मुषकराज 2022 भाग 1
कपाळी गोपीचंदनाचा टिळा, गालावर बुक्का, एका हातात टाळ, दुसर्या हातात रुद्राक्षांची माळ, गळ्यात शबनम टाकून मुषकराज पृथ्वीतलावर येण्यासाठी आतूर झाले होते. त्यांनी बाप्पांच्या पुढ्यात टुणकन् उडी मारत आवाज दिला, ओ बाप्पाऽऽ ओ बाप्पाऽऽ चला नाऽऽऽ इतका उशीर अस्तोय व्हंय… कुठंबी जायाचं तर येळेवर पौचणं गरजेचं अस्तयं. येळ हुकली तर पुढचं सगळं गणित इस्कटतंय…
बाप्पा ः आलो आलो आलोऽऽ मला काही सामान सुमान घेऊन देशील का न्हाईऽऽ तिथं गेलो अन् काई इसरलं तर ह्याचं त्याचं त्वांड बघायचं का मंगऽ
मुषक ः अन् इसरलं तरीबी यंदा काही तकलीफ व्हणार न्हाई. त्येचं कारणबी तसंचय… आपण इकडून जातानीच आधी गुव्हाटीला जाणार हाईत. आपण इथून मोकळ्या हातानी जरी गेलो तरी तिथं ‘50 खोके एकदम ओके’ ठेवलीती. मग तिथून श्याजीबापू, धर्मवीर अतुल सुतार ह्यांच्या भेटीगाठी घेऊन मगच बीडाकडं निघणारं हौतं… वाटात नाथनगरीच्या संदीपान भौला सोडायचं अन् बीडात पावुल टाकायचं… कसा वाटला आपला दौवुरा आँऽऽ
बाप्पा ः मुषकाऽऽ मुषकाऽऽऽ तुला कित्त्दा सांगू… मला असल्या राजकीय घाणीत नको न्हेत जावु… आपला कार्यक्रम बीडचा ठरलाय ना मग मला गपगुमान निमूटपणे बीडात घेऊन चल… तिकडे ‘काय ते शेतकरी, काय ते कारखानदार अन् काय तिथले प्रश्न एकदम सगळं ओकेमदी नाय’
(बाप्पाच्या या आदेशाने मुषक हिरमुसला… त्याला त्या 50 खोक्यात लपलेली ईडी, सीबीआय, एनसीबी, असलं काही बाही दाखवायचं होतं. गुवाहटी तो एक बहाणा था, नकली लोगो को सामने लाना था. असं तो मनाशीच पुटपुटला… इकडे सुर्यदेव कासराभर वर सरकले होते ‘आता निघाय पाहीजे’ तो बाप्पांना म्हणाला…)
मुषक ः चला मारा बरं ढांगऽ अन् पट्दिशी पाटकुळीवर बसाऽऽ तिकडे राजुरीच्या शिरसागरात कालपासून तुफान राडा सुरुये… संस्थेच्या कर्मचार्यांनी धरणे दिलीत… आमदारभैय्यां निवदेन घ्यायला उभे ठाकलेत… दुसरीकडे आमदार भैय्याच्या कारखाना मालकावर आईकरवाल्यांच्या धाडी पडल्यात. ‘नविन मुसलमान झाला अन् रोजाचा महिना आला’ अशी गत झालीय त्यान्ची. त्येन्ला हाल हवाल पुसू… कर्मचार्यांनाबी तोंडदेखलं भेटू… नव्या योगेशपर्वाची पण भेटगाठ घ्यायचीये… त्यांनी तर ‘सपना’ नाचिवली म्हणं बीडात… चला बाप्पा चला रातंर कमी अन् सोंगं जास्तीयेत…
(आधीच उशीर झाल्यानं मुषकानं आता आपल्या पायाचा वेग वाढवला… पृथ्वीलोक गाठण्यासाठी घटकाभराचा अवधी हाताशी होता. राजुरीच्या कारखान्याजवळच त्यांच्या आगमनाची जोरात तयारी सुरु होती. बाप्पांना उतरण्याचं ठिकाण चुकू नये म्हणून अति उत्साही कार्यकर्त्यांनं चक्क गजानन कारखान्याचं बॉयलर पेटवून आकाशात रंगीत धूर सोडला व्हता. कैक मैलाचा प्रवास करून झाल्यानंतर आता मुषकाला लॅन्डींग स्थळ सापडलं होतं. तसे मुषक लॅन्ड होण्यासाठी तयार झाले)
योगेशपर्व ः बाप्पांना हार घालून ओवाळायचा मान आधी आमचा… बोला गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ मंगल मुर्ती मोरयाऽऽऽ
आमदारभैय्या ः तिकडंच उभं र्हायचं… कारखान्याच्या आवारात पाय जरी टाकला तर उभा कापून हातात देईन… वर तोंड करून म्हणतोय आमचाच मानऽऽ आम्ही काय इथं खेळणापाणी खेळायला आलो काय? आमच्या बापानं रक्ताचं पाणी केलं तवा कुठं ह्यो कारखाना उभा र्हाईलाय. पण आमचं कष्ट कुणाला दिसलेच न्हाईत. दिसले फक्त हंडी फोडणारे. आमी खालच्या थराला अन् तुमचा बाप वरच्या थराला… मस्त लोणी हाणलं इतक्या दिवस… आता याच पुढं दाखवतो इंगा…
योगेशपर्व ः एै बाप कुणाचा काढतू रंऽऽ तुमच्या बापाला वरच्या थराला हंडी फोडाय पाठवीलं असतं तर मागच कंबर मोडूनआतापस्तुर भीक मागत हिंडलो अस्तो. हंडी फुटल्यावर जे काही खाली सांडलं ते कुणाच्या वाट्याला व्हतं? त्याचा हिसाब इचारला का कधी आमी… अन् आता काय सरकारनं तुम्हालाबी आरक्षण दिलंय. स्पेशल कोटा 5 टक्के… त्यामुळे अन्याय अन्याय कव्हरूक बोंबलणार… दिलंय ते चालू करून दाखवा… एखादा ग्लास भरून रस गाळला तरी अख्ख्या राजुरीच्या लोकांच्या टांगाखालून जाईन… पुढच्या खेपीला आमी बाप्पाला सुतगिरणीवर लॅन्ड व्हायला लावू… या तिकडं मंग दाखवतो…
(या दोघाचं भांडण सुरु असतानाच मुषक लॅन्ड झालेले व्हते. बाप्पा अन् मुषक दोघांनीही सुपाऐवढे कान करून ही भांडणं ऐकली होती. या भांडणात दोघांनी ऐकमेकांचे काढलेले बाप बाप्पाला काही आवडले नाहीत. त्यांनी आजच्या कामकाजातून ‘बाप’ हा शब्द वगळण्याची सुचना केली. त्याचबरोबर ‘गद्दार’ फेकू, पप्पू, टरबूज, असल्या काही शब्दांना देखील कामकाजात स्थान नको म्हणत तेही वगळून टाकण्याचे फर्मान सोडले. त्यावर मुषकाने देखील महागाई, बेरोजगारी, तारीख पे तारीख, असल्या काही शब्दांवर कठोर कारवाई करण्याबाबत बाप्पांकडे प्रस्ताव दिला. तर माझ्या दौर्यात कुठेही हनुमान चालीस लावली जाणार नाही याची खबरदारी घेण्याची सुचनाही बाप्पाने मुषकाला केली.)
मुषकराज 2022 भाग 1
बालाजी मारगुडे, बीड
मो.9404350898
क्रमशः