mushak

गुरूजींची शाळाबाह्या कामं…. मुषकराज 2023 भाग 7

संपादकीय

“बाप्पा आम्हाला वाचवा” म्हणत आंदोलक शिक्षकांनी आर्त टाहो फोडला. मुषकानं गुरूजींना शांत होण्यास सांगितलं. बाप्पा काही म्हणण्यापुर्वीच एक शिक्षक नेता उठून ‘आमच्या मागची शाळाबाह्य कामं कमी करा’ म्हणून बाप्पांना हात जोडू लागला. शाळाबाह्य कोणती कामे करता? असा प्रश्न बाप्पांनी विचारताच गुरूजींचा नेता बोलू लागला.

“19 शिष्यवृत्ती योजनांचे तपशील लिहीणे, किती लोकांकडे फ्रिज, टी.व्ही आदी चैनीच्या वस्तू आहेत याची माहिती घेणे, मतदार नोंदणी, लसीकरण मोहिम, 40 हून अधिक नोंदवह्या ठेवणे, जंतनाशक गोळीचे अहवाल देणे, शौचालयाचा डाटा ठेवणे, डीजीटलसाठीची फाईल अपडेट ठेवणे, जनगणना करणे, प्रभात फेर्‍या, जनजागृती, नाट्य तयार करणे, राष्ट्रीय नेत्यांचे जन्मदिवस-मृत्युदिवस साजरे करणे, खाऊ शिजवणे, त्यासाठीची तांदूळ-डाळ-सरपण शिल्लक आहे याची नोंद करणे, गरज पडल्यास स्वतःच्या पैशातून या वस्तू आणणे, मीना राजू मंच चालवणे, मुलांना आधारकार्डे मिळवून देणे, शाळेसाठी लोकसहभाग मिळवून त्याचा अहवाल तयार करणे, वर्गातील पायाभूत सुविधांच्या सद्यस्थितीचे अहवाल, विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे अहवाल, विमा योजना, वेगळ्यावेगळ्या परीक्षा अन् योजनांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणे, शालाबाह्य मुले शोधून त्यांच्या पालकांचे मोबाईल नंबर मिळवणे, शैक्षणिक सहली आयोजित करणे, सरल प्रणालीवर माहितीचे संकलन, स्वच्छता पंधरवडा, मन की बातचे कार्यक्रम, झाडे लावणे, लावलेले झाड जगले की मेले याचा अहवाल देणे, गणवेश, बूट, सॉक्स खरेदी करणे. महसूल, आरोग्य या खात्याला जेव्हा जेव्हा सरकारी माणसं लागतील तेव्हा तेव्हा गुरूजींनी हजर होणे. गावात क्राईम झाले तर प्रसंगी सरकारी पंच बनने अन् इतक्या सगळ्यांमधून वेळ मिळालाच तर मग विद्यार्थ्यांना शिकवणे”

गुरूजींमागची ही शाळाबाह्य कामे ऐकून बाप्पाने डोक्यालाच हात मारला. सरकारी शाळांमधील मुलं कमी होऊन या शाळा का बंद पडू लागल्या? हे बाप्पांना आता कळून चुकले. तेवढ्यात मुषक बाप्पांना म्हणाले, “थांबा बाप्पा दुसरी बाजू पण ऐकून घ्या. गुरुजींबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. परंतु गुरूजींनी माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत. गुरूजींमागे इतकी कामे असताना त्यांचा दिवसातील अर्ध्याहून अधिक वेळ धाब्यावर का जातो? जे गुरूजी शिकवायचं काम द्या म्हणतायत यातील किती जणांना 30 दहा 300 पर्यंत मूकपाठ उजळणी येते? किती गुरूजींना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार येतो? किती गुरूजींना इंग्रजीमधून स्वतःची ओळख सांगता येते? किती गुरूजींना कॉम्प्युटर हाताळता येते? किती गुरूजी शुध्द मराठी लिहून वाचून दाखवतात? किती गुरूजी खरंच शाळा एके शाळा करतात? अनेकजण प्लॉटींगच्या धंद्यात, काही तर चक्क धाबे टाकून तिथं दारू विकतात. यातील काहींनी तर हातात खडू धरून कित्येक वर्षे झाली असतील. गुरूजी लोकांच्या म्होरक्यांनी खरे तर गुरूजी ही जात बदनाम करून टाकली आहे. गुरूजींचे म्होरके शाळा सोडून झेडपी, पंचायत समितीत, काय करतात? ह्यांची शाळाबाह्य कामं बंद व्हायलाच हवीत पण गुरूजींना सर्वोतोपरी ज्ञान असणे किती गरजेचंय या जबाबदारीचं भान आणून द्यावं”


