विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा : जिल्हाधिकारी

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन वाढविला आहे. परंतू प्रशासनाकडून योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसल्याने कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. याची गंभीर दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सु-मोटो जनहित याचिका दाखल करून घेत २६ एप्रिल रोजी लॉकडाऊनच्या कालावधीत निर्बंधांच्या अनुषंगाने प्रशासनाने घ्यावयाच्या दक्षता आणि कारवाईबाबत सविस्तर निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आता अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती वगळता विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या व्यक्तींविरोधात थेट कारवाई करण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी शुक्रवारी मध्यरात्री दिले आहेत.

आदेशात पुढे म्हटले आहे की, औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लॉकडाऊन कालावधीत सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी ७ ते ११ या कालावधी व्यतिरिक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तीस वाहनाने बाहेर जायचे असेल तर सोबत आधार कार्ड बाळगणे अनिवार्य आहे. अन्यथा संबंधित व्यक्ती कारवाईस पात्र असेल. वैद्यकीय व निम वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील आधार कार्ड सोबत ठेवावे. डोळ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी हेल्मेटचा वापर अनिवार्य आहे. घराबाहेर पडताना नाक व तोंडावर व्यवस्थितपणे मास्क लावावा. मास्क नसणारी व्यक्ती कारवाईस पात्र असेल. अशा व्यक्तीस वाहतूक पोलीस अधिकारी लॉकडाऊन निर्बंधांचा भंग करणाऱ्या व्यक्तीच्या आधार कार्डचा फोटो घेऊन संबंधित व्यक्ती विरोधात कारवाई करू शकतील. अशा व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्टही करू शकतील. हेच आदेश कर्तव्यावर नसलेल्या लोकसेवकांनाही लागू राहतील. तसेच लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांना लॉकडाऊन निर्बंधातून सूट दिली जाऊ नये. तसेच कोणत्याही दोषी व्यक्तींना सोडण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणांवर दबाव टाकू नये असे आदेश दिले आहेत. या न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करावी असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत. दरम्यान यापूर्वी त्यांनी लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी केली जाईल असे अनेकदा आदेश देऊनही स्थानिक पातळीवर मात्र वारंवार उल्लंघन होताना दिसून आले. त्यामुळे आजच्या आदेशाची तरी अंमलबजावणी होते की नाही? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

आता लॉकडाऊन गरजेचाच!

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे प्रमाणात ३० टक्क्यांच्या पुढे सरकले आहे. आरोग्य यंत्रणा प्रचंड तणावात आहे. सद्यस्थितीत ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, खाटांचा तुटवडा आहे. त्यामुळे आता कडक लॉकडाऊन गरजेचाच असल्याचे तज्ञांचे मत आहे.

Tagged