civil rugn bed

जिल्हा रुग्णालयात काय सुरूये? एका संवेदनशील मनाच्या पोलीसाने सांगितलेली ही इन्साईड स्टोरी

कोरोना अपडेट क्राईम संपादकीय

बीड- जिल्हा रुग्णालयात बातमी आणि रुग्णांच्या तक्रारी अनुषंगाने नियमीत जाणे-येणे असते. बघू वाटत नाहीत असे हाल रुग्णालयात सुरु आहेत. पण त्याचवेळी जीव ओतून काम करणार्‍या नर्स, काही स्वयंसेवक आणि एखाद दुसर्‍या डॉक्टरांचा अपवाद सोडला तर रुग्णांचे प्रचंड हाल सुरु आहेत. अशाच एका संवेदनशील मनाच्या पोलीसाने काल माझी आवर्जुन भेट घेतली. तो जे सांगत होता ते ऐकून सिस्टीम या नावाचा संताप येत होता.

तो पोलीस म्हणाला, सर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला जिल्हा रुग्णालयात ड्यूटी का लावली असेल? मी म्हणालो, रुग्णांचे नातेवाईक इथे गर्दी करतात त्यांना आवरण्यासाठी… तो म्हणाला, नाही सर तुम्ही माहिती घ्या… हे तुम्ही वरवर बोलताय. एकदा चक्कर टाका आणि बघा आत काय सुरु आहे. त्याला म्हटलं ‘सगळंच आतलं बाहेर सांगत बसलो तर सिव्हीलमध्ये उपचार घ्यायला कोणीच येणार नाही. पण मग किती दिवस ही सिस्टीम अशीच सुरु राहू द्यायची? की इथेही काही अनुचित प्रकार घडून गेल्यावरच आम्ही बोलायचं?’ माझ्या या बोलण्याने त्या पोलीस बांधवाला विश्वास आला होता. मग त्यानं एकएक करून तिथल्या बारा भानगडी सांगायला सुरुवात केली. तो म्हणतो,

‘सर, इथली परिस्थिती पाहून माझं मन व्यथित झालंय. आम्हाला इथं बाहेर नातेवाईकांनी गर्दी करू नये म्हणून ड्यूटीला लावलंय. पण इथली सिस्टिम पाहून असं वाटतंय गर्दी सावरण्यासाठी आपण इथं ड्यूटी करीत नसून डॉक्टर, रुग्णालयीन स्टाफ आणि येथील अधिकारी यांचं पाप झाकण्यासाठी आपली इथे ड्यूटी लावलीये. दर दोन तीन तासाला आम्हाला गेट सोडून आत वॉर्डमध्ये रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचार्‍यांचे भांडणं सोडवायला जावं लागतंय. कुणाचं तरी रेमडेसिवीरच दिलेलं नसतं, तर कुणाचा ऑक्सिजन बंद पडलेला असतो. तर कुणाचं सलाईन संपलेलं असतं. कोणता रुग्ण तडफडत असतो. डॉक्टरांना खूपदा बोलावून देखील ते वेळेवर आलेले नसतात त्यामुळे रुग्ण दगावतो. सहाजिकच अशावेळी नातेवाईक संतापतात. त्या जागी तुम्ही आणि मी असतो तरीही मीही हेच केलं असतं. असली रोजची भांडणं सोडविण्याचं मुख्य काम सध्या आम्हाला आमचाही जीव धोक्यात घालून करावं लागतंय. नातेवाईक गोंधळ करीत असताना बर्‍याचदा आम्हाला दिसतंय की यावेळेला डॉक्टरांनी हजर व्हायला पाहीजे. रुग्णांना त्यांची गरज आहे. पण डॉक्टर काही केल्या येत नाहीत. नातेवाईकांची काही चूक नसताना देखील पोलीसांना बघून ते शांत होतात. म्हणजे चूक डॉक्टरांची आणि आम्हाला तरीही बाजू घ्यावी लागते डॉक्टरांची… आणि हेच पाप आमच्या हातून केवळ पोलीस शिस्तीच्या नावाखाली होतंय. आम्हाला वरीष्ठांशी हा प्रकार बोलण्याची देखील सोय नाही. आम्ही तिथले आयविटनेस आहोत. आम्हीच पुरावा दाबतोय. खरं तर हे डॉक्टर आणि रुग्णालयीन कर्मचारी अक्षम्य चुका करीत आहेत. दरदिवशी ह्यांच्यावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल होईल, इतक्या अक्षम्य चुका ते करीत आहेत. अर्थात काही डॉक्टर अतिशय चांगलं काम करीत आहेत पण ते अपवादाला आहेत. त्यांची शक्ती या बनावट सेवा बजावणार्‍या डॉक्टरांपुढे अगदीच फिकी पडते.