बाप्पांनी मुषकाला शांत करीत राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकरांना फोन लावयचा सांगितला. “हॅलो मी मुषक बोलतोय. बाप्पांचा वाहक” तिकडून आवाज आला “ब्वॉला ब्वॉला मुषकराव काय म्हणतंय बीड?, हां इकडे बाप्पांना बोला” मुषक बाप्पाकडे मोबाईल देतो. बाप्पा त्यांना गुरूजींच्या मागचे शाळाबाह्य कामे काढून टाकायला सांगतात. त्यावर केसरकर म्हणतात “लवकरच आम्ही एक योजना आणतोय. सगळी ज्ञानमंदिरं दानशुरांना दत्तक देतोय. पण बाप्पा तुम्ही घाबरू नका आम्ही मंदिरं मात्र चकाचक करतोय. शासनाचा खर्च वाचविण्यासाठी ऑनलाईन शाळा भरविण्याची योजना आहे. विद्यार्थ्यांनी घरीच मोबाईलवर शिक्षण घ्यायचं. मोबाईल पण सरकारच देणार. आपल्या मुकेशभाऊसोबत तसं टायप झालंय, इंटरनेट पण देणार अन् त्याचं बील सरकार भरणार. मोबाईल चार्ज करण्यासाठी प्रत्येक घरी सरकारने गौतमभाऊ अदानीला स्मार्ट मीटरचं टेंडर दिलंय. प्रत्येक मुलाच्या घरापर्यंत पोषण आहार पोहोचविण्याचं काम स्विगी अन् झोमॅटोला दिलंय. त्या मुलाला शुध्द पाणी प्यायला मिळावं म्हणून बिसलरी कंपनीला टेंडर दिलंय. ते घरोघरी पाणी पोहोच करतील. ऑनलाईन शिक्षण असलं तरी गणवेश कंम्पलसरी असणारंय. त्याचं पण टेंडर झालंय. बूट, सॉक्स, हातमोजे, स्वेटर सगळं काही सरकार देणारंय. शाळांच्या रिकाम्या मैदानात भाजीपाला लावण्यासाठी गावोगावच्या शेतकर्‍यांसोबत करार करून त्यांना अनुदान देण्याबरोबरच दुभती जनावरं देण्याची योजना तयार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ते दूध पोहोचविण्यासाठी त्या त्या तालुक्याच्या दूध संघांसोबत करार होत आहे. या विद्यार्थ्यांचे कपडे धुण्यासाठी बचतगटाला सरकार अनुदान देणारंय. आणि शिक्षकांना काही काम असावं म्हणून या सगळ्यांचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी त्यांना एक एक टॅब दिला जाणार आहे. त्याचही टेंडर फ्लॅश झालंय. आमचं सरकार हे जनतेचं सरकार आहे. शासन आपल्या दारी. आम्ही उगीच नाहीत म्हणत?” लागलीच मुषक बाप्पांना म्हणाले, “ऑनलाईन कोण शिकवणार हे अजून शिक्षणमंत्र्यांनी सांगितलेले नाही” मुषकाचा आवाज ऐकून केसरकर म्हणाले “ऑनलाईन शिकविण्यासाठी आम्ही ‘बायजू’ला टेंडर दिलंय. त्यांचं स्टार्टअप बुडीत निघालं होतं. आमच्या निर्णयामुळे आता ते वाचेल. शेवटी हे जनतेचं सरकार आहे.”

जमलेल्या गुरूजींना आता आपली वाट लागत असल्याचे लक्षात आले. त्यातल्या काहींची ‘देशी’ चार्जींग संपत आल्याने त्यांनी चुळबूळ सुरू केली. त्यामुळे मुषक म्हणाले, “चला आरती उरकून घेऊ. आरती झाली. ‘घालीन लोटांगण’ म्हणताना गुरूजी मनातल्या मनात म्हणत होते “बाप्पा आमच्यासाठी काही कृपा केली नाहीस तरी चालेल पण आम्हाला उठसूठ मास्तरडे म्हणणार्‍या पत्रकारांना आणि आमच्या घरभाड्यावर उठलेल्या आमदाराला मात्र धडा शिकव” बाप्पांना हे सगळं समजत होतं. जाता जाता बाप्पा म्हणाले, गड्यांनो, सरकारकडून वादीसाठी हाल्या मारण्याचा प्रकार झाला. आता शाळा वाचवायच्या असतील तर एकच लक्षात ठेवा. जुन्यांना टेंडर टेंडर खेळू द्या, पण याबारी नवी व्हीजन असलेली तरूण पोरं निवडून द्या… mushak, mushakraj,

Tagged