mushakraj

नकली माल मुषकराज 2023 भाग 4

संपादकीय

डिजीटल बॅनर अन् त्यांचा घोळ मिटत नसल्याने बाप्पांनी आता उपस्थितांसमोर दोनच पर्याय ठेवले. “एकतर तुम्ही स्वतःहून बॅनर लावायचे बंद करा किंवा मग येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मीच कुठेतरी मोठ्या पटांगणात नेऊन मांडतो” बाप्पांची ही सुचना इतर सगळ्याच महापुरूषांच्या पुतळ्यांना आवडली. फक्त एकटे छत्रपती शिवाजी महाराजच नको तर आम्हाला पण घेऊन चला म्हणून जिल्हाभरातील महापुरूषांच्या पुतळ्यांचे बाप्पांना फोन सुरू झाले. एकंदरीतच जिल्हाभरातील पुतळ्यांना बॅनरबाजांचा काय त्रासंय हे बाप्पांना कळून चुकले. पण बाप्पांच्या या निर्णयाने चौकातील वातावरण एकदम सुतकी पडले.

सगळ्यांची शांतता भेदत मुषक म्हणाले, “ब्वाला या नगरीचे आमदार संदीपभैय्या… काय म्हणणंय तुमचं?” संदीपभैय्या उत्तरले “काय म्हणजे? मी तर म्हणतो चौकात बॅनर लावून वाहतुकीला अडथळा करणार्‍या अन् सिमेंट रस्त्याला भोकं पाडून बॅनर लावल्यावर त्यावर थेट बुलडोझर फिरवा. पोलीस म्हणतात नगर पालिकेने पुढाकार घेतल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाहीत. कसे काय काही करू शकत नाहीत? परवा नांदेडमध्ये शर्टचे वरचे बटन मोकळे ठेवल्यामुळे चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलीसांनी जर ठरवलंच तर चौकातच काय पण लोक स्वतःच्या घरावर बॅनर लावायला दहादा विचार करतील” संदीपभैय्यांना मध्येच थांबवत मुषक म्हणाला “मला तुमचा निर्णय आवडला. पण तुमच्या कायम मालकीचं करून घेतलेलं सोळंके पेट्रोलपंपाच्या पाठीमागे सामाजिक न्याय भवनाच्या मुलींच्या वस्तीगृहाच्या कंपाऊंडला असलेलं भलं मोठं अनाधिकृत होर्डिंग तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने कधी काढून घेणार?” मुषकाच्या या प्रश्नाने आमदारसाहेब जरा गोंधळूनच गेले. (मुषक आपली लाय डिटेक्टर चाचणी करतोय की काय अशी त्यांची अवस्था झाली होती) कपाळावर आलेला घाम पुसत त्यांनी आपल्या कार्यकर्त्याकडे पाणी मागीतलं. कार्यकर्त्यांनी गोदावरी नदीवरून कावड करून जलाभिषेकासाठी आणलेलं पाणी भैय्यांना प्यायला दिलं. पाठीमागून कोणीतरी दबक्या आवाजात बोललं “प्या प्या खुशाल पाणी प्या, बीडकर गेल्या 20 दिवसांपासून निर्जळीवर आहेत. अमृत अटलचं काम तसंच रखडलंय. त्याचं काही वाटू द्या. तुमच्या लेटरपॅडचा वापर जनहितासाठी होईल का? नगर रोडवरून गाडी पीरीरीरी पळणार होती. यंदा तरी ती इच्छा पूर्ण होईल का?” (पब्लिकमधून प्रचंड टाळ्या)

