appasaheb jadhav

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव अन् उपजिल्हाप्रमुख वरेकर यांच्यात धक्काबुक्की

न्यूज ऑफ द डे बीड राजकारण


प्रतिनिधी । बीड
दि.18 : ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त होणार्‍या सभा स्टेजची पाहणी करताना ठाकरे गटाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्यात कुठल्यातरी कारणावरून शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्यानंतर गणेश वरेकर यांनी अप्पासाहेब जाधव यांची काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओची काच फोडल्याची घटना घडली. त्यामुळे शिवसेनेतील ठाकरे गटातील अंतर्गत धूसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.


शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांची महाप्रबोधन यात्रा बीड शहरात 20 मे रोजी होत आहे. येथील पारस नगरीत सभा स्टेजची पाहणी करण्यासाठी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या आल्या होत्या. शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्यासह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्याचवेळी पाठीमागे उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्यात कुठल्यातरी कारणावरून शाब्दीक बाचाबाची झाली. यावेळी दोघांमध्ये धक्काबुक्कीचा ही प्रकार घडला. त्यानंतर उपस्थितांनी सोडवा सोडवी केली. मात्र अचानक गणेश वरेकर यांनी अप्पासाहेब जाधव यांच्या उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ गाडीवर लाकडी फळी भिरकावली. त्यात जाधव यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे.

याबाबत बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप म्हणाले, हा आमचा आपसातील गैरसमजातून झालेला प्रकार होता. पण आता हा वाद मिटला आहे. वरेकर यांना समजावून सांगितलेले आहे. काहीजण चुकीची माहिती बाहेर देत आहेत. चुकीच्या माहितीवर कोणीही विश्वास ठेवू नये, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना दिली.

Tagged