सेवेत घेतलेल्या कुठल्याच कंत्राटी कर्मचार्‍यांना काहीच नॉलेज नाही. मात्र त्यांच्या जिवावर हे डॉक्टर वॉर्ड सोडून देऊन निघून जातात. रुग्णालयाचा प्रशासकीय कारभार ज्यांच्या हातात ते सीएस तर इकडे चुकूनही येत नाहीत. आपल्या गावाकडे एक म्हण आहे ‘वरमाय शिंदळ असेल तर वर्‍हाडाबद्दल काय बोलावं?’ अशी येथील परिस्थिती. पण सर आता हे सगळं सहन होत नाही. तुम्ही काही तरी करा राव यात… अनेकदा तर ऑक्सिजन पुरवठा अचानक बंद पडतो. कंत्राटी कर्मचार्‍यांना काय करावं हेच कळत नाही. सगळेच लोक पीपीई किटमध्ये असल्याने इथे डॉक्टर उपस्थित आहेत की नाही समजायला मार्ग नसतो. याचाच फायदा डॉक्टर घेतात आणि दिवस दिवस वॉर्ड वार्‍यावर सोडतात. अचानक इथे कोणी इन्सेपक्शन केलं तर मोजकेच डॉक्टर उपस्थित दिसतील तर काहींची ड्यूटी असतानाही ते गैरहजर असल्याचे दिसेल.

मला सांगा कॅमेरे बंद का ठेवले?
इथे इतकी अंदाधुंदी सुरु आहे हे कळू नये म्हणून ह्यांनी प्रत्येक वॉर्डमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून ठेवले आहेत. बाहेरील सगळे कॅमेरे सुरु आहेत. नेमके वॉर्डमधीलच कॅमेरे का बंद ठेवले? नातेवाईकांच्या नावाखाली इथे सगळा दलालांचा बाजार भरवला आहे. वशिल्याने कुणाला इथे बेड हवा असल्यास चक्क ऑक्सिजन लावलेल्या रुग्णांचा देखील बेड खाली करायला देखील हे मागे पुढे पहात नाहीत. नातेवाईकांनी ह्यांच्यासोबत अरेरावी केली की आम्हाला बोलावलं जातं. पोलीस बघून बिचारा नातेवाईक शांत होतो. दलाल कोण? कसे? काय? याबाबत वरिष्ठांना देखील अनेकदा बोललो आहे पण काहीच फरक पडत नाही कुणाला… पोलीस सामान्य लोकांच्या संरक्षणासाठी आहेत की ह्यांनी केलेल्या पापावर पांघरून घालण्यासाठी? रुग्णांवर अन्याय होतोय हे ढळढळीत आम्हाला दिसत असतानाही आम्ही काही करू शकत नाहीत. दिवस-रात्रं हेच बघत असल्याने जिव तीळ तीळ तुटत आहे. कुठून या पोलीसात भरती झालो, असं वाटतं. आपल्या वर्दीचा सामान्य लोकांना फायदाच होत नसेल तर वर्दी घालून करायचं काय? सर तुम्ही पत्रकार आहात पण मी जो पोलीसांच्या नजरेतून सामान्य जनतेला तिथला आक्रोश बघतोय तो खूूप भयावह आहे. याला कुठेतरी वाचा फोडा सर… हात जोडून विनंती आहे सर…

रेमडेसिवीरचं रॅकेट रुग्णालयातच…

बाहेर जे ब्लॅकमध्ये रेमडेसिवीर मिळतात ते जिल्हा रुग्णालयातूनच बाहेर गेलेले आहेत. रुग्णांच्या नावे इथून रेमडेसिवीर आधी हातात घेतले जाते. त्यानंतर त्या रुग्णाला इंजेक्शन न देताच डिस्चार्ज देण्यात येतो. एका एका रुग्णासाठी सहा सहा डोस दिल्याचे दाखवले जाते. रुग्णाचा नातेवाईक कोणी भांडणारा असेल तरच त्याला सांभाळून घेऊन रेमडेसिवीर दिलं जातं. अन्यथा जो शांत त्याचं रेमडेसिवीर ब्लॅकमध्ये बाहेर आलेच म्हणून समजा. हा प्रकार रोखण्यासाठी काही डॉक्टर प्रामाणिक प्रयत्न करतात मात्र त्यांना ऐनकेन प्रकारे बदनाम करून सोडलं जातं. त्यामुळे इच्छा असुनही कुणाला इथे चांगलं काम करता येत नाही. येथील सर्व जबाबदारी असलेला कॅप्टन जर चांगला असेल तरच हे रोखणं शक्य आहे. आम्हीही बोललो असतो सर पण आमची नोकरी शिस्तीची. आम्ही थोडंही काही बोललो की आमच्यावर कारवाई अटळ… त्यामुळे तुम्ही काही करा सर… तुम्हाला विश्वासाने सांगतोय…

Tagged