mushakraj

दोन पालकमंत्री मुषकराज 2023 भाग 9

संपादकीय


बाप्पांच्या स्वागतासाठी आज बीडच्या रेस्टहाऊसमध्ये दोघा नेत्यांनी एन्ट्री केली. मीच या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दोन्ही नेते आपआपसात भांडत असल्याचे पाहून बाप्पांनी मुषकाला दोघांनाही आत सोडण्याची आज्ञा केली.

अतुलभौव सावे – याला काय अर्थय बाप्पा. दिड वर्षापासून मी या जिल्ह्याचा पालक है. याच नैत तर जालन्याचा पण कारभार मी पाहतोय. अन् कोणीतरी उशीरा उठून येऊन म्हणतंय मी पालकमंत्री म्हणून…

धन्नुभौ मुंडे – आले मोठे दिड शहाणे. म्हणे मी पालकमंत्री. अरे तुम्ही पालकमंत्री पद मिरवता तर निदान दिड दिवस तरी मुक्काम केला का कधी जिल्ह्यात? काय तर म्हणे कारभार पाहतो. या राज्याचा कृषीमंत्री है मी. बीडचा पालकमंत्री म्हणून तुमचं नाव चार लोकांत काढलं तर लोक उठून उभा र्‍हावून शिव्या हासडत्यात. लाज वाटतीये आमाला तुमी आमचे पालमंत्री असल्याची. इथून बाहेर जाताना तरी गुपचूप जावं. दिड वर्षात निदान नाव तरी कमवायचं होतं ल्येका. ‘अतुल सावे अन् कधीमधी बीडात पण येत जावे’ असे होर्डिंग लागलेत जागोजागी…

अतुलभौ सावे – मला काय एकच काम है का? जालना पण बघायचाय, माझं मंत्रालय पण बघायचंय. माझा कारभार चांगलाच है तुमच्या बीडातले पेप्रावाले जरा जास्तीचं छ्यापतेत. पण आपली इमेज बघायची असल तर छत्रपती संभाजीनगरला येऊन बघा. मग कळंल तुमाला माझं काय नाव है ते. आता उगी लै उकांडा उचकाय लावू नका. ‘माझा नसेल वाटा तर मी काढतो एकएकाचा काटा’ खोटं वाटंत असेल तर तुमच्या ‘डॉ.साबळे’ ला इच्चारा. मी कुणालाच प्रेम, दया, शांती, करूणा दाखवत नस्तो.

धन्नुभौ मुंडे – ‘हमे तो अपनोंने लुटा गैरो मे कहा दम था. हमारी कश्ती वहॉ डुबी थी जहॉ पानी कम था’. माणसानं अस्सं स्वतः समोर येऊन वॉर करून आमच्याशी थेट भिडावं. आमच्याकडं पण सभागृहात लाखभर रुपयात प्रश्न इच्चारणारे तस्ले गोपीचंद लै हैती. कुठून कुठून कशी टक्केवारी जमवली त्याची यादीच है आमच्याकडं. गावोगावच्या गोपीचंदांनी ती फक्त ग्रामसभेत वाचून दाखवूनी म्हणजे झालं. 10 टक्क्याहून डायरेक्ट 12 टक्के? जरा अति झालं असं नैय का वाटत तुमाला?

बाप्पा – मुषका दोघांनाही म्हणावं जरा शांत राहा. अन् तू सांग जरा ह्यांचं काय सुरूये?

मुषक – जी बाप्पा… अतुलभौचा इंधन अधिभार म्हणून बीडावर गेल्या दिडवर्षात लैच अन्याय झालाय. पठ्ठ्या बीडात येतोच कवा तर इंधन अधिभार? लैत लै दिड वर्षात चार चकरा. हे कमी म्हणून की काय पण आतली खबर अशी है की पठ्ठ्यानं बीडात फिरायला गाडी पाह्यजे म्हणून राजशिष्टाचार विभागाकडे दोन गाड्यांची मागणी केली है. या विभागानं गाड्या खरेदीसाठी 75 लाख रुपयांचा फंड डीपीसीकडे मागीतला है. माझं तर म्हणणं है की बाप्पा तुम्हीच आदेश देऊन हा निर्णय थांबवायला हवाय. एकतर हे येतात कवाबवा मग ह्यांना कशाला करायची गाडीत बसून हवा? अन् बायचान्स उद्या ह्यांचं पालकपद गेलंच तर नवे पालकमंत्री म्हणून धन्नुभौ तर हैतच की… त्यांच्याकडं गाड्यांची काय कमी है का? 80 लाखाची एक गाडी रात्री धडकली तर त्यांच्या सेनापतीनं सकाळी 1 कोटी 80 लाखाची नवी कोरी गाडी घेऊन दिली. अशा एक नै तर कित्येक गाड्या त्यांच्याकडं हैती. मग सरकारी पैशातून 75 लाखाची गाडी काय करायची है?

