मुषकराज 2023 भाग 3
गेवराईहून बाप्पाची गाडी सुसाट वेगाने बीडकडे निघाली. वाटेत टोलनाका असल्याने बाप्पाने मुषकाला फासस्टॅगला बॅलन्स असल्याची खात्री करून घ्यायला लावली. त्यावर मुषक म्हणाले, “आपल्या फासस्टॅगला बॅलन्स असलं काय नसलं काय साक्षात देवाची गाडी अडवायची कोणात हिंमतय का? मुषकाला प्रतिसाद देत बाप्पा म्हणाले, “देवाच्या गाडीला टोलधाडी, अन चोरांच्या गाडीला पायघडी. कलयुग आहे बाबा हे” बाप्पा असं कोड्यात बोलल्याचा संदर्भच मुषकाला लागला नाही. त्यावर बाप्पा पुन्हा म्हणाले, “अरे आपल्या गाडीत चोरीचा गुटखा, वाळू असेल तर टोलचे कर्मचारी गाडी लांबून दिसताच फाटक वर घेतेत. टोलवर मानसन्मान हवा असेल तर त्यासाठी आधी चोर असावं लागतं, देव असून चालत नाही” “एवढ्या मोठ्या अन् खोल सब्जेक्टचा आपला स्टडी नाही” असं लटकच मुषकाने सांगत गाडी 10 मिनिटात बीडात पोहोचवली.
मुषक म्हणाला “उतरा बाप्पा आलं तुमचं डेस्टीनेशन” बाप्पा बाहेर पाहतात तर काय रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी लावलेले गगनचुंबी टॉवर अन् होर्डिंगमुळे ट्राफिक जाम झालेली होती. बाप्पा आजुबाजुला महाराजांचा पुतळा शोधत होते पण अनाधिकृत होर्डिंगमुळे पुतळाच झाकून गेलेला होता. बाप्पा संतापाच्या सुरातच म्हणाले, “मुषका आपण छत्रपतींच्याच चौकात आलोय ना?” मुषक उत्तरला “होय महाराज आपल्या आज्ञेप्रमाणे आपण त्याच चौकात आहोत. त्या दोन बॅनरच्या फटीतून तुम्ही नीट बघीतले तर महाराजांचा पुतळा व्यवस्थित दिसेल”. हे ऐकून बाप्पाचा चेहरा लालेलाल झाला. उद्विग्न स्वरात ते म्हणाले, ‘अरे चौकाला छत्रपतींचं नाव कशाला देता? ‘बॅनर चौक’ असे नामकरण तरी एकदाचे करून टाका. छत्रपतींना कोणी वेडं वाकडं बोललं तर उभा महाराष्ट्र पेटून उठतो. मग महाराजांचा पुतळा असा बॅनरमध्ये गुंडाळलेला कसा चालतो? छत्रपती जर आज हयात असते तर त्यांनी या बॅनरबाजांना सौताड्याचा धबधबा नक्कीच दाखवला असता”.
बाप्पाने आज्ञा सोडली. “मुषका आताच्या आता मला इथल्या कलेक्टर, एस.पी. अन् नगर पालिकेच्या सीओंना भेटायचंय. त्यांना तातडीने हजर व्हायचे आदेश द्या” हजरजबाबी मुषक उत्तरला “हे तिघेही येऊ शकत नाहीत बाप्पा, कलेक्टर मॅडम वाळू हायवाच्या पाठलागावर आहेत. तिथून त्या एका शाळेत जाऊन बालविवाह प्रतिबंधाबाबत शपथ देणार हैत. ते झालं की त्यांच्या सासरी कन्हेरवाडीत त्यांना खासगी कामंय. तिथून आल्या की एका ठिकाणी भाषण द्यायचंय त्यांना. जंन्तेला ‘राशन’ नाय मिळालं तरी चालतंय पण ‘भाषण’ हवं. त्यात मागच्या माहिन्यात राजकारण खालीवर झाल्याने सगळा कारभार परळीच्या लाल किल्ल्यातून चालतो. पीकविमा अग्रीमची माहिती देखील परस्पर त्या माध्यमांना देऊ शकत नाहीत. लंम्पीमुळे सार्वजनिकरित्या बैलांच्या पोळ्याला मिरवणुका काढू नका, असे आदेश त्यांनी