आता बाप्पांनी ‘योगेशपर्वा’वर नजर फिरवली. बाप्पांच्या पुढ्यात येत योगेशभैय्यांनी बोलायला लागले. “आमचे वडील गेल्या 35 वर्षापासून आलटून पालटून या शहराचे नगराध्यक्ष राहीले आहेत. पण त्यांनी स्वतः कधी कुठे एक बॅनर देखील शहरात लावले नाही. आता आमची पुढची पिढी. कार्यकर्त्यांनी माझ्या परस्पर मागच्या शिवजयंतीला बॅनर लावले. आमच्या अर्धांगिणी डॉ. सारिका यांनी ताबडतोब मला फोन करून सांगितले की ते चौकात लावलेले बॅनर आधी काढून टाका. पुढच्या अर्ध्या तासात लावलेले बॅनर आम्ही काढले. बाप्पा लावलेले बॅनर काढायची सुरूवात आम्ही आमच्यापासून केली. शहराची जबाबदारी आमच्यावर असल्याने आम्ही चौकाचं पावित्र्य जपतो.” योगेशभैय्याचं बोलणं मध्येच थांबवत मुषक बोलले, “तुम्ही स्वतः पावित्र्य जपता, पण सार्वजनिक वेळ आली की राखत नाही” मुषकाचं हे बोलणं ऐकून योगेशपर्वाची भंबेरीच उडाली. हा आरोप सिध्द करून दाखवावा असं चॅलेंजच त्यांनी मुषकाला दिलं. त्यावर मुषक बोलू लागले. “तुमचे डॅडी 35 वर्ष नगरपालिकेचे मालक व्हते. मग 35 वर्षात तुम्ही किती अनाधिकृत बॅनरबाजांवर कारवाई केली सांगा? तुम्ही स्वतः बॅनर लावले नाही पण बॅनर लावणारांना तुम्ही थांबवले का? त्यामुळे आता हे उत्तरदायित्व तुमच्यावर आहे. तुम्ही स्वतः या बॅनरबाजात मोडत नाहीत, याचा आम्हाला आनंद आहे. त्यासाठी तुमचं कौतूक, पण तुमचे कार्यकर्ते तुमच्याकडूनच देणग्या घेऊन त्यांच्या होर्डिंगवर तुमचे फोटो वापरतात मग ही जबाबदारी तुम्ही कशी काय झटकू शकता?” (मुषकाच्या या फायरिंगनं युरोसर्जन असलेल्या डॉ.योगेशपर्वाला जोराचा झटका बसला. पाऊणकिलोचा मुतखडा खोकल्यातून पडतो की काय एवढी तीव्र कळ अंगात निर्माण झाली होती.)

आता बारी आली भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के अन् शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंडलीक खांडेंची. मुषक बाप्पांना सांगू लागले “हे दोघे तर बॅनरचा पार अतिरेक करून टाकतात. ह्यांचा वाढदिवस असो नाहीतर ह्यांचा कोणी छोटामोठा नेता शहरात येवो. त्या नेत्याला खुष करण्यासाठी हे दोघे अख्खं शहर वेठीस धरतात. बरं बॅनर लावल्याने ह्या दोघांना सामान्य माणूस आशीर्वाद देत असेल असेही नाही. उलट सामान्य नागरिक त्यांच्या या कृतीचा तीन पिढ्यांची आठवण काढून उध्दार करतात. तरीही हे तसूभर मागे हटत नाहीत. बाप्पा ह्यांच्यात नेमकी काय शक्तीये जरा आम्हालाबी सांगा” (मुषकाच्या या वक्तव्याने राजेंद्र मस्के अन् कुंडलीक खांडेंवर जेसीबीच्या खोर्‍यातून फुलं पडण्याऐवजी अचानक दगडं पडावी, त्यानंतर जी रिअ‍ॅक्शन असेल ती त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसत होती’) मुषकाच्या बोलण्यावर बाप्पाने स्मितहास्य केले. अन् सांगितले. “सहनशक्ती ह्यांच्यात जास्त दिलीये” बाप्पाच्या उत्तरावर मुषक ताबडतोब बोलला “मग एक करा, जनतेची ‘सहनशक्ती’ आणखी कमी करा. आणि ते जे शिवभक्त म्हणून घेतात ना त्यांना तर कसलीच सहनशक्ती ठेवू नका. म्हणजे नगर पालिकेचं काम कमी होईल” त्यावर बाप्पा म्हणाले “मुषका तुझी आयडीया चांगलीये. यासाठी एसपी साहेबांचा एक अभिप्राय घ्या, सहनशक्ती कमी केल्याने कायदा सुव्यवस्थेचं काम तर वाढणार नाही ना?” असा प्रश्न करीत बॅनरबाजांची एक यादी तयार करून ती जनतेच्या पुढ्यात ठेवा असे आदेश दिले. त्यावर मुषकाने ‘जी बाप्पा’ म्हणत खिशातून कागद पेन काढत नावे लिहायला सुरूवात केली. त्यात प्रामुख्याने अशोक रोमन, अनिल जगताप, अप्पासाहेब जाधव, चंद्रकांत नवले, परळीचे धनंजय मुंडे, बळीप्पा गवते, अविनाश नाईकवाडे, अजित कुडके, विजयसिंह पंडित, बाबरी मुंडे, डॉ.बाबू जोगदंड, अजिंक्य चांदणे, पप्पू कागदे, अशी बरीच मोठी नावांची यादी तयार केली. तसेच शिवभक्त म्हणवून घेणार्‍या कार्यकर्त्यांची देखील एक यादी तयार करायला लावून त्यांच्या नावापुढील शिवभक्त उपाध्या काढण्याचे फर्मान बाप्पांनी सोडले. “बॅनरबाजांपासून जे पुतळा वाचवू शकत नाहीत ते कसले आले शिवभक्त? हा सगळा ‘नकली माल’ आहे” अशा शब्दात बाप्पांनी तथाकथित शिवभक्त सोलून काढले.

Tagged