MUSHAK

जलजीवन मुषकराज भाग 5

संपादकीय

बाप्पांच्या दौर्‍याचा आज पाच दिवस. बाप्पाने मुषकाला आज्ञा केली. “जरा उरकतं घे. खूप कामं बाकी आहेत. रात्रं कमी सोंगं फार. आज आम्हाला झेडपीत घेऊन चला” बाप्पांच्या आज्ञेनंतर मुषकानं शेपटीला पीळ देत ती एकदा जमीनीवर आपटली. बाप्पांच्या पुढ्यात टूणकन उडी मारत ‘स्वारी तैय्यार है’ असा सूर लावला.

इकडे जिल्हा परिषदेच्या दारातच एक मिटींग बसलेली होती. साक्षात बाप्पा झेडपीच्या गेटवर आल्याचे पाहताच मिटींगमधल्या कोणीतरी फुलं अंथरली. कोणी गेटपासून इमारतीत जायला फुलांनी सजवलेली गाडी आणली. कोणी बाप्पासाठी सोन्याची अंगठी आणली. कोणी ड्रोन कॅमेर्‍यावाला बोलावला. हे स्वागत आहे की निरोप समारंभ हेच काहीवेळ समजले नाही. बाप्पांनी हळूच मुषकाच्या कानात विचारले. “हे लोक आहेत तरी कोण? क्षणार्धात एवढी जय्यत तयारी? जादू वैगेरे करतात काय ही लोक” मुषक ख्खी ख्खी करून हसत म्हणाला “जादू वैगेरे काही नाही हे लोक नजरबंदी करतात. रुमालाखाली हात झाकून जसे जनावरांचे सौदे होतात तसे जलजीवनचे सौदा करणारी ही टोळी आहे. गांधी भक्ती ह्याच्या नसानसात भिणलेली आहे. ह्यांनी गावोगावचं ‘जनजीवन’ इस्कटून टाकलंय. थोडं थोडकं नाही तर 1800 कोटी रुपयांच्या कामाचे रुमालाखाली सौदे झालेत. सौदे करणारा ह्याचा टोळी मुकादम म्हणजे अतिशय डांबरट मणुक्क्ष्य ‘अजित पवार’. त्या बारामतीच्या अजित पवारांचा सिंचन घोटाळा अन् ह्या अजित पवारांचा जलजीवन घोटाळा. शासनाचे पैसे म्हणजे ह्याच्या बापजाद्यांची दौलतच जणू. आपल्या स्वागताला जमलेल्यापैकी एका एकाला 200-300 कोटींची खिरापत ह्या महानगाने वाटली है. कोर्टाला म्हणून जुमानले नै, नेत्यांना गिणले नै… ना त्यांच्या आयुक्ताला गिणले… पण नामदेव घोटाळे नावाचा मनुक्क्ष्य मात्र ह्या अजित पवारसाठी अक्षरशः देव होता. जे काही सौदे झाले ते घोटाळेच्याच सल्ल्याने. बाहेर अशी चर्चाय की घोटाळेनं रुमलाखाली केलेल्या सौद्याच्या कमिशनपोटी 55 खोके पोहोचवून एकदम ओके रिपोर्ट दिला होता. एवढं खाऊन साधा ढेकर नै.. ना डाग नै.. न बट्टा नै. पण कुठे गोमाशीने ‘शी’ केली माहित नाही. आता सगळे खोके, बोके उघडे पडलेत. गावोगावचे लोक टोळी मुकादमाच्या मागे पाणी पाणी म्हणून हात धुवून लागलीत.”

नजरबंदी काय ते बाप्पांना कळून चुकलं. त्यांनी मुषकाला आज्ञा केली “मला त्या टोळी मुकादमाला भेटायचं है ज्याने सगळे सौदे रुमालाखाली केलेत” मुषक म्हणाला, “आता त्याला कुठे भेटता? त्यानं केलेल्या पापाची सजा म्हणून ह्या मुकदमाला इथून हाकलून दिलंय. अजून कुठलीच खुर्ची बसायला दिली नै. धनुभौ कृषीमंत्री झाले अन् ह्या टोळी मुकादमाचं भ्रष्टाचाराचं बेंड ठसठसायला लागलं. आतली गोष्ट तर अशी है की या जिल्ह्याचे सर्वेसर्वा धनुभौची सावली म्हणून ओळख असलेल्या बाल्मीकान्नांनाच टोळी मुकादमान दम भरला व्हता. शेवटी आण्णा ते आण्णाच… तिकडे धन्नूभौच्या मंत्रिपदाची शपथ सुरू असतानाच त्यांनी मुकादमाच्या उचलबांगडीचा मेल जिल्हा परिषदेत धाडला. ‘मला दम भरतो का’ म्हणून आण्णांनी मुकादमासाठी आता एक अंडासेल बांधायचं ठरवलंय. त्यासाठी विहीर भरून पुरावे जमा केलेत. म्हणजे ह्यांना आता कधी पत्र व्यवहार करायचा झाला तरी हल्लीमुक्काम ‘अंडासेल, हर्सूल जेल‘, ह्या पत्त्यावर करावा लागेल.”