दिले. पण त्यांच्या सासरी कन्हेरवाडीत धुमधडाक्यात पोळा झाला. त्या कलेक्टर म्हणून पहिल्यांदा जिल्ह्यात आल्या तर त्यांना शासकीय रेस्ट हाऊसच सापडेना. सेम तुमच्यासारखं झालं बाप्पा. रेस्ट हाऊसच्या मुख्य गेटवरच सतराशे साठ बॅनर लागलेले होते. पण बॅनरच्या गर्दीतून वाट काढत त्या इच्छित स्थळी पोहोचल्या. आता त्यांना हटवून पुन्हा पुर्वाश्रमीचे कलेक्टर जिल्ह्यात येऊ पहात आहेत. पण मॅडमनी त्यांची फोनवरच हजेरी घेतल्याची चर्चा आहे. अजून एक आतली गोष्ट, कलेक्टर मॅडमनी एखादं काम हाताखालच्या अधिकार्याला सांगितलंय अन् ते झालंय असं एखादं उदाहरण शोधून दाखवा. सापडलं तर आजपासून मोदक खायचे सोडून देतो” मुषकाच्या बोलण्यातून कलेक्टर ऑफिसचा कारभार कसाय तो बाप्पांनी चांगलाच समजून घेतला.
बाप्पा म्हणाले, बरं ठिकंय मग एसपी साहेबांचं काय? मुषक उत्तरला ‘ते नक्कीच येतील. पण सध्या ते जीम मारतायंत. जीमला एखादा खाडा पडला तर जीमवाले सकाळी सकाळी बॅन्ड वाजवत दारात येतील अशी त्यांना बळीप्पा सारखी भितीय. त्यामुळे जीमचं अन् त्यांचं नातं घट्टंय. गेल्या सहा महिन्यात एकही खाडा नाही त्यांचा. (बाप्पा स्मितहास्य करतात) अनाधिकृत बॅनर अन् त्यांचा इथे तसा काय संबंध नाय पण तरीबी कलेक्टर अन् सीओंना त्यांनी दिलेलं हे पत्रं वाचा… त्यात म्हटलंय, अनाधिकृत बॅनरमुळे रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होत असून कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. बॅनर काढण्यासाठी आपणास जे काही पोलीस बळ आवश्यक असेल ते आम्ही देऊ, तक्रार द्या आम्ही गुन्हेही दाखल करू.” मुषकाचं बोलणं ऐकून बाप्पा म्हणाले, “मग घोडं कुठं पेंड खातेय? त्यावर मुषक म्हणाला, घोडं नुसतं पेंडच खात नाही तर अख्खं शहरच खातंय. कचरा खातंय, भुखंड खातंय. नाल्या खातंय, पथदिवे खातंय, काय खात नाही ते विचारा. तिकडे पाटोद्यात अख्खा पुलच खाल्लाय म्हणे. ‘काम घटकाभर अन् रोजचं इन्कम पोतंभर’ शहराच्या पॉश एरियात दोन दोन बंगले उगीच नसतेत? सीओ मॅडम ऑफिसात कधी येतच नाहीत. त्यामुळे केबीनमध्ये नेहमीच ‘अंधार’ असतो. मॅडम एकदाच आल्या तर सफाई कामगारांनी पगारीसाठी त्यांना कोंडून ठेवलं. त्यांना कोणी फोन लावला तर त्या कधीच फोन उचलत नाहीत. वरतून म्हणतात. ‘अहो शहरातील प्रत्येक नागरिकांनी फोन लावल्यावर मी काम कधी करणार?’ जणू काही शहरातील नागरिकांना फोन लावण्याशिवाय दुसरं काही कामच नाही. खरं तर त्यांनी बाल्मीकाण्णांचा गूण घ्यावा… सहा सहा हॅडसेट त्यात दोन दोन सीमकार्ड. दिवस उगवायला खुर्चीवर बसणार अन् अंधार पडायला खुर्ची सोडणार. जनतेसाठी दरवाजा सताड उघडा.” मुषकाच्या बोलण्यावरून एकंदरीत जिल्ह्याचा हालहवाल बाप्पांना समजून चुकला होता. आता उद्या बघू बाप्पांच्या दरबारात कोण हजेरी लावतंय ते…
क्रमशः