं काम केलं आहे. या पोस्टर्स वर ‘दादांनी मुख्यमंत्री व्हावं…, ‘दादा मुख्यमंत्री झाले तर?’असा प्रश्न उपस्थित करून अजित पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात युवकांचे अनेक प्रश्न सोडवले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

26 एप्रिलला मुंबईच्या चेंबूर भागात आयोजित ‘युवा मंथन… वेध भविष्याचा’ या कार्यक्रमानिमित्त हे पोस्टर्स झळकविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, खा.सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही उपस्थित राहणार आहेत. मुंबईच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांच्याकडून सर्वत्र हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. तसेच युवा मंथन या कार्यक्रमाचं आयोजन मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्याकडून करण्यात आलं आहे. तसेच नागपुरातही उत्साही कार्यकर्त्यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं या आशयाची पोस्टरबाजी केली आहे. विशेष बाब म्हणजे, देवेंद्र फडणवीसांच्या घरापासून काही अंतरावरच हे पोस्टर्स झळकावण्यात आले आहेत. नागपूरच्या लक्ष्मीभूवन चौकात आजीत पवार मुख्यमंत्री पदाचे योग्य अजित पवारच मुख्यमंत्री पदाचे योग्य उमेदवार असल्याचे बॅनर्स झळकावण्यात आले आहेत. दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांनीही देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री, असे होर्डिंग्स लावले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मात्र यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

Tagged