mushakraj

सामाजिक कार्यकर्ते मुषकराज 2023 भाग 8

संपादकीय

मुषक अन् बाप्पा आज बीडच्या रेस्ट हाऊसला मुक्कामी होते. सकाळचे सात वाजले, बाप्पांनी मुषकाला आवाज दिला “अरे कुठे लपलायस आवर बिगीनं. आज काय सुट्टी घ्यायचा विचारंय का तुझा?” आवाज ऐकून मुषक बाप्पांच्या पुढ्यात हजर होत म्हणाला “इनमिन आपल्या हातात 10 दिवस. त्यातल्या एक दिवस सुट्टी घेतली तर जिल्ह्याची खबरबात कशी कळायची? नेते लोकांना असतात दोन दोन महिने सुट्ट्या. त्यात आपण गडीमाणसं” (बाप्पांनी कळून न कळल्यासारखा विषय बदलायचा ठरवला. काही झालं तरी दौर्‍यात राजकारण अजिबात आणायचं नाही. जन्तेला राजकारणाचा कितीही किडा असला तरी यावेळी फक्त सामान्यांचे प्रश्न कळायला हवेत, असच जणू बाप्पानं ठरवलेलं होतं.)

दोघांचं संभाषण सुरू असतानाच दाराची बेल वाजली. मुषकानं दार उघडलं. दारात साक्षात बाप्पांचे नावकरी. या या ढौव्ळेबापु म्हणत मुषकानं त्यांचं स्वागत केलं. आत येताच बाप्पांना वंदन केलं. मुषकानं त्यांची ओळख करून देत सांगितलं बाप्पा हे तुमचेच नावकरी. बीडच्या सगळ्या सरकारी ऑफिसमधील क्लर्क लोकांना ह्यांनी ‘पत्रापत्री’चं काम लावलंय. सोमवार आला की बस उपोषणाला दे निवेदन. पेपरमध्ये बातमी आली की कर वरीष्ठ बाबूंना ईमेल. बीडपासून मंत्रालयापर्यंत ‘ये ढौव्ळे बापू कौन है’ अस्सं ईच्चारतात लोक. ‘सोमवार म्हणजे आंदोलनवार’च. ढौव्ळे बापू उपोषणाला बसले की समजून जायचं आज सोमवारंय. खरं तर कलेक्टर मॅडमला सांगून ह्यांच्यासाठी तिथंच छोटसं घर बांधून द्यायला लावा. त्या दाढीवाल्या सीएम सारखचं है ह्यांचं. गडी झोप्तो कवा हेच ध्यानात नाय येत. त्यो झोप्ला की मग सगळं प्रशासन झोप्लं म्हणून समजा. हे सरकारी बाबुंसारखं लोकांच्या खिशाला खात नैत, पण निदान टायमाला स्वोतःच्या पोटाला खातपीत जावं. अशी जिल्ह्यातील जंन्तेची तक्रार हैय” मुषकाला थांबवत बाप्पा म्हणाले, ‘अरे इकडे ढग आले की तिकडे ह्याचं कांदा चिरायला सुरू होतं. पावसाचा थेंब पडायला अन् हे भजे तळायला कधी चुकत नैत कधी. उठसूठ फेसबूकवर ‘खाना खजाना’ सुरू असतो. अन् तरीही तू म्हंतो खातपित जावं? कसा इस्वास ठेवायचा तुझ्या बोलण्यावर?” “तसं नव्हं बाप्पा हे दिवस उगवायला उपाशीतापाशीच बीडात येतेत. अन् त्येचा परिणाम रक्तात गोडाची लेवल कधी वर गेली समजलीच नै. अन् वरतून अजूनबी ‘च्या’ ला कैच कमी नै.” मुषकाच्या या स्पष्टीकरणावर बाप्पा बोल्ले “अरे हळू बोल. त्यांच्या गृहमंत्र्यांना ऐकू जाईल. मग च्याबी बंद अन् बीडला येणंबी बंद” त्यावर मुषक बोलू म्हणाले “स्वॉरी स्वॉरी… गोडाची पातळी च्यानं नै वाढली. ते नाय का घरी कायबी बनवलं की टीप टाकून ठीवतेत ‘आपआपल्या घरी करून खा’ त्याचा परिणाम हैय त्यो” बरं जाऊं दे, मजाक सोडून दे. म्हणत बाप्पांनी ढौव्ळे बापुंना आशीर्वाद देत “आज तुम्हाला भेटून आनंद वाटला. असेच आंदोलनं करत रहा”, अशा भरभरून शुभेच्छा दिल्या.

बाप्पांनी फक्त अन् फक्त सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आजचा दिवस राखीव ठेवला होता. मुषकाने पुढचा परिचय करून द्यायला सुरूवात केली. हे हैत शिरूरच्या आर्वीचे दिपककाका नागरगोजे. गावच्या माळरानावर जिथं कुसळं उगवत नव्हतं तिथं अक्षरशः नंदनवन फुलवलंय यांनी. आपली वडीलोपार्जित सगळी जमीन ‘शांतीवन’ या संस्थेला दान देत त्या संस्थेमार्फत आजपर्यंत सर्व जाती धर्मातील ऊसतोड मजुरांच्या मुलांचं शैक्षणिक आणि काहींचं कायमचं पालकत्व स्विकारलंय ह्यांनी. ज्यांना जन्मतःच अक्षरशः उकीरड्यावर फेकून देण्यात आलं त्यांचा शांतीवनने सांभाळ केलाय. त्यातलेच 40-50 जण डॉक्टर झालेत. काही अभियंते, काही वकील, शेकडो मुली नर्सिंगमध्ये सेवा देत आहेत. कितीतरी बाल विधवांना त्यांनी शिक्षण देऊन त्यांच्यात स्वाभीमानानं जगण्याचं बळ निर्माण केलंय. ज्यांना मायबाप नाहीत, त्यांच्या डोक्यावर त्यांनी मायबापाचं छत्रं धरलंय. बाप म्हणून कित्येक मुलींचं कन्यादान पार पाडलंय. गावात बारामहिने दुष्काळ असायचा. लोक बाहेर राज्यात ऊसतोडीला जायचे. तेव्हा त्यांनी गावातच शेकडो शेतकर्‍यांना शेततळी करून दिली. गावच्या नदीचं खोलीकरण केलं. भुजल पातळी वाढल्याने आता गावात बारामहिने पाणी असतं. तिथल्या शेतकर्‍यांनी फळबागा, माळवं, फुलशेती करून घरादारात लक्ष्मी नांदावी असं वातावरण करून टाकलंय. आता तर त्यांनी ऊसतोड मजुरांच्या मुलींसाठी थेट सीबीएसई पॅटर्नच्या अभ्यासक्रमासाठी घंटाभर बघतच राहावी अशी दर्जेदार शाळा अन् मुलींचं वसतीगृह बांधलेय. त्यांचाच प्रोजेक्ट समोर ठेवून शासन कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये सुरू करणार आहे. वृध्दाश्रमाचंही काम जोरात सुरू आहे. त्यांनी लिहीलेलं ‘गुलामाचं जगणं अन् अंधारातलं जिणं’ हे समकालीन प्रकाशनाचं पुस्तक मार्केटमध्ये आलंय” मुषकानं अशी ओळख करून दिल्यानंतर अशीही काही माणसं बीड जिल्ह्यात राहतात हे बघून बाप्पांचा ऊर अभिमानानं भरून आला. बाप्पांनी त्यांच्या कार्याला भरभरून अशीर्वाद देत रिध्दी-सिध्दीपर्यंत ह्यांच्या कार्याची माहिती पोहोचवा म्हणून मुषकाला पत्र लिहायला सांगितलं.

आता वेळ सरत आला होता. त्यामुळे मुषकाने बाकी सामाजिक कार्यकर्त्यांचा थोडक्यात परिचय करून द्यायला सुरूवात केली. “हे संतोष गर्जे. ह्यांचं गेवराईत बालग्राम नावाचं अनाथाश्रम आहे. शेती आणि सिंचनाचे काम वगळता दिपक काकांचे जेवढे म्हणून काम ऐकले तेवढेच ह्यांचेही काम आहे. डोंगराच्या पायथ्याशी निसर्ग सानिध्यात त्यांचं बालग्राम पाहून मन प्रसन्न होतं. हे बीडचे बाबा आमटे अर्थात दत्तामामा बारगजे. बीडच्या पाली धरणाच्या समोरील डोंगरावर ह्यांची ‘इन्फंट इंडीया’ नावाची संस्था आहे. समाजाने टाकून दिलेले, तिरस्काराच्या भावनेनं बघीतल्या जाणारे एचआयव्ही बाधीत मुला-मुलींचा 2006 पासून ते सांभाळ करतात. जोपर्यंत स्वतःच्या डोळ्यांनी आपण तिथे जावून बघत नाहीत तोपर्यंत त्यांच्या कामाची प्रचिती येणार नाही. या तिसर्‍या आहेत मनिषा पवार. नेकनूर जवळ ‘आपला परिवार’ नावानं त्या वृध्दाश्रम चालवतात. एकवेळ लहान मुलं सांभाळलेली बरी पण ही म्हातारी कोतारी माणसं सांभाळणं म्हणजे कठीण काम. वृध्दांची संडास, लघवी. जेवणाची वेगवेगळी पथ्ये, त्यात त्यांचं आजारपण असेल तर मग पुसूच नका. मनिषा ही मुलगी असुनही ती या समाजसेवेत आली त्यासाठी सार्‍या जिल्ह्याला तिचं कौतुकंय. हे चौथे समाजसेवक कर्ण तांबे शिरूर तालुक्यात राक्षसभुवनला ह्यांचा ‘आजोळ’ नावाचा अनाथ वृध्दाश्रम आहे. त्याचं अन् मनिषा पवार ह्यांचे कष्ट सारखेच. हे पाचवे समाजसेवक गोवर्धन दराडे. बीडच्या गोरक्षनाथ टेकडीजवळ ह्याचा अनाथ मुलांचा पसायदान हा प्रकल्प. तर हे निलेश मोहिते. ह्याचं बीडजवळ रामनगरला ‘स्नेहसावली’ नावाचा अनाथ मुलांसाठीचा प्रकल्प आहे. हे सुरेश राजहंस.. ते शिरूरच्या ब्रम्हनाथ येळंबला तमाशा कलावंतांच्या मुला मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सेवाश्रम नावाचा प्रकल्प चालवतात.” बाप्पांनी ह्या सगळ्यांची आणखी खोलात जाऊन माहिती घेतली. प्रत्येकजण निःस्वार्थ भावनेनं करीत असलेले काम पाहून बीड जिल्ह्याची एक वेगळी ओळख बाप्पांना झाली होती. दिवे लागणीची वेळ झाल्यानंतर बाप्पांनी मुषकाला जिल्हावासियांना एक पत्र लिहायला सांगितलं. त्यात पत्राचा मजकूर होता…

“अनितीने मिळवलेला पैसा एकटा घरात येत नाही. तो येताना तळतळाट घेऊन येतो. त्यामुळे घरात आजारपण, दुःख, नैराश्य येते. सुखशांती नष्ट करते. निदान एखादा टक्का तरी अशा प्रकल्पावर खर्च करायला सुरूवात करा… बघा मनःशांती लाभेल तुम्हाला…” आपलाच बाप्पा

Tagged