एकूणच मुषकानं जलजीवनची अशी दर्दभरी कहाणी ऐकवल्यानंतर बाप्पांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी सगळ्या फाईली बघायच्या ठरवल्या. फायलींवरची धूळ झटकत मुषक बाप्पांना सांगू लागला. “बघा बघा बाप्पा घोटाळ्याची पहिली पध्दत. या अमूक गावात आधी जलस्वराज्य नंतर भारत निर्माण, नंतर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल आणि त्यावर पुन्हा जलजीवन म्हणजे एकाच गावात चार योजनेचा पैसा जिरवलाय. एका योजनेत विहीर बांधायची, दुसर्‍यात पाईपलाईन, तिसर्‍यात टाकी अन् चौथ्यात म्हणजे जलजीवनमध्ये पुन्हा वाढीव पाईपलाईन अन् टाकी दाखवून काम करायचे. म्हणजे बघा काम एकच पण एकाच कामावर चार चार योजनांचे पैसे हाणायचे. आता ही दुसरी फाईल बघा. या गावात एक किलोमीटरवर पाण्याचा सोर्स उपलब्ध असताना ह्यांनी इस्टीमेट फुगविण्यासाठी 25 किलोमीटरवर पाण्याचा सोर्स दाखवून पैशांची लूट केली. आता हे तिसरं इस्टीमेट बघा…सर्वे करणे, इस्टीमेट प्रस्ताव तयार करणे, तांत्रिक मान्यता घेणे, ई निविदा मागविणे, ईनिविदा ओपन करणे, प्रत्यक्ष काम करणे, कामाचे इन्स्पेक्शन करणे, बील अदा करणे ही सगळी कामे बघा… बघा जरा कोण करतंय… सगळ्यावर एकाच माणसांच्या सह्या… म्हणजे दरोडेखोराने दरोडा टाकण्याचा प्लान रचायचा. नंतर दरोडाही त्यानेच टाकायचा, तपासाला श्वान पथकही दरोडेखोरांचेच. नंतर दरोडेखोरानेच तपास अधिकारी बनून तपास करायचा, अन् कोर्टात न्यायधीश बनून निकालही त्यानेच द्यायचा असा या जलजीवनचा आतापर्यंतचा प्रवास आहे”

मुषकाने एक एक करून 1295 गावच्या फाईली दाखवल्या. तेव्हा बाप्पांच्या लक्षात आले. जलजीवनचं पाणी नेमकं कुठं मुरलंय. 500 कोटीत होणार्‍या सगळ्या योजनेला 1800 कोटी रुपये कसे लागले याचा उलगडा जणू आता झाला होता.

सगळा घोटाळा पाहून डोळे पांढरे व्हायची वेळ झाली. घशाला कोरड लागली. बाप्पाने मुषकाला आज्ञा केली “आम्हाला प्यायला पाणी द्या”, मुषकाने लगेच बाप्पांना सांगितले. “1800 कोटी ज्या इमारतीतून नुसत्या पाण्यावर उडवले जात आहेत त्याच इमारतीत एक ग्लास पाणी प्यायची देखील सोय झालेली नाही. त्यामुळे एकच अंडासेल आता पुरणार नाही. जलजीवनच्या पाण्यात जेवढ्या भ्रष्ट मगरी मनसोक्त पोहल्या त्या सगळ्यांची तिथे व्यवस्था होईल इतके अंडासेल बांधायाचे आदेश द्या बाप्पा. अन् त्या अंडासेलमध्ये दिवसातून एकच ग्लास पाणी प्यायची तरतूदही करून टाका” बाप्पाने मुषकाकडे कटाक्ष टाकत तुझी इच्छा पूर्ण होईल, असे म्हणत पुढचा धांडोळा घ्यायला शिक्षण विभाग गाठला.

क्रमशः

Tagged