धन्नुभौ – मुषकानं मांडलेलं म्हणणं आपल्याला एकदमच पटलं है. लोकांचा पैसा है तर लोककल्याणासाठी खर्च व्हायला हवाय. आता हेच बघा लोकांना लाईटची समस्या है. आपुन आल्या आल्या परळी तालुक्यात 150 कोटी रुपयांच्या चार सबस्टेशला मंजुरी देऊन टाकली. परळीत कृषी महाविद्यालयाच्या उभारणीसाठी 154 कोटी, कृषी व्यवसाय व्यवस्थापनासाठी 135 कोटी, सोयाबीन प्रक्रीया केंद्रासाठी 24 कोटी, परळीच्या वैद्यनाथाच्या ज्योतिर्लिंगाच्या तिर्थक्षेत्र इकासासाठी 286 कोटी, परळीच्या क्रीडा संकुलासाठी 20 कोटी, परळीच्या बसस्थानक नुतनीकरणासाठी 28 कोटी, असे मिळून 797 कोटी केवळ जंन्तेच्या कल्याणासाठी खर्च होणारैत.

मुषक – (बाप्पांच्या कानात कुजबुजत) बाप्पा हे एकट्या परळीलाच बीड जिल्हा समजून र्‍हायलेत. बीड जिल्ह्यासाठी काय ते इच्चारून घ्या… अन् दुसरं ते परळीचं बसस्टँडवर अजून किती निधी टाकणार अन् अजून कितीदा दुरूस्त करणार हैत ते पण इथंच सांगा म्हणावं…

धन्नुभौ – ऐऽऽ मुषका… बाप्पाच्या कानात काय कुजबूज लावली त्वा. मला इच्चार की मी सांगतो ना… पैठणंच पाणी माजलगाव धरणात आणायला 536 कोटी मिळणार हैत. कलेक्टरचं नवं कार्यालय बांधायला 63 कोटी, जिल्ह्याच्या नऊ तालुक्यात ऊस्तोड मजुरांच्या पोरींना शिकण्यासाठी वस्तीगृह त्याला 80 कोटी, बीडच्या कृषी भवनासाठी 15 कोटी असे मिळून 694 कोटी देतोय. अरे हे फक्त दोन महिन्यात मी मंत्री झाल्यापासुनचं सांगतोय. आमच्या ताईसाहेबांनी मागच्या टर्मला 10 हजार कोटी आणल्याचे सांगत प्रचार केला व्हता. त्यो रेकॉर्ड मला पुढच्या वर्षभरात मोडून दाखवायचाय. मागच्या अडीच वर्षात मीच पालकमंत्री व्हतो. ते आकडेतर मी आज सांगत पण नै. म्हणून म्हंतो. घरचा पालकमंत्री पाह्यजे. त्याला इथली सुख दुख कळतात. पाव्हण्या माणसाला काय देणं घेणं? गावाकडची जमीन जरी कसायची झाली तर शहरात र्‍हावून नाय कसता येत. मी कृषीमंत्री असलो तरी लोकांन्च्या बांधावर जातोय. पीकविम्यासाठी झटतोय. फळबाग योजनेसाठी अनुदान देतोय. भाऊसाहेब फुंडकर योजनेत नवी 15 फळं घातलीत. याच योजनेतून खतासाठी 100 टक्के अनुदान देणारंय… अन् आताच ब्राझीलच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून आलोय. कृषी, कृषी व्यापार, गुंतवणूक यावर त्या देशासोबत एक करार करणारंय… अन् अजून एक गोरक्षनाथ टेकडीच्या ईकासाला 10 कोटी देणारंय…

बाप्पा – तुमच्या कामाबद्दल, काम करण्याच्या कॅपॅसिटीबद्दल आमच्या मनात मुषकाऐवढीच काय पण तीळभर पण शंका नै. फक्त घोषणेचा सुकाळ अन् अंमलबजावणीचा दुष्काळ होऊ नये. आता एकच काम करा. त्या पीक विमा कंपनीच्या कानाला पकडून शेतकर्‍यांच्या खात्यात अग्रीम अन् पीकविम्याची रक्कम कशी टाकता येईल तेवढे बघा. अन् ते परळीत यंदा खरोखरीच नाथ प्रतिष्ठानचा गणेशोत्सव झालाय. मागच्या बारी इनाकारण त्याला ‘नाच प्रतिष्ठान’ नाव मिळालं. यंदा तुमी चूक सुधारलीत. कृषीमंत्री म्हणून शेतकर्‍यांसाठी चांगले निर्णय घ्या. आम्ही तुमच्यासोबत असू. पण थोडं जरी काय येडं वाकडं कानावर आलं तर आमचा मुषक तुमच्यावर लक्षच ठेवून है. अन् अतुलभौ जमेल तेवढ्या लौकर बीडचा कारभार धनुभौच्या हातात देवून टाका. तुमच्याने बीड पेलवणार नै…
(बराच वेळच्या चर्चेनंतर अतुलभौ अन् धन्नुभौ दोघांनीही बाप्पांचं दर्शन घेत तिथून निरोप घेतला. जाता जाता धन्नुभौनं इंदुरीकरांच्या परळीत होणार्‍या किर्तनाचं बाप्पांना निमंत्रण दिलं.)

मुषक – बाप्पा चला आता आवरा आवरी करतो. आपला देवलोकी निघायचा टाईम झालाय. पण जायच्या आधी तुम्हाला बीडच्या आणखी एका माणसांची भेट घालून द्यायचीय. लै मस्त माणूस है. इतका मोठ्ठा झाला पण आपल्या माणसांना नैय इस्सारला.

Tagged