शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांचा गंभीर आरोप
प्रतिनिधी । बीड
दि.19 : उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून महाप्रबोधन यात्रेसाठी बीडमधील अधिकारी, कर्मचारी अन् व्यापार्यांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे जमा केले. या पैशाच्या देवाण-घेवाणीतून जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव आणि सुषमाताई अंधारे यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की अप्पासाहेब जाधव यांनी अंधारेताईंना दोन कानसुलात लगावल्या. अशा असंस्कारी जिल्हाप्रमुखांना आमच्या पक्षात अजिबात स्थान नाही. या कृत्यामागे आमच्या शिवसेनेचा हात आहे हे आरोप आमच्यावर करू नका, संस्कार तपासा. आज अप्पासाहेब माझं पद सुषमाताई पैसे घेऊन विकत असल्याचे सांगत आहेत त्याच अप्पासाहेबांनी पैसे देऊनच हे पद घेतले होते असा आरोप शिवसेनेचे(शिंदे गट) जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केला आहे.
बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजीमंत्री प्रा.सुरेश नवले यांची उपस्थिती होती.
सचिन मुळूक म्हणाले, आप्पासाहेबांनी जेव्हा चापटा मारल्या त्यावेळी बघणारे शेकडो लोक होते. या प्रकारानंतर तिथे असलेल्या लोकांनी आप्पासाहेबांना कपडे फाटोस्तोवर मार दिला. तेथून आप्पासाहेब पळून गेले. परंतु या मारहाणीची संपूर्ण माहिती पक्षाकडून लपविण्यात आली. सुषमाताईं महाराष्ट्रभर ज्या प्रबोधनाची भाषा करीत आहेत त्यांना विनंती की आधी आपल्या जिल्हाप्रमुखाचे त्यांनी प्रबोधन करावे, त्यांच्यासाठी प्रबोधन शिबीरं भरवावीत, मगच आमच्या (शिंदे गटावर) वर आरोप करावेत, असेही जिल्हाप्रमुख सचिन मुळूक म्हणाले.
सुषमाताई मारहाणीची घटना का लपवता? जाधववर
गुन्हा दाखल करा -माजीमंत्री प्रा.सुरेश नवले
आप्पासाहेब जाधव यांच्याकडून सुषमाताईंना मारहाण झाल्याच्या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत. कुठल्याही महिलांवर हात उचलले जावू नयेत. आप्पासाहेब यांचे वर्तन सामाजिक, राजकीय संस्कृतीला बाधा आणणारे आहे. सुषमाअक्कांनी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंदविणे अपेक्षीत होते. मात्र त्यांनी ते केले नाही. सुषमाअक्का चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. त्यांच्यावर जर कोणी हात उचलत असेल आणि त्या गुन्हा नोंदवत नसतील तर इतर महिलांनी याकडे कसे बघायचे? तुमचा काय आदर्श घ्यावा? आपण गुन्हा नोंद केल्यास आपल्या पक्षाचे जाहीर वाभाडे निघू शकतात, असे वाटल्याने त्यांनी तो गुन्हा नोंदविलेला नाही. मात्र पोलीसांनी स्वतः पुढे येऊन आप्पासाहेब जाधव यांच्यावर गुन्हा नोंद करावा, असे आवाहन माजीमंत्री प्रा. सुरेश नवले यांनी केले